दरवषप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, देशभरातून मोठ्या संख्येने विद्याथ या उपक्रमात सहभागी होणार आहेत. परंतु, हा उपक्रम म्हणजे केवळ शिक्षण, अध्ययन आणि परीक्षेमुळे येणारा ताण घालवण्यासाठीचे मार्गदर्शन नव्हे. आजचे विद्याथ हे ‘विकसित भारत-2047’चे अग्रदूत आहेत. जी मुले शिकताना कुठलीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने नवोन्मेष करून आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाच्या मुळांना धरून राहून जगाच्या संपर्कात येत आहेत आणि ‘विकसित भारता’ला आकार देत आहेत.
परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम भारताच्या शैक्षणिक प्रवासात मूकपणे; पण निर्णायक बदल घडवून आणणारा ठरला आहे. माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली 2018 मध्ये केवळ ‘वार्षिक संवाद’ या स्वरूपात सुरू झालेल्या या उपक्रमाला आता आपसूकच जनआंदोलन म्हणजे लोकचळवळीचे रूप प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण हित हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून, त्याचबरोबर या सामायिक जबाबदारीत पालक आणि शिक्षकांना सक्रिय भागीदार मानून राबविला जाणारा हा आता देशव्यापी सामूहिक प्रयत्न बनला आहे.
यावर्षी त्यातील सहभागाचे प्रमाण पाहता, या उपक्रमाची व्याप्ती खोलवर पोहोचल्याचे अधोरेखित होते. यंदा शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी 4.5 कोटींहून अधिक जणांनी नावनोंदणी केल्याने मागील वष नोंदवला गेलेला ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मोडीत काढत ‘परीक्षा पे चर्चा’ने निव्वळ संवादापासून आपलेपणाची भावना निर्माण करण्यापर्यंतचा मोठा टप्पा पार केला आहे. प्रत्येक तरुणाला शिकता येईल, स्वतःची प्रगती करता येईल आणि खऱ्या अर्थाने उत्कर्ष साधता येईल, असे सक्षम वातावरण निर्माण करण्याचा सामूहिक निर्धार या अभूतपूर्व सहभागातून प्रतित होतो.
पंतप्रधानांच्या प्रेरणादायी नेतृत्वाचा प्रभाव
शिक्षण, अध्ययन आणि परीक्षेमुळे येणारा ताण अशा मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्याथ यांच्यात होणाऱ्या संवादात सहानुभूती, व्यावहारिकता आणि प्रेरक नेतृत्व या गोष्टींचा अनोखा संगम दिसून येतो. साधेपणा, शिस्त, आर्शीवाद आणि मानवी क्षमतेवर गाढ विश्वास असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने लाखो तरुणांच्या मनांवर जबरदस्त छाप पाडली आहे. अधिकृत शिष्टाचाराच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन शिक्षक, मार्गदर्शक आणि हितचिंतक बनून विद्यार्थ्यांशी सहजपणे जोडले जाण्याच्या त्यांच्या अंगभूत क्षमतेमुळे पंतप्रधान इतरांपेक्षा वेगळे ठरतात. त्यांच्या किस्से सांगत संवाद साधण्याच्या आणि कोणालाही आपल्यासारखेच वाटतील अशा पद्धतीने वागण्याच्या हातोटीमुळे विद्यार्थ्यांना कुणीतरी आपले ऐकणारे आणि आपल्याला समजून घेणारे आहे, असे वाटते. ते मायेने, विनोदाने आणि सच्चेपणाने बोलतात, बरेचदा ते आपल्या स्वतःच्या जीवनातील अनुभवांमधून चिकाटी, एकाग्रता आणि कणखरपणाबद्दलचे मोठे धडे देतात. या त्यांच्या खास ‘पर्सनल टच’मुळे परीक्षेमुळे येणारा ताण दूर होण्यास आणि विद्यार्थ्यांसाठी आश्वासक वातावरण तयार करण्यास मदत होते.
प्रत्येक मूल एकमेवाद्वितीय आहे हे मान्य करणे
प्रत्येक मूल वेगळे असते ही एक साधी; पण स्पष्ट वस्तुस्थिती त्यांच्या या प्रयत्नांचा मुख्य गाभा आहे. प्रत्येक मूल वेगळ्या पद्धतीने शिकत असते, ते त्याच्या स्वतःच्या गतीने वाढत असते आणि त्याच्यात अशी प्रतिभा असते, जिचे मोजमाप फक्त गुण किंवा क्रमवारीपुरते मर्यादित असू शकत नाही.
परीक्षांची जी एकंदर रचना आहे, त्यामध्ये मुलाच्या क्षमतेचा फक्त एक छोटासा अंशच टिपला जातो. खरी सर्जनशीलता आणि उत्कृष्टता समग्र विकासातून पुढे येते. एखादे मूल गणितात आपली हुशारी दाखवू शकते, दुसरे कलात्मक कल्पनाशक्ती दाखवू शकते, तर आणखी एखादे करुणा भावनेने दुसऱ्याच्या वेदना बऱ्या करणारे होऊ शकते. हे फरक म्हणजे, त्यांच्यातील उणिवा नाहीत; तर ते वैविध्यपूर्ण, लवचीक आणि नावीन्यपूर्ण समाजाचा पाया आहेत.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020’च्या तत्त्वज्ञानाविषयी चिंतन
हेच तत्त्व ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020’च्या केंद्रस्थानी आहे. या धोरणाच्या चौकटीत राहून खराखुरा बालकेंद्रित दृष्टिकोन ठेवून सर्जनशीलतेची जोपासना, चिकित्सक विचार, भावनिक बुद्धिमत्ता, शारीरिक आरोग्य आणि नैतिक मूल्यांची जडणघडण करण्यावर भर देऊन अध्यापनशास्त्र, अभ्यासक्रम आणि मूल्यांकन प्रणालींमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. सुरुवातीच्या काळात खेळांवर आधारित शिक्षणावर भर देताना जिज्ञासा आणि आनंद हे आयुष्यभराच्या शिक्षणाचा सर्वात भक्कम पाया असल्याचे लक्षात घेतले गेले आहे.
प्रारंभीच्या प्राथमिक टप्प्यात मातृभाषेतून शिक्षण देण्यामागे मुलाला संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास सक्षम बनवणे, हा उद्देश आहे. त्याचवेळी बहुभाषिकतेवर भर देऊन आपल्या सांस्कृतिक आणि भाषिक मुळांबद्दल आत्मविश्वास बाळगणारी आणि जागतिक पटलावर भारतीय ज्ञान-व्यवस्था पुढे घेऊन जाऊ शकेल, अशी पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
मूल्यमापनात केलेल्या सुधारणांतून हाच हेतू प्रतिबिंबित होतो. प्रथमच दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्यास मदत होईल. या परीक्षांमध्ये जणू सर्वस्व पणाला लागते,असा समज असलेल्या या उच्चस्तरीय परीक्षेचे दडपण कमी करण्यासाठी आणखी वाव मिळेल. केवळ शैक्षणिक निकालच नाही, तर विद्यार्थ्यांच्या सामाजिक-भावनिक आणि शारीरिक विकासाचाही 360 अंशातून सर्वांगीण मागोवा घेणारी प्रगतिपुस्तके सादर करण्यात आली आहेत. कल्याण हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असल्याने प्रत्येक ‘सीबीएसई’ शाळेमध्ये सामाजिक-भावनिक समुपदेशक असणे अनिवार्य केले असून, ते विद्यार्थ्यांना रोजच्या रोज येणाऱ्या शैक्षणिक आणि भावनिक ताणतणावांचा सामना करण्यासाठी मदत उपलब्ध करून दिली जात आहे. अंतिमतः आपल्या समोरची जबाबदारी स्पष्ट आहे; विद्यार्थ्यांना जबरदस्तीने एकाच साच्यात न बसवता प्रत्येकाचे अनोखे बलस्थान ओळखणे, त्यांना साहाय्य करणे आणि ते विकसित करणे.
समग्र शिक्षण - महत्त्वाचा केंद्रबिंदु
आजचे शिक्षण आता केवळ पाठ्यपुस्तके, परीक्षा आणि घोकंपट्टी करून उत्तीर्ण होण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. ‘समग्र शिक्षण’ हे ध्येय ठळकपणे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. केवळ उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीच्या जोरावर विद्याथ 21व्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी तयार होऊ शकत नाहीत, हे स्पष्टपणे लक्षात घेतले गेले आहे. चिंता, भीती किंवा भावनिक ताणाच्या ओझ्याखाली मुले खऱ्या अर्थाने शिकू शकत नाहीत. मन एकाग्र करणे, प्राणायाम आणि योग यांसारख्या भारताच्या सांस्कृतिक परंपरा यातून मार्ग काढण्याचा उपाय देण्याचे शाश्वत साधन ठरू शकतात. या पद्धती मुलांना त्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास, आपले निश्चित ध्येय ठरविण्यास, शांतता आणि चिकाटी निर्माण करण्यास पूरक आहेत. परीक्षेच्या तयारीसाठी त्यांची मदत होण्यासोबतच, वर्गाच्या भिंतींपलीकडचे शैक्षणिक ज्ञान देण्यासोबतच भावनिक शहाणपण, निसर्गाशी संतुलन आणि आंतरिक जागरूकतादेखील विकसित त्यांच्यामुळे होते.
समोर असलेली आव्हाने
तरीही, आपल्याला आज आपल्यासमोर स्पष्टपणे दिसत असलेल्या एका आधुनिक आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. डिजिटल साधनांचा अतिरिक्त वापर आणि ‘स्क्रीन टाईम.’ दीर्घकाळच्या संपर्कामुळे एकाग्रतेने काम करण्याचा अवधी कमी होत आहे, यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येण्याबरोबरच मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडत आहे. सतत कनेक्टेड राहणे, ऑनलाईन तुलना आणि ‘डिजिटल ओव्हर स्टिम्युलेशन’मुळे बहुतेकदा परीक्षेच्या ताणात अधिकच भर पडते आणि मुलांमध्ये जी एकाग्रता आपल्याला वाढवायची असते, तिलाच धक्का बसतो. याबाबतीत पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे कृती करण्याची आवश्यकता आहे. डिजिटल उपकरणांच्या वापराबाबत मुलांना योग्य मर्यादा ठरवून देऊन शारीरिक हालचाल, सर्जनशील उपक्रम आणि कौटुंबिक संवाद यांसारख्या पर्यायांना प्रोत्साहन देऊन आपण बिघडलेला समतोल पूर्ववत करू शकतो.
मुले प्रगतीचे अग्रदूत
‘विकसित भारत’चे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करणे आवश्यक आहे. जेव्हा मुलांना त्यांच्यातील अद्वितीय शक्तींचा शोध घेण्याची आणि विकसित करण्याची मोकळीक असते, तेव्हाच देश सर्जनशीलता, समावेशकता आणि सामूहिक प्रगती यामध्ये पुढे जाऊ शकतो.
कृत्रिम प्रज्ञेच्या युगात कुतूहल आणि समस्यांवर उपाय काढणे यातील अंतर कमी झाले आहे. शिक्षक आणि पालक म्हणून या उपायांचा शोध घेण्यास वाव देणे, ही आपली भूमिका आहे. यासाठी मुलांना नवनवीन प्रयोग करण्यासाठी योग्य साधने मिळण्याबरोबरच त्यामध्ये अगदी अपयश आले, तरी त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास आणि नवोन्मेषाचे स्वातंत्र्य देऊन सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळत राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
आजचे विद्याथ हे ‘विकसित भारत-2047’चे अग्रदूत आहेत. जी मुले शिकताना कुठलीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने नवोन्मेष करून आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाच्या मुळांना धरून राहून जगाच्या संपर्कात येत आहेत, ती वर्तमानात ‘विकसित भारता’ला आकार देत आहेत. मेंदू, मन आणि हात या गोष्टी विचारात घेऊन आखलेल्या, क्षमतांची कदर करणाऱ्या, हेतूंना खतपाणी घालणाऱ्या आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यास तयार करणाऱ्या शिक्षण प्रणालीचे त्यांना पाठबळ असले पाहिजे. तरुण पिढीला भीतीपासून मुक्त करणे आणि ‘इंडिया-2047’साठी आत्मविश्वासाने भरलेले नागरिक तयार करणे, हीच ‘परीक्षा पे चर्चा‘ उपक्रमाची भावना आहे.
- धर्मेंद्र प्रधान
(लेखक केंद्रीय शिक्षणमंत्री आहेत.)