‘काळा घोडा’त शिरलेली गाढवं!

05 Feb 2026 19:47:49

कलेचे महोत्सव कशासाठी असतात, तर ते कलेला व्यासपीठ मिळवून द्यावे, कलाकारांना समाजमान्यता मिळावी, यासाठी अशा कला महोत्सवांचे आयोजन केले जाते. ‌‘काळा घोडा‌’ महोत्सव आयोजित करणाऱ्यांना आनंद तेलतुंबडे यांचे भाषण आयोजित करून काय साध्य करायचे होते, हे परखडपणे विचारले पाहिजे. अशाप्रकारे चव्हाट्यावर चालणाऱ्या महोत्सवांमध्ये कायदा-सुव्यवस्था बिघडत नाही, ती भारताच्या संविधानामुळे आणि त्याची अंमलजबजावणी करणाऱ्या पोलिसांमुळे. मात्र, ‌‘काळा घोडा‌’ महोत्सवात अशी गाढवं आणून आयोजकांना काय साध्य करायचे, हा प्रश्नच!

मुंबईचा ‌‘काळा घोडा‌’ हा कोणे एकेकाळी दक्षिण मुंबईतल्या लब्धप्रतिष्ठितांचा कलामेळावा किंवा गोतावळा म्हणून प्रसिद्ध होता. मात्र, परवा ‌‘काळा घोडा‌’ महोत्सवात जे घडले, ते या महोत्सवात गाढवं शिरली की काय, असे वाटावे अशी स्थिती उद्भवली आहे.

‌‘काळा घोडा‌’ महोत्सवात कलेचे प्रदर्शन करणारे स्टॉल उभे केले जातात व होतकरू कलाकारांना विक्रीसाठी व्यासपीठही मिळून जाते. यावेळी तेथील मोकळ्या जागेत निरनिराळे कलाप्रकारही सादर केले जातात. लोकलने प्रवास करणारे चाकरमानी, चरितार्थ चालवण्यासाठी आपल्या घड्याळ आणि कुटुंबाची कसरत करणारे मुंबईकर, खरेतर यांना या ‌‘काळा घोडा‌’शी काही देणेघेणे नाही. स्वत:चे अस्तित्व शोधत असणारी ‌‘जेन-झी‌’ युवापिढी या ‌‘काळा घोडा‌’ महोत्सवाची लाभार्थी. मात्र, यावर्षी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उमाळा आलेल्या आयोजकांकडून चक्क ‌‘माओवादा‌’च्या आरोपाखाली जामिनावर बाहेर असलेल्या आनंद तेलतुंबडेंचा कार्यक्रम गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी आयोजित करण्यात आला होता. विषय काय, तर ‌‘तुरुंगातील भिंतीआडच्या कथा.‌’ त्यात आनंद तेलतुंबडे मुख्य वक्ते होते आणि दोन-तीन बेरोजगार भाजपद्वेष्टे पत्रकार त्यांची व्याख्यानवजा मुलाखत झोडणार होते. डाव्यांचे हे एक सदासदैव कारस्थान आहे. युवापिढीला त्यांच्या रगेल वयात हे भोवतालचे सगळे चुकीचे वाटत असते आणि परिस्थिती बदलण्याची स्वप्नेही पडत असतात. आज स्वत:ला ‌‘कॉम्रेड‌’ म्हणविणाऱ्या सगळ्यांनी त्यांच्या तरुणवयात हेच धंदे केले आहेत. (हे करून त्यांच्या हाती काय लागले, हे ते कधीच कुणाला सांगत नाहीत.) युवापिढीसमोर ही मंडळी अशीच क्रांतीची स्वप्ने पेश करीत राहतात. तुरुंगात जाणे, अटक होणे, म्हणजेच देशपरिवर्तनाची प्रक्रिया असा एक ‌‘लाल‌’ गैरसमज लालेलाल करून पसरविला जातो. आनंद तेलतुंबडे म्हणजे महात्मा गांधी नव्हेत, सावरकर तर मुळीच नव्हेत. त्यांना झालेला तुरुंगवास कशासाठी झाला होता व पोलिसांनी त्यांच्यावर कोणती कलमे लावून गुन्हे दाखल केले होते, हे जरा तपासून पाहिले पाहिजे. संजय राऊत पत्राचाळीच्या लफड्यात तुरुंगाची हवा खाऊन येतात आणि आव मात्र महाराष्ट्रासाठी लढल्याचा आणतात, तसलाच हा प्रकार. किंबहुना, संजय राऊत आणि उबाठाने ही कला आपल्या या नव्या साथीदारांकडून अवगत केली असावी. या मंडळींनी बाबासाहेबांचे नाव घेत केलेल्या संविधानविरोधी कारवाया तर जगजाहीर आहेत. त्यांच्यावर लावलेली कलमे दखलपात्र असून, संविधानाने चालविलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणारी आहेत.

कला आणि नॅरेटिव्ह म्हणजेच अभिमत यांचे जुने नाते. लोकशाही व अभिमत याचे वर्णन करीत असताना एक गोष्ट नेहमी सांगितली जाते - ‌‘पॉलिटिक्स डिसाईड्स मॅटर ॲण्ड मीडिया डिसाईड्स माईंड.‌’ यातील कृती-आराखडे व धोरणे राजकारण निश्चित करीत असते, तर अभिमत निर्माण करणे व त्यासाठी लागणारे प्रबोधन माध्यमे निश्चित करतात. हे गणित डाव्यांना उत्तम उकलले आहे. यातल्या ‌‘पॉलिटिक्स‌’ या घटकातून त्यांची गच्छंती होतच होती. मात्र, मोदी आल्यानंतर या प्रक्रियेला तुफान गतिमानता आली आणि या खोटारड्यांचे बाजार उठले. आता मीडिया, कला, अभिव्यक्तीची व्यासपीठे ही या परपोषितांची अखेरची स्थाने उरली आहेत. त्यामुळे जमेल तेव्हा, जमेल तिथे ही मंडळी घुसतात व कलेची व्यासपीठे प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी अत्यंत धूर्तपणे युवकांशी साधण्यात येणारा संवाद अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या गणंगांच्या खोट्या क्रांतीच्या कथांना भाळून ‌‘कॉम्रेड‌’ होण्याची तयारी युवकांची असते. मजेशीर बाब म्हणजे, यातले कुणीही फारकाळ डाव्या विचारांचे राहत नाही. पूर्वी डाव्यांच्या इकोसिस्टमविषयी त्यांची टोपी उडवताना म्हटले जायचे की, जर वयाच्या तिशीपर्यंत तुम्ही डाव्या विचारांचे नसाल, तर तुम्हाला हृदय नाही आणि जर तिशीनंतरही तुम्ही कम्युनिस्ट असाल, तर तुम्हाला मेंदू नाही. दुर्दैवाने, मराठी मुलखात अशा मेंदू नसलेल्यांची बजबजपुरी माजली आहे. भाजपचे नुकसान करण्यासाठी हे असे मेंदू नसलेले व त्याच्या बरोबर कान नसलेले, डोळे नसलेलेही एकत्र येतात. हे कधी मराठी भाषाप्रेमी असल्याचे नाटक करतात, तर कधी पर्यावरणप्रेमी असल्याचे नाटक करतात. सध्या गंडलेली ठाकरे बंधूंची युती हा त्यांना मागच्या वेळी व्यासपीठ देणारा सोहळा ठरला होता. मात्र, मुंबईकरांनी भाजपचा महापौर निवडल्याने ठाकरे बंधू आपापल्या घरी पांगले आणि हे बाजारबुणगे पुन्हा नव्या आसऱ्याच्या शोधात निघाले.

खरेतर ‌‘काळा घोडा‌’ महोत्सव आता सपक झाला आहे, त्यात नवे काही नाही. उबाठाच्या काळात मुंबईतील मोकळ्या जागांबाबत कोणताही चांगला निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे असे कोणतेही महोत्सव सुरू झाले की, ‌‘सेल्फी पॉईंट‌’ म्हणून लोक तिथे गर्दी करतात.

क्रांतीची चर्चा करणे, परिस्थितीवर टीका करणे या सगळ्या गोष्टी तर चालूच राहतात आणि लोकशाहीत त्या मान्यही केल्या पाहिजेत. मात्र, व्यासपीठ देण्याच्या निमित्ताने जर आपल्याला देश, समाज, कायदा-सुव्यवस्था झुगारून द्यायच्या असतील, तर अशा कार्यक्रम-उपक्रमांना परवानगी देण्याबाबतच विचार केला पाहिजे. कौतुक सजग मुंबईकर नागरिकांचे, ज्यांनी हा प्रकार वेळीच पोलिसांकडे अधोरेखित केला व विषय लावून धरला. जोवर नागरिकांमध्ये अशाप्रकारच्या डाव्या षड्यंत्रांची माहिती पोहोचून ते घटनादत्त अधिकारांचा वापर करून असे प्रयत्न हाणून पाडण्याची प्रवृत्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत अशा दुष्प्रवृत्तींना व्यासपीठे मिळतच राहणार!


Powered By Sangraha 9.0