मशिदी आणि ग्रीस...

    06-Feb-2026   
Total Views |

ग्रीसमध्ये राहायचे असेल, तर कायदे पाळले पाहिजेत. देशभरात सर्वेक्षण केले जाईल. अनधिकृत मशिदी असतील, तर त्या तोडल्या जातील आणि त्या मशिदी उभे करणाऱ्यांना त्यांच्या देशात तत्काळ पाठवले जाईल,” असे म्हणत ग्रीस सरकारने देशातील अथेन्स शहरातील 60 मशिदींना अनधिकृत ठरवत, संबंधित व्यक्तींना देशाबाहेर पाठवण्याची तयारी सुरू केली. अर्थात, अनधिकृतरित्या मशिदी उभे करणारे हे पाकिस्तान, बांगलादेश आणि आफ्रिका खंडातील मुस्लीम देशातील मुस्लीमच आहेत. ग्रीसच्या राजधानीत एकही मशीद नसायलाच हवी, असा ग्रीसच्या शासन, प्रशासन आणि बहुसंख्य 98 टक्के ख्रिश्चन असलेल्या जनतेचा ठाम आग्रह आहे.

असो. ग्रीसमध्ये मशिदीविरोधात हा निर्णय घेण्याचे कारण म्हणजे, बांगलादेशातील नागरिक असलेल्या एका मुस्लीम व्यक्तीने अथेन्स शहरात अनधिकृतरित्या मशीद उभी केली. ग्रीसमध्ये मशीद उभी करण्यापूव ग्रीस सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे आणि ती परवानगी न देण्याचा ग्रीस सरकारचा अलिखित निर्णय आहे. जागा अडवून पहिले मजार, मग दर्गा, मग मदरसे, मग मशिदी वगैरे वगैरे उभ्या राहिल्या, अशा अनेक घटना आपण आपल्या भारतात घडलेल्या पाहतो. वाहतुकीच्या रस्त्यावर, ट्रेनमध्ये, कार्यालयामध्ये किंवा मशीद सोडून इतर अनेक जागेत, मग हिंदूंच्या वस्तीमध्येही मुस्लीम मोठ्या संख्येने नमाज पढताना आपण पाहतो. पण, ग्रीसमध्ये मुस्लीम दीड टक्का आहेत. इथे सार्वजनिक ठिकाणी नमाज पढू शकत नाही, तसे केले तर चांगलीच शिक्षा. त्यामुळे इथले लोक गॅरेज, तळघर किंवा घरात नमाज पढतात. या मुद्द्यावर जगभरातल्या मुस्लीम राष्ट्रांनी ग्रीसवर सातत्याने टीका केली. त्यामुळे 2020 साली ग्रीसमध्ये सरकारी अधिपत्याखाली असलेली पहिली मशीद निर्माण झाली. पण, त्या मशिदीला मिनारही नाहीत आणि मशिदीवर मुस्लीम संस्कृती दर्शवणारी प्रतिकेही नाही. मशिदीचे संचालन करणाऱ्या सरकारी समितीमध्ये नऊजण असून, त्यापैकी सात ख्रिस्ती; तर दोन सरकार पुरस्कृत मुस्लीम व्यक्ती आहेत. मशिदीच्या दैनंदिन गतविधी पूर्णतः सरकारच्या अधिपत्याखाली आहेत.

ग्रीसमध्ये मशिदीवर इतके निर्बंध का? तर याचे उत्तर आहे, ग्रीसचा इतिहास. ग्रीसची प्राचीन संस्कृती ही सुसंस्कृत आणि प्रगतिशील होती. अलेक्झांडर राजा, त्याचबरोबर पायथागोरस, डेमोक्रेटिस, सुकरात, प्लेटो, अरस्तू वगैरे महान तत्त्ववेत्ते हे ग्रीसचेच. ऑलिम्पिक खेळ, लोकशाही वगैरे ग्रीसच्या संस्कृतीची मानके होती. मात्र, 14व्या शतकामध्ये तुर्कस्तानच्या ऑटोमन साम्राज्याने ग्रीसवर विजय मिळवला. 18व्या शतकापर्यंत ही राजवट होती. या चार शतकांमध्ये इस्लामिक आक्रांतांनी ख्रिश्चनांचा अतोनात छळ केला. महिलांना, बालकांना गुलाम बनवले. मुघलांच्या काळात जसा हिंदूंवर ‌‘जिझिया‌’ कर होता, तसेच ग्रीसमध्येही ख्रिश्चनांवर कर लादला होता. पुढे ऑटोमन साम्राज्याने निर्णय घेतला की, राज्यात ख्रिश्चन नकोच. त्यांनी लाखो ख्रिश्चनांचे सामूहिक हत्याकांड केले. 1821 मध्ये तुर्कीये साम्राज्याचा गव्हर्नर युसूफ बे याने आदेश दिले की, “ग्रीसच्या रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक ख्रिश्चन व्यक्तीला मारा. त्याचे शिर कापून ते मला भेट द्या.” दरम्यान, ऑटोमन साम्राज्य लयास जाऊ लागले. याच काळात ग्रीस स्वतंत्र झाला. तुर्कीयेने तुर्कस्तानातले ख्रिस्ती ग्रीसमध्ये पाठवायचे आणि ग्रीसने इकडचे मुस्लीम तुर्कस्तानात पाठवायचे, हा करार झाला. ग्रीसने आपल्याकडचे मुस्लीम तुर्कस्तानात पाठवण्यात जराही चूक केली नाही. तरीही, काही कारणाने मुस्लीम देशातले मुस्लीम इथे आलेच. पण, 400 वर्षांच्या सत्ताकाळात तुर्कीयेच्या साम्राज्याने आपल्या पूर्वजांसोबत जी क्रूरता केली, ती क्रूरता ग्रीसचा एकही नागरिक विसरला नाही. त्यामुळे ग्रीस शासन सतर्क, दीड टक्के मुस्लिमांबद्दल सावध आहे. ग्रीसच्या बहुसंख्याकांच्या तिथल्या अल्पसंख्याकांबद्दलच्या भावना तशा का आहेत, हे भारतातील बहुसंख्य असलेले लोक नक्कीच समजू शकतात. यावर वाटते की, मुस्लीम राजसत्तेने लादलेला तो ‌‘जिझिया‌’ कर तो तैमुर, तो खिलजी, तो औरंगजेब, त्यांचे ते क्रूर अत्याचार, याबाबत भारतीय काय विचार करतात? एकंदर ग्रीसकडून भारतातील बहुसंख्य हिंदूंना शिकण्यासारखे खूप काही आहे.  

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.