2024 मध्ये जयपूरच्या भांककोटा परिसरात घडलेल्या एलपीजी टँकर स्फोटाने देशाला हादरवून सोडले. या घटनेला अवघी दोन वर्षे उलटली असतानाच, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर प्रोपोलीन गॅस टँकर उलटल्याने पुन्हा एकदा अशाच संकटाची छाया निर्माण झाली. दोन वेगवेगळ्या घटना, पण एकच प्रश्न आपत्तीच्या क्षणी प्रशासनाचे निर्णय किती महत्त्वाचे ठरतात? आगी, गॅसगळती आणि वाहतूक ठप्प झालेल्या परिस्थितीत घेतलेला संयमित व संवेदनशील निर्णयच लाखो जीव वाचवू शकतो, हे या घटनांनी अधोरेखित केले आहे. त्याविषयी...
जयपूरच्या भांककोटा परिसरात उजाडलेली ती सकाळ आजही अंगावर काटा आणते. वाहनांचे कर्कश हॉर्न, प्रवाशांची घाई, रोजच्या जगण्याचा नेहमीचा गोंगाट रस्त्यावर नेहमीसारखी धावपळ होती. पण, एका क्षणात काळाने उडी घेतली. एलपीजी गॅस टँकरला ट्रकची जोरदार धडक बसली आणि हवेत मृत्यूचा वास पसरू लागला. सुमारे 18 टन गॅस क्षणार्धात परिसरात पसरला. काही सेकंद शांततेचे आणि मग एक भीषण स्फोट, ज्याने अख्खा परिसर आगीच्या समुद्रात बुडाला...
जिथे काही क्षणांपूव माणसं प्रवास करत होती, तिथे आता फक्त ज्वाळा धगधगत होत्या. जीव वाचवण्यासाठी माणसं रस्त्यापासून दूर, शेताकडे धावत होती. कुणाचं शरीर पूर्ण भाजलेलं, कुणी वेदनेने बेशुद्ध होण्याच्या उंबरठ्यावर. तरी डोळ्यांत एकच ध्यास, जगायचं! जवळच कंडोई रुग्णालय होतं. मात्र, मधे आठ फूट उंच भिंत आणि अंगात उरलेली ताकद शून्य. तेव्हा शिडी जगण्याची शेवटची आशा बनून आली. एकामागून एक, वेदनांनी कण्हणारी माणसं त्या भिंतीपलीकडे पोहोचली. डॉक्टरांनी तातडीचा उपचार सुरू केला; पण काहींसाठी वेळ निघून गेलेली होती. दि. 20 डिसेंबर 2024 रोजी जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर ‘बीपीसीएल’चा एलपीजी टँकर यू-टर्न घेत असताना झालेल्या या अपघातात 15 जण जिवंत जळाले, तर 30 हून अधिकजण कायमचे जायबंदी झाले. हा केवळ अपघात नव्हता, तर व्यवस्थेची कसोटी होती.
आज ही दुर्घटना आठवण्यामागे कारण म्हणजे, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेली अभूतपूर्व वाहतुककोंडी. या प्रकरणी प्रशासनाने नेमके काय केले, याचे उत्तर एकाच शब्दात दडलेले आहे, संयम! संवेदनशीलतेने हाताळलेली परिस्थिती, वेळीच घेतलेले निर्णय, ज्यामुळे लाखो नागरिकांचे प्राण वाचू शकले. अचानक उद्भवलेली ही परिस्थिती अनेकदा व्यवस्थेची परीक्षा घेणारीच असते. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे अनेकदा नागरिकांचा रोषही ओढावू शकतो; मात्र यातून लाखो नागरिकांचे प्राण वाचणार असतील, तर तो रोषही योग्यच. असाच काहीसा अनुभव मंगळवार, दि. 3 आणि बुधवार, दि. 4 फेब्रुवारीला मुंबई-पुणे महामार्गावर घडलेल्या दुर्घटना आणि त्यानंतर हाताळलेल्या परिस्थितीतून दिसून येतो.
दुर्घटना नेमकी कशी घडली?
रायगड जिल्ह्यातील बोरघाट परिसरात मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मंगळवार, दि. 3 रोजी प्रोपोलीन गॅसने भरलेला टँकर उलटल्याने तातडीचा सुरक्षा इशारा जारी करण्यात आला. या घटनेनंतर मुंबई आणि पुणे दोन्ही दिशांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. गॅसगळती, बचावकार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे एक्सप्रेस-वे तब्बल 32 तास ठप्प राहिला. त्यामुळे हजारो प्रवासी, ज्यात वृद्ध, लहान मुले, महिला आणि पुरुष अडकून पडले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बोगद्याजवळील उतारावर टँकर चालकाला वेग नियंत्रणात ठेवता न आल्याने अपघात झाला. टँकरचे तीन व्हॉल्व खराब झाल्याने गळती तत्काळ थांबवता आली नाही. एनडीआरएफ, अग्निशमन दल, राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक आणि तेल कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तज्ज्ञांच्या मदतीने गॅस दुसऱ्या टँकरमध्ये स्थानांतरित करण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री 10.30 वाजता पूर्ण झाली. त्यानंतर टँकर क्रेनने हटवून एक्सप्रेस-वेची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. या कोंडीचा मोठा फटका सार्वजनिक वाहतुकीला बसला. ‘एसटी महामंडळा’च्या 139 बससेवा रद्द करण्यात आल्या, तर खासगी बस आणि पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरही असामान्य गद पाहायला मिळाली.
प्रोपोलिन गॅस किती हानिकारक?
रसायनशास्त्रविषयक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोपोलिन वायू हा अल्कीन गटातील एक हायड्रोकार्बन असून तो प्रामुख्याने इंधन म्हणून वापरला जातो. हा अत्यंत ज्वलनशील वायू असून टँकरमध्ये तो उच्च दाबाखाली द्रवस्वरूपात साठवला जातो. तापमानात थोडीशी वाढ किंवा अगदी लहानशी ठिणगीदेखील या वायूला पेट घेण्यासाठी पुरेशी ठरू शकते. मोठ्या प्रमाणात प्रोपोलिन वायू एकाच ठिकाणी साचल्यास केवळ आगच नव्हे, तर तीव्र स्फोट होण्याचीही शक्यता असते. प्रोपोलिन वायूला आग लागल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी ड्राय पावडर किंवा कार्बनडाय ऑक्साईडचा वापर केला जातो. महामार्गावर टँकर उलटल्यानंतर तत्काळ दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात येते; कारण वाहनांमधून निर्माण होणारी उष्णता, गरम हवा किंवा ठिणग्यांमुळे मोठी आग किंवा स्फोट होऊ शकतो. गॅसगळती सुरू असताना वाहतूक सुरू ठेवणे, अत्यंत धोकादायक ठरते. वाहनांच्या एक्झॉस्टमधून बाहेर पडणारे गरम वायूही या परिस्थितीत धोक्याची शक्यता वाढवतात. प्रोपोलिन वायू जड स्वरूपाचा नसल्याने तो जमिनीवर साचून राहात नाही, तर हवेत वेगाने मिसळून जातो. एलपीजी गॅसगळती झाल्यास, तो जमिनीवर आणि हवेत काही काळ टिकतो; तर सीएनजी हवेत पटकन विरून जातो. मात्र, प्रोपोलिन वायू कमी वेळात हवेत असला, तरी त्या काळात तो मोठ्या प्रमाणावर आग पसरवू शकतो. त्यामुळे गॅसगळती पूर्णपणे थांबवल्यानंतरच टँकर हलवणे सुरक्षित मानले जाते; गळती सुरू असताना टँकर हलवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
प्रशासन कुठे कमी पडले?
मंगळवार, दि. 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता दुर्घटना घडताच वेळेचे महत्त्व प्रचंड वाढले होते. अशा क्षणी केवळ अपघातस्थळापुरते उपाय पुरेसे नसतात; संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा दूरदृष्टीने विचार करावा लागतो. प्रशासनाने तत्काळ वाहतूक नियोजन करत मुंबईकडे जाणारी वाहने पुण्याच्या निर्गमनद्वारांवरच थांबवणे, तर मुंबईहून पुणे व पुढील भागांकडे निघालेली वाहतूक नवी मुंबई, खालापूर परिसरात रोखणे किंवा पर्यायी मार्गांकडे वळवणे अत्यावश्यक होते. अशा घटनांनी केवळ वाहतूक व्यवस्थेतील त्रुटीच नव्हे, तर महामार्गावरीलपायाभूत सुविधांचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर येतो. दीर्घकाळ महामार्ग बंद राहिल्यास प्रवाशांसमोर सर्वांत मोठी अडचण निर्माण होते, ती मूलभूत सुविधांची. दर एक किंवा किमान तीन किमी अंतरावर स्वच्छ, सुरक्षित महिला व पुरुष स्वच्छतागृहे आणि उपहारगृहे असणे, ही आता गरज नसून अनिवार्यता ठरली आहे. याचबरोबर प्रथमोपचार केंद्रांची उभारणी तितकीच महत्त्वाची आहे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी वृद्ध, महिला आणि लहान मुलांना तातडीची वैद्यकीय मदत मिळाल्यास अनेक जीव वाचू शकतात. महामार्गकेवळ वेगासाठी नसतात, तर संकटाच्या क्षणी आधार देणारी व्यवस्था असायला हवी, हेच अशा दुर्घटनांनी अधोरेखित होते.
आपत्कालीन परिस्थितीची पूर्वतयारी आवश्यक
ज्वलनशील पदार्थ किंवा रसायन वाहतूक करणारे गॅस टँकर पलटी होणे, अपघात होणे किंवा आग लागणे अशा केसेसमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक आहे. हे नियोजन करताना सर्वच घटकांचा विचारही होणे आवश्यक आहे. त्यामुळेच महामार्गांवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, तेव्हा महामार्गाशी संबंधित असणाऱ्या सर्व संस्था आणि प्रशासन यांची एकत्रित टास्क फोर्स कामाला लावणे आवश्यक आहे. काल घडलेल्या घटनेनंतर अशी एकत्रित कोणतीही टास्क फोर्स उभी करण्यात आली नाही. महामार्ग थेट लोकांशी संबंधित महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे इथे कायमस्वरूपी तातडीच्या उपाययोजना आणि खबरदारी, तसेच अशावेळी जनजागृतीही होणे आवश्यक आहे. यासाठी आरक्षित निधीही असणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा वेळी कोणत्याही निधीसाठी अडवणूक होणार नाही. ‘हाय रिस्क व्हेईकल्स’चे वगकरण होणे गरजेचं आहे. अशा प्रकारची वाहतूक करणारी एकूण किती वाहने रस्त्यावर धावतात, याचा डेटा आणि मार्ग यंत्रणांकडे असणे आवश्यक आहे. जो डेटा आजतागायत कोणत्याही यंत्रणांकडे उपलब्ध नाही. जेव्हा असे गॅस टँकर पलटी होतात, तेव्हा या क्षेत्रातील तज्ज्ञ तातडीने यात काम करू शकतात. वाहतुककोंडी आणि इतर बाबी लक्षात घेता, अशा तज्ज्ञांना तत्काळ एअरलिफ्ट करून स्पॉटवर पाठवणे गरजेचं आहे, जे केले जात नाही. एअरलिफ्ट केल्यास वेळही वाचतो आणि त्वरित वाहतूक रिलिफ देणे शक्य होते. बचावकार्याचे लेव्हल-1, लेव्हल-2 आणि लेव्हल-3 असे वगकरण केले पाहिजे. यामुळे ‘हाय रिस्क ॲक्सिडेन्ट’, ‘मिडियम रिस्क’ आणि ‘लो रिस्क ॲक्सिडेन्ट’प्रसंगी त्या प्रकारच्या उपाययोजना पूर्वतयारीने आखून ठेवलेल्या असतील.
- अभिजीत वाघमारे, महामार्ग सुरक्षा तज्ज्ञ
प्रशासनाने राबविलेल्या आपत्कालीन उपाययोजना
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेच्या चौकशीचे निर्देश
‘एमएसआरडीसी’कडून ‘आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी)’ तत्काळ कार्यान्वित
एफएम रेडिओ, सोशल मीडिया आदी विविध माध्यमांच्या माध्यमातून जनजागृती
वेळोवेळी एक्सप्रेस वे वरील वाहतूक परिस्थितीबाबत प्रवाशांना माहिती
नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे व पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
वाहतुककोंडीत अडकलेल्या प्रवाशांना शक्य तिथे पाण्याच्या बाटल्या व खाद्यपदार्थांचे पॅकेटचे वितरित
टोलनाक्यावरुन वाहनांना विनामूल्य प्रवेश व निर्गमनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, यावर शिफारसी मागवल्या
आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करण्याचे निर्देश