गणिताचे मास्तर सुदाम सर

    06-Feb-2026
Total Views |

गणित विषयाचे शिक्षक म्हणजे सर्वात कडक व्यक्ती, हे पूर्वापारचे रुढ समीकरण. परंतु, याला अपवाद म्हणजे तळेगाव-दाभाडे येथे हजारो विद्यार्थ्यांचे आदर्श असणारे सुदाम वाळुंज सर त्यांच्याविषयी...

संगणक आणि डिजिटल क्रांतीचा काळ असताना आपल्या देशातील गणित विषयात रस घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयात कधीच माघार घ्यावी लागता कामा नये, म्हणून हिरिरीने पुढाकार घेणारा व्यक्ती विरळाच. सुदाम वाळुंज हे नाव अशा विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरावे. गणित विषय हा प्राथमिक शिक्षणापासून अगदी मूलभूत असाच. त्यात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे शिक्षणात क्रांती होत असताना, स्थित्यंतरे होत असताना, सुदाम यांनी गणिताची मूलभूत समज विद्यार्थ्यांमध्ये या काळात रुजत ठेवण्यासाठी जी तत्परता दाखविली, ती वाखाणण्याजोगीच म्हणायला हवी.

फक्त तळेगाव-दाभाडेच नव्हे, तर संपूर्ण मावळ तालुक्यात सुदाम वाळुंज सरांचे नाव हे गणित विषयाचे तज्ज्ञ शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले. वाळुंज सर हे गेले अनेक वर्षे मावळात काम करत होते, आता पुण्यात स्थायिक झाले आहेत. विद्याथ घडवणे आणि त्यांच्या मनातील गणिताची भीती घालवणे, हाच ध्यास ठेवून ते रोज पुण्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देत आहेत. जुन्या काळात शाळेतील मास्तर शाळेत सायकलवर येत असत. मास्तर लांबूनच पहिले की, वही-पुस्तक काढून विद्याथवर्गात अभ्यासाला बसत असत. हे पूवच्या काळातील चित्र. परंतु, सुदाम वाळुंज सरांच्या बाबतीत हे चित्र उलट असायचे. सर सायकलवर यायचे; परंतु विद्यार्थ्यांना ते आधी आपल्या वर्गात यावे, असे वाटायचे. गणित विषय अवघड वाटला की, विद्याथ हमखास सरांकडे जायचा. सर तो विद्याथ कोणत्या शाळेतील आहे, ओळखीचा आहे का, हे न पाहता 100 टक्के मार्गदर्शन करणार. हे काम त्यांनी अजूनपर्यंत सुरू ठेवले आहे. शाळेतून बोलावणे आले की, सर हमखास तिथे जाणार. मग ती शाळा कुठेही असो, कितीही लांब असो. विद्यार्थ्यांची अडचण असली की, सर तिथे हजर. कोणी विद्याथ चुकीचा वागला की, सरांचा फटका तर मिळायचा; परंतु सरांचा अबोला ही सर्वात मोठी शिक्षा असायची. सर आपल्याशी बोलत नाहीत म्हटल्यावर, तो विद्याथ ती चूक परत कधीच करणार नाही.

त्यांनी पुणे जिल्ह्यातील 50हून अधिक शाळांमध्ये गणित विषयावर मार्गदर्शन केले आहे. ‌‘नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव-दाभाडे‌’ या ऐतिहासिक संस्थेच्या विविध शाळांमध्ये शिक्षक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक म्हणून एकूण 35 वर्षे गणित विषयाचे त्यांनी अध्यापन केले. ‌‘एसएससी‌’ बोर्डाचे गणित विषयाचे परीक्षक, नियामक, मुख्य नियामक, पेपर सेटर, प्रश्नपत्रिका छाननी अशा विविध जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. ‌‘राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान‌’ व ‌‘आयआयटी मुंबई‌’मार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक प्रशिक्षणामध्ये ‌‘गणित मास्टर ट्रेनर‌’ म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांचा ‌‘सर्व शिक्षा अभियानां‌’तर्गत सहावी ते आठवी शिक्षक प्रशिक्षण पुस्तिकानिर्मितीमध्ये सहभाग होता. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये परीक्षक म्हणूनदेखील त्यांचा सहभाग होता. ‌‘महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा‌’, मावळ तालुका समन्वयक म्हणून त्यांनी 20 वर्षे काम केले आणि ‌‘महाराष्ट्र प्रज्ञाशोध‌’ परीक्षेत निवडलेल्या इयत्ता आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र व गोवा राज्यामध्ये गणित व विज्ञान विषयतज्ज्ञ म्हणून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तसेच मावळ तालुका माध्यमिक शिक्षक संघामध्ये कार्यवाह म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी मावळ तालुका गणित अध्यापक संघ अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. वाळुंज सरांचा ‌‘बालभारती‌’तर्फे प्रकाशित झालेल्या इयत्ता नववीच्या गणित स्वाध्याय पुस्तिकानिर्मितीमध्ये सहभाग आहे. तसेच ‌‘पंचायत समिती मावळ आदर्श शिक्षक‌’ पुरस्कार, ‌‘तळेगाव-दाभाडे नगर परिषद आदर्श शिक्षक‌’ पुरस्कार, ‌‘महाराष्ट्र राज्य कृतिशील शिक्षक‌’ पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना अनेक सोप्या क्लुप्त्या सांगून, गणित विषय सोप्या पद्धतीने उलगडून सांगण्याचे काम ते करतात. सहज-सोप्या युक्त्या वापरून आपण चांगले गुण कसे मिळवू शकतो, याची माहिती ते देतात. ‌‘हे आलेच पाहिजे‌’ ही त्यांची पद्धत विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रिय आहे. सहज पद्धतीने अवघड गोष्ट कशी सोपी करायची, हे सर दाखवून देतात. याच पद्धतीने ते दरवष अनेक शाळांमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ‌‘एसएससी‌’ बोर्डाच्या गणित विषयाच्या परीक्षेची तयारी कशी करावी, याविषयी मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थ्यांना तणावातून मुक्त करतात. जीवनातील कितीही अवघड प्रश्न त्यांचा माजी विद्याथ त्यांच्याकडे आजही घेऊन आला, तरी सर पटकन त्यातून मार्ग काढतात आणि समोरच्याला तणावमुक्त करतात. त्यांच्या या कार्यास दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून शुभेच्छा!

- शशांक तांबे
(अधिक माहितीसाठी संपर्क ः 9226370370)