पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे आणि त्यांच्या सरकारच्या विकासाभिमुख कारभारामुळे मोदी जिवंत असेपर्यंत आपण सत्तेत येऊ शकत नाही, याची खात्री काँग्रेसला पटली आहे. मोदींच्या कारभारामुळे भारताचा जगात दबदबाही वाढत चालला आहे. हे पाहावत नसल्याने त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच लोकसभेत त्यांना धक्काबुक्की करण्याचा कुटिल कट आखला गेला. त्यासाठी भेकड राहुल गांधींनी महिला खासदारांचा वापर केला. यावरून राहुल गांधींचा मोदीद्वेष किती पराकोटीला पोहोचला आहे, ते दिसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणाऱ्या आपल्या भाषणात विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या बेछूट टीकेला आणि त्यांच्या विरोधात केलेल्या दमदाटीच्या भाषेला चोख प्रत्युत्तर दिले असले, तरी चालू अधिवेशनात विरोधी पक्षांनी, विशेषत: काँग्रेसने घेतलेल्या एकांगी आणि ताठर भूमिकेमुळे हे विरोधी पक्ष आता किती घायकुतीला आले आहेत आणि प्रसंगी मोदी यांना शारीरिक इजा करण्यापर्यंतही त्यांची मजल जाऊ शकते, हे दिसून आले. ही गोष्ट अतिशय गंभीर अशीच. अर्थात, मोदी यांचा उपजत राजकीय चाणाक्षपणा आणि सुदैव त्यांच्या मदतीला धावून आले आणि लोकसभेत एक अघटित प्रसंग होता-होता वाचला. या घटनेने विरोधक हे राजकीयदृष्ट्या किती वैफल्यग्रस्त आणि द्वेषमूलक बनले आहेत, ते तर दिसून आलेच; पण आता सत्तेच्या लालसेने आंधळे झालेले काँग्रेसचे नेतृत्व हे हातघाईवर येत चालले आहे, तेही देशाने पाहिले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधानांकडून आधी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत आभारप्रदर्शक उत्तर दिले जाते. पण, बुधवारी लोकसभेत पंतप्रधानांना बोलूच न देण्याचा कट काँग्रेसने रचला. इतकेच नव्हे, तर मोदी आपल्या आसनाकडे जातानाच, त्यांची अडवणूक करण्याचा आणि प्रसंगी धक्काबुक्की करण्याचाही सापळा रचला गेला. यामागे मोदी यांची वैयक्तिक प्रतिमा मलिन करण्याचा आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या चारित्र्यावर डाग लावण्याचा विरोधकांचा मनसुबा होता. पंतप्रधानांना अडविण्यासाठी काँग्रेसने आपल्या सात महिला खासदारांना पुढे केले. त्यापैकी तीन दलित समाजाच्या होत्या, म्हणजे या धक्काबुक्कीनंतर मोदी यांनी दलित समाजाचा आणि महिलेचा अपमान केल्याचा डांगोराही काँग्रेसला पिटता आला असता. विरोधकांना मोदी यांच्या विरोधात सभागृहातच निदर्शने करायची होती आणि फलकही फडकवायचे होते; तर ते त्यांच्या बाजूकडील वेलमध्ये (लोकसभा अध्यक्षांपुढील मोकळी जागा) उतरूनही हे करू शकले असते. तसे न करता, या महिला खासदार थेट पंतप्रधानांच्या आसनाला घेरून उभ्या राहिल्या. यावरून त्यांचा हेतू शुद्ध नव्हता, हे नि:संशयपणे स्पष्ट होते. मोदी सभागृहातच न आल्याने हे अत्यंत नीच कारस्थान शेवटापर्यंत जाऊ शकले नाही, हे देशाचे सुदैव. पण, त्यामुळे एका प्रथेचा बळी पडला. सुदैवाने विरोधकांच्या या कुटिल कारस्थानाची कुणकुण लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना आधीच लागली असल्याने त्यांनी मोदी यांना सभागृहातच न येण्याचा सल्ला दिला आणि मोदी यांनी तो मानला. परिणामी, विरोधकांचा हा डाव फोल ठरला. या कटाची माहिती नंतर स्वत: बिर्ला यांनीच सभागृहात दिली.
मोदी यांच्या भाषणात अडथळे आणणे आणि घोषणाबाजी करणे, ही नवी गोष्ट राहिलेली नाही. राज्यसभेतही मोदी यांनी आपले भाषण सुरू केले, तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. पण, मोदी हे ठामपणे भाषण करीत आहेत, हे पाहिल्यावर घोषणा देऊन विरोधक थकले आणि त्यांनी सभात्याग केला. काँग्रेसचा मोदी यांना असलेला विरोध हा आता वैयक्तिक झाला आहे. म्हणूनच, मोदी यांनी आपल्या भाषणात राहुल गांधी यांचा उल्लेख ‘शातिर दिमाग असलेले युवराज’ असा केला होता. कारण, राहुल गांधी यांनी आपल्या वैयक्तिक अहंकारामुळेच सध्या लोकसभेचे कामकाज बंद पाडले आहे. खरेतर अन्य विरोधी पक्षांनी या कुटिल युवराजाच्या वैयक्तिक राजकारणामागे फरफटत जाण्याचे काहीच कारण नाही. पण, हे अन्य विरोधी पक्ष मुळातच एकेका राज्यापुरतेच मर्यादित असून, तेथेही त्यांची शक्ती भाजपपुढे क्षीणच आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मागे-मागे जात आपले ईप्सित साध्य करण्याचा या दुबळ्या आणि स्वाथ विरोधी नेत्यांचा हेतू आहे.
मोदी असेपर्यंत तरी आपले पंतप्रधान बनण्याचे स्वप्न साकार होण्याची अजिबात शक्यता दिसत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेले राहुल गांधी हे वैयक्तिक द्वेषाने पेटले आहेत. मोदी यांना निवडणुकीच्या राजकाद्वारे सत्तेवरून पायउतार करणे अशक्य असल्याची खात्री पटल्याने मोदींबद्दल असलेला विरोध द्वेषात रूपांतरित झाला आहे. मोदी यांना मारल्याशिवाय आपण सत्तेवर येणार नाही, याची खूणगाठ बांधल्याने काँग्रेसच्या अनेक खासदारांनी व नेत्यांनी मोदी यांच्या मृत्यूची कामना यापूव उघडपणे केली आहे. ‘मोदी तेरी कबर खुदेगी’ ते ‘कुत्र्याच्या मरणाने मरतील’... वगैरे अनेक घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी उघडपणे दिल्या आहेत. त्यांना किती अपशब्द बोलले त्याची गणतीच नाही. या सर्व विखारी विरोधाचा खरपूस समाचार मोदी यांनी आपल्या भाषणात घेतला. तसेच आपण सामान्य माणसाच्या समस्या सोडवितो आणि देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी अहोरात्र झटतो आहोत, म्हणूनच जनता आपल्याला वारंवार निवडून देते; ही गोष्ट मोदींनी स्पष्ट केली.
मोदी सहसा आपल्यावरील टीकेला उत्तर देत नाहीत. मात्र, यावेळी त्यांनी काँग्रेसच्या या हीन टीकेचा चांगलाच समाचार घेतला. गेली 25 वर्षे आपल्यावर टीका केली जात आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, “आपण देशाची जी प्रगती केली, त्यामुळे काँग्रेस सरकारची कारकीर्द किती कुचकामी होती, हेच सिद्ध झाले. त्याचाच राग काँग्रेसला आहे. आपल्या जन्मापूव नर्मदा सरोवर धरणाचे काम सुरू झाले होते; पण आपण पंतप्रधान झाल्यावर ते धरण पूर्ण केले गेले, यावरून काँग्रेसचा कारभार किती विकासविरोधी होता, ते दिसून येते. काँग्रेसची हीच संस्कृती देशाच्या विकासाच्या आड येत होती म्हणून देश आज मागास राहिला,” हेही त्यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांची भाषा जरी ‘मोहब्बत की दुकाना’ची असली, तरी या दुकानात मोदीद्वेष किती ठासून भरला आहे, तेही यानिमित्तान देशासमोर आले. आपल्या सरकारने देशहितासाठी केलेल्या अनेक कामांची यादी मोदी यांनी वाचून दाखविली आणि मोदीविरोधी द्वेष कुठून उगम पावतो आहे, त्याचे खरे कारण दाखविले.
भारताचा दबदबा जगात वाढत असून, अमेरिका आणि युरोपियन महासंघासारख्या शक्ती भारताच्या अटींवर त्याच्याशी व्यापारी करार करण्यास आपणहून तयार होत असल्याचे दिसत असल्याने विरोधकांचा जळफळाट होत आहे. हा विखार आजवर शब्दांतून बाहेर पडत होता; पण आता काँग्रेसला सत्तेचा विरह सहन होत नसल्याने मोदींना थेट शारीरिक दुखापत करण्यापर्यंत त्या पक्षाचे आणि त्याच्या नेत्यांचे स्खलन झाले आहे.