बेशिस्त स्पर्धकांना बिगबॉसचा दणका, दिव्या शिंदेची त्या कारणाने हकालपट्टी

07 Feb 2026 20:10:28

मुंबई : बिग बॉस मराठी ६च्या सहाव्या पर्वात अवघ्या काही दिवसांतच घरातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. वारंवार सूचना देऊनही काही स्पर्धकांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यानं बिग बॉसने कडक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर स्पर्धक दिव्या शिंदे हिच्या वागणुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला असून, गंभीर धमकीप्रकरणी तिला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यामुळे बिगबॉसने पुन्हा एकदा घराची शिस्त राखण्याचा प्रयत्न केला आहे.
घरातील सदस्यांना उद्देशून हिंसक भाषेचा वापर करत ‘तलवार चालवण्याची’ आणि ‘जीव घेण्याची’ धमकी दिल्यानंतर बिग बॉसने कोणतीही तडजोड न करता दिव्याला शोमधून हकालपट्टी केली. हा निर्णय जाहीर होताच प्रेक्षकांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

घरातून बाहेर पडल्यावर दिव्याच्या टीमकडून तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये तिनं चाहत्यांचे आभार मानत, सध्या परिस्थिती गुंतागुंतीची असली तरी लवकरच सर्व प्रश्नांची उत्तरं देणार असल्याचं म्हटलं आहे. “माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा आभारी आहे. योग्य वेळी मी ‘लाईव्ह’ येऊन सत्य मांडेन,” असं तिनं या संदेशात नमूद केलं आहे.

दरम्यान, दिव्याच्या हकालपट्टीनंतर तिचे समर्थक सोशल मीडियावर सक्रिय झाले असून “सरकार इज बॅक” अशा प्रतिक्रिया देत तिच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत. तर दुसरीकडे, अनेक प्रेक्षकांनी तिच्या आक्रमक भाषेवर नाराजी व्यक्त करत बिग बॉसच्या निर्णयाला दुजोरा दिला आहे.

वादाची सुरुवात कशी झाली?

एका टास्कदरम्यान तन्वी कोलते हिनं दिव्याचं नाव घेतल्यानंतर दोघींमध्ये वाद पेटला. संतापाच्या भरात दिव्यानं स्वतःला ‘सरकार’ म्हणत बाहेर नेहमी तलवार बाळगते, अशी वक्तव्ये केली. तसेच हिंसाचाराची धमकीही दिली. तिच्या या वक्तव्याला गांभिर्याने घेत बिग बॉसने आधी तिला माफी मागण्याची संधी दिली. मात्र, ती आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं अखेर तिला शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.


Powered By Sangraha 9.0