
विद्येला शरण जाऊन अध्ययन करत देशविदेशांतून गौरव प्राप्त केलेल्या, व्याकरणकार नागेशभट्टांच्या गुरुपरंपरेतील पारंपरिक विद्वान ‘व्याकरणचूडामणि’ डॉ. मल्हार अरविंद कुळकर्णी यांच्याविषयी...
सा.‘विवेक’चे माजी संपादक, दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘धर्मभास्कर’ मासिकाचे प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीचे लेखक अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचे चिरंजीव डॉ. मल्हार कुळकर्णी. ‘धर्मभास्कर’ मासिकासाठी लेखन करताना मल्हार यांच्या वडिलांनी अर्थात अरविंद कुळकर्णी यांनी, तेथील संपादक संस्कृतपंडित प्रा. अवधूतशास्त्री तुळापूरकर यांना मल्हार यांना संस्कृत शिकवण्याची विनंती केली. त्या विद्यादानाप्रीत्यर्थ वडिलांनी नियमित लेखांचे मानधनही स्वीकारले नाही. त्यामुळे वयाच्या आठव्या वष मल्हार यांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन सुरू झाले. नित्यनेमाने सकाळी 6 वाजता ते गुरुजींकडे जाऊन ‘रघुवंश’, ‘लघुसिद्धांतकौमुदी’, ‘अमरकोश’ इत्यादि ग्रंथांचे अध्ययन करत. त्यामुळे त्यांना संस्कृतची गोडी तर निर्माण झालीच, पण शालेय संस्कृत अभ्यासक्रमापेक्षा काहीतरी वेगळे अभ्यासण्याचीही सवय लागली. यातूनच त्यांनी दहावीमध्ये क्रीडादिनाला संस्कृतमधून क्रिकेट सामन्याचे उत्स्फूर्त समालोचन केले. गुरुजींच्या मार्गदर्शनाने त्यांनी पारंपरिक ग्रंथांसोबत बोली आणि ऐहिक संस्कृतचे ज्ञानही आत्मसात केले.त्यांच्या संस्कृत समालोचनाला सर्व स्तरांतून उत्तम दाद मिळाल्याने, त्यांनी संस्कृतमध्येच आणखी शिक्षण घेण्याचा निर्धार केला.
मुंबई विद्यापीठातून ‘बीए संस्कृत’ची पदवी प्रथम क्रमांकाने मिळवताना, सुवर्णपदकही मिळवले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये आले. पुणे विद्यापीठात ‘व्याकरण’ विषयात पदव्युत्तरचा अभ्यास करत असतानाच, 17व्या शतकातील व्याकरणकार नागेशभट्ट यांच्या गुरुपरंपरेतील विद्वान वामनशास्त्री भागवत यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांच्याकडून मल्हार यांनी महाभाष्ये, ‘शब्दकौस्तुभ’ इत्यादि असंख्य ग्रंथातील ज्ञान मिळवले. गुरुजींच्या ‘सिद्धान्तकौमुदी’च्या 250 कॅसेट्स ऐकलेल्या जगाभरातील फक्त दोन विद्यार्थ्यांमध्ये मल्हार यांचे स्थान आहे. 150 वर्षांपूव न्या. महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन ‘वेदशास्त्रोत्तेजक सभा’ संस्थेच्या परीक्षा देऊन, भागवतगुरुजींनी ‘व्याकरणचूडामणि’ पदवी संपादन केली होती; भविष्यात तीच पदवी मल्हार यांनीही मिळवली. पुढे त्याच संस्थेचे उपाध्यक्षपद आणि परीक्षामंडळाचं अध्यक्षपद भूषवण्याचा मानही मल्हार यांना आज मिळाला आहे.
प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदक मिळवण्याची कामगिरी मल्हार यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्येही कायम ठेवताना, सोबतच ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप’ मिळवून पुणे विद्यापीठात ‘पीएचडी’चे अध्ययनही सुरु केले. पाणिनीय अष्टाध्यायीचे विवरण करणाऱ्या काशिकावृत्तीच्या जगभरात परसलेल्या 200 प्रतींपैकी, पुरातन मूळ प्रत शोधण्याचे ते काम करू लागले. त्यासाठी दोन वर्षे स्वित्झर्लंडला जाऊन त्यांनी ‘पीएचडी’ संपादन केली. त्याच काळात ते पुणे विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून अध्यापनही करू लागले. सोबतच त्यांनी काशिकावृत्तीविषयी आणि इतर काही विषयांवर पुस्तकेही लिहिली.
2003 साली त्यांना ‘आयआयटी मुंबई’ मधून संस्कृतचा प्राध्यापक म्हणून पाचारण करण्यात आले. ‘आयआयटी’ संस्थानात संस्कृत अध्यपनाकरिता नियुक्त झालेले, भारतातील पहिले पूर्ण वेळ प्राध्यापक होण्याचा मान त्यांना मिळाला. तेथे ते ‘बीटेक’ आणि ‘एमटेक’च्या मुलांना ‘इलेक्टिव्ह’ विषय म्हणून संस्कृतातील पाणिनीय व्याकरण शिकवतात. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजतागायत 14 विद्यार्थ्यांनी ‘पीएचडी’देखील मिळवली आहे. तेथील कम्प्युटर सायन्सच्या एका वरिष्ठ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मल्हार यांनी, संस्कृतमधील ‘वर्डनेट’ नामक कोशाचीही निर्मिती केली. यामध्ये संस्कृत शब्दांचे अर्थ आणि संकल्पना उदाहरणासहित उपलब्ध आहेत. हा कोश 13 भारतीय भाषांतील कोशांशी जोडला गेला असून, पारंपरिक संस्कृत व्याकरणाचा आजच्या संगणकीय जगाशी मेळ घालण्याचा प्रयत्न यानिमित्ताने मल्हार यांनी केला आहे. तसेच ‘शब्दमित्र’नामक भाषाशिक्षणाचं एक टूलची निर्मिती त्यांनी केली. यातून हसतखेळत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात विविध संस्कृत शब्दांचे ज्ञान मिळते. त्या टूलसाठी त्यांना पेटंटही मिळाले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पारंपरिक संस्कृत साहित्यात भर घालण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने डॉ. मल्हार यांनी, ‘शब्दसूत्र’नामक सूत्रमय ग्रंथाचीही रचना केली. त्यातील काही सूत्रे प्रकाशितही केली आहेत. ‘कोविड’ काळात त्यांनी ‘कोविड कोविद’ या महाकाव्याचीदेखील त्यांनी रचना केली आहे; मात्र अद्याप त्याचे प्रकाशन झालेले नाही. तसेच, ‘चमत्कारभागवत’, ‘विसप्रसाद’सारखे काही सूत्रमय ग्रंथही त्यांनी रचले आहेत.
डॉ. मल्हार यांना 2009 साली भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ‘महर्षि बादरायण व्यास पुरस्कार’ मिळाला आहे. यासह स्वित्झर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली, थायलंड, जपान, जर्मनी अशा देशांतून त्यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. ‘आयआयटी मुंबई’नेही 2017 मध्ये ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरवही केला. तसेच, ‘सुमती आणि आत्माराम कोतवाल संस्कृत आचार्य अध्यासन प्राध्यापक’ म्हणूनही ‘आयआयटी मुंबई’ने त्यांचा गौरव केला आहे. 2027च्या ‘जागतिक संस्कृत परिषद’चे आयोजन ‘आयआयटी मुंबई’मध्ये होणार असून, त्याच्या मुख्य आयोजकपदाची जबाबदारीही डॉ. मल्हार यांच्याकडेच सोपवण्यात आली आहे.
सध्या ते पारंपरिक वैज्ञानिक विद्या आणि आधुनिक विद्या यांचा समन्वय साधत, एक नवीन ग्रंथ रचण्याचे कामही करत आहेत. डॉ. मल्हार विलेपार्ले आणि ठाण्यातही पारंपरिक संस्कृतचे वर्ग घेत, तरुण विद्यार्थ्यांना ग्रंथ अभ्यासण्याचा भाषाविषयक शास्त्रीय वस्तुनिष्ठ दृष्टिकोन प्रदान करतात. “कोणतीही विद्या शिकताना मनात निष्कारणभाव असणे महत्त्वाचे असते. कोणत्याही प्रयोजनाशिवाय शिकल्यावरच आपल्याला त्यातील खरे मर्म गवसते,” असा उपदेश डॉ. मल्हार आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी करतात. ‘विद्यैक शरणत्व’ हे तत्त्व पाळत समर्पणभावाने काम करणाऱ्या संस्कृतअभ्यासक डॉ. मल्हार कुळकर्णी यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा!
- ओवी लेले
9869345753