मनसेची 2029च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीची धावाधाव आताच सुरू झालेली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तशा सूचना पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना गुरुवारी दिल्या. 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच संघटनात्मक बांधणी करण्याची गरज राज ठाकरेंनी व्यक्त केली. मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना तातडीने पदाधिकाऱ्यांचे संख्याबळ, महिला आणि तरुण कार्यकर्त्यांबाबत माहिती गोळा करण्याचे निर्देशही दिले गेले. मुळात हा साक्षात्कार राज ठाकरेंना आताच का झाला की, उबाठाकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आलेला अनुभव पाहून तर ही धावाधाव सुरू झाली नसेल? कारण, महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला झाला असून, राज ठाकरेंना आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी पाहायला मिळाली. संतोष धुरी, प्रकाश महाजन, राजा चौगुले, हेमंत कामबळे, मंदा पाटील, कस्तुरी देसाई यांच्यासारखे काही मनसेचे शिलेदार तर चक्क पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करून बाहेर पडले. हीच पुनरावृती विधानसभेला पाहायला नको म्हणून राज ठाकरेंनी आतापासूनच खबरदारी घेण्याचे पाऊल उचललेले दिसते. ‘
‘आम्ही एकत्र आलोय, ते कायमच एकत्र राहण्यासाठी,’ असे ठाकरे बंधू आणि संजय राऊत सांगत होते, तोवर राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीचे नियोजनही स्वतंत्रपणे सुरू केले. एकीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण आले असताना, राज ठाकरेंनी काळाची पुढची पावले ओळखून आपली पक्षगळती थांबवण्यासाठी तर हा निर्णय घेतला नसेल? पण, सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे कुठेही दिसत नाही. त्यामुळे त्यांना मानणारा मतदार दुसरा पर्याय शोधणार, यात शंका नाही.
फक्त मुंबई महापालिका महत्त्वाची आणि इतर निवडणुकांत नियोजनशून्य कारभार, असा हा सगळा प्रकार. त्यामुळे कार्यकर्त्यांना जर कार्यक्रम नसेल, तर ते किती दिवस राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणार? त्यांना दुसरा पर्याय शोधावाच लागणार. म्हणूनच, आतापासून राज ठाकरे काहीतरी कार्यक्रम द्यायच्या तयारीत आहेत. पण, नेहमीप्रमाणे त्यांचे वेग धरुन मग एकाएकी ठप्प होणारे इंजिन, आगामी विधानसभा निवडणुकीत किती वेगाने धावते, ते आता पाहायचे.
महापौरपदाची तळमळ
मुंबई महानगरपालिकेत महायुतीने मोठा विजय मिळवून उद्धव ठाकरे यांच्या हातून महानगरपालिकेची सत्ता खेचून आणली. त्यानंतर उद्धव ठाकरे कासावीस झाले असून, महापौर आणि उपमहापौर पदाबाबत बहुमत नसतानाही उमेदवार देण्याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी किशोरी पेडणेकर यांसह आपल्या प्रमुख नगरसेवकांची बैठक काल ‘मातोश्री’वर बोलावली होती. मुंबई महानगरपालिकेत सत्ता गमावल्यापासून उद्धव ठाकरेंची अस्वस्थता वेळोवेळी समोर आली आहे. “देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल,” असे वक्तव्यही त्यांनी काही दिवसांपूव केले होते. ठाकरे बंधूंच्या युतीचा प्रभाव पडून महानगरपालिका आपल्या हातात राहील, अशी त्यांची अपेक्षा होती; पण ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्यांना ‘देव’ आठवले. एरव्ही, त्यांना मौलवी आठवत असतात.
मुंबई महानगरपालिकेत बहुमत नसतानाही महापौर आणि उपमहापौर पद मिळण्याची स्वप्ने ठाकरे आपल्या नगरसेवकांना का दाखवत आहेत, हाच खरा प्रश्न. उद्धव ठाकरेंना तोंडावर आपटण्याची सवयच झालेली दिसते. त्यामुळे महापौरपदाबाबतसुद्धा ते तोंडावर आपटणार, हे वेगळे सांगायला नको. दुसरीकडे मुंबईच्या महापौरपदाबाबत मनसेने मात्र पूर्णतः मौन बाळगले आहे. पण, उद्धव ठाकरे मात्र उसने अवसान आणून उगाच काहीतरी ‘ट्विस्ट’ निर्माण करण्याचे भासवत आहेत.
मुंबई महापालिकेत एकूण 227 नगरसेवक आहेत. महापौरपदासाठी 114 हा बहुमताचा आकडा. निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 89 नगरसेवक निवडून आले आहेत; तर उबाठा गटाचे 65, शिवसेना 29, काँग्रेस 24, मनसे सहा, एमआयएम आठ, राष्ट्रवादी काँग्रेस तीन, समाजवादी पक्ष दोन आणि शरद पवार गटाचा एक नगरसेवक निवडून आला आहे. हे संख्याबळ पाहता, भाजप आणि शिवसेनेचे एकत्रित नगरसेवक मिळून बहुमताचा आकडा पार करतात. याची उद्धव ठाकरेंनाही पुरती कल्पना आहेच. तरीही, त्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्या नगरसेवकांना मुंबई सोडून बाहेर न जाण्याचे आदेश दिले आहेत, यासारखे हास्यास्पद ते काय? सत्तेची इतकी तळमळ त्यांनी मुंबईतील प्रश्नांबाबत दाखवली असती आणि मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी भाजपशी दगाफटका केला नसता, तर आज कदाचित मुंबईतही चित्र वेगळे चित्र मिळाले असते. पण, ते म्हणतात ना ‘जो होता हैं, अच्छे के लिए है.’ ठाकरेंची पालिकेत सत्ता नसणे यातच मुंबईचे भले!
- अभिनंदन परूळेकर