॥सौंदर्यलहरी भाष्य भाग १३॥

05 Feb 2026 10:56:48

महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं
स्थितं स्वधिष्टाने हृदि मरुत-माकाश-मुपरि|
मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्वा कुलपथं
सहस्रारे पद्मे स हरहसि पत्या विहरसे॥९॥

देवीच्या कुंडलिनी स्वरूपाचे आणि मूलाधार चक्रातून सहस्रारचक्रातील ऊर्ध्वगमनाचे वर्णन करणार्‍या या श्लोकाचा हा अंतिम भाग आहे. कुंडलिनी जागृतीची ही क्रिया वेगवेगळ्या मार्गांनी साधता येते, याचा आपण मागे ऊहापोह केला. योगमार्गाने खेचरी मुद्रा धारण करून तुम्ही कुंडलिनी जागृती साधू शकता. नामस्मरण मार्गाने जर कुंडलिनीचे ऊर्ध्वगमन साधायचे असेल, तर श्री ललितात्रिशतीचे सातत्यपूर्ण आवर्तन साहाय्यभूत होते. ज्ञानमार्गी किंवा मानसपूजेच्या माध्यमातून ज्यांना हे ऊर्ध्वगमन साधायचे असेल, त्यांच्यासाठी ‘समयाचार’ हा मार्ग आहे. श्री विद्या उपासना मार्गातील तीन पद्धती आहेत, कौल मार्ग, मिश्र मार्ग आणि समय मार्ग. हा समय मार्ग निखळ ज्ञानमार्गी साधकांसाठीच आहे. आदि शंकराचार्य समयमार्गाचे साधक होते. समयाचार पद्धतीने कुंडलिनी जागृती साधायची असेल, तर त्याच्या पूर्वअर्हतेचे अत्यंत कठोर निकष आहेत. तुमची पात्रता झाल्यावर तुमचे गुरू विशिष्ट विधी करून कुंडलिनी जागृतीच्या या मार्गाचे मार्गदर्शन करतात, आणि ही चेतना जागृती तुमच्याकडून साधून घेतात. त्याचेच वर्णन आजच्या लेखात केले आहे.

श्री ललिता सहस्त्रनाम
नाम क्रमांक ९८ : समयाचार तत्परा

भावार्थ : श्री ललितादेवीची मूलाधार चक्रापासून कुंडलिनी स्वरूपात केलेली उपासना, ही समयाचार म्हणून ओळखली जाते. ‘रुद्रयामल’ या प्राचीन ग्रंथातील शिव-पार्वती संवादामध्ये हे वर्णन आहे. समयाचार उपासना ही फक्त मानसपूजा पद्धतीनेच केली जाऊ शकते. या उपासनेची गुरूकडून दीक्षा मिळणे अत्यावश्यक आहे.

समयाचार उपासना दीक्षा विधी : श्रीविद्या उपासनेमधील प्रगतीचा विशिष्ट टप्पा पार केल्यानंतरच, गुरु शिष्याला समयाचार उपासनेची दीक्षा प्रदान करतो. कारण या दीक्षेच्या नंतर शिष्याला स्वबळावर कुंडलिनी जागृती आणि त्यापुढील उपासना विधी साधायचा असतो. त्यामुळे ती पात्रता असल्याशिवाय दीक्षा संभवत नाही.
मानसपूजा हे वरकरणी अत्यंत सोपे वाटणारे प्रकरण आहे; परंतु समयाचार उपासनेचे संपूर्ण वर्णन वाचले की त्यातील गुह्य रहस्य, तर उमगतेच आणि ते किती कठीण व असाध्य आहे, याचीसुद्धा जाणीव होते.

या अन्तोपासनेला करताना साधकाकडून चूक झाल्यास त्यातून उद्भवणार्‍या परिणामांपासून साधकाचे रक्षण करण्याचे सामर्थ्य बाळगून असलेला गुरू मिळणे, हेसुद्धा दुर्लभ आहे. कोणीही गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय या उपासनेचा विचारही करू नाही. सद्गुरू त्याच्या शिष्याची आधी मानसिक आणि शारीरिक तयारी करून घेतो आणि त्यानंतरच ही समयाचार उपासना दीक्षा दिली जाते. गुरू आपल्या शिष्याला स्यमंत्रक स्नान घालतो, ज्याला ‘पूर्णाभिषेक’ असे म्हटले जाते. त्यानंतर केल्या जाणार्‍या विधीला ‘महा वेद संस्कार’ म्हणतात. तो यज्ञ असून, फक्त महानवमीलाच करावा लागतो. महानवमी म्हणजे आश्विन महिन्यातील विजयादशमीच्या आधीचा एक दिवस. या दोन विधींनंतर साधक कुंडलिनी उपासनेस पात्र होतो. त्यानंतर साधक एकांतात षट्चक्रे व सहस्रार चक्रांचे ध्यान करू लागतो. या ध्यानाच्या पद्धतीचे वर्णन खालीलप्रमाणे.

कुंडलिनी ही चेतना स्वरूप आहे. ध्यानक्रियेत स्थिरावलेल्या या चेतनेचा देहात अनुभव घेणे, ही पहिली कृती. तद्नंतर या चेतनेवर नियंत्रण मिळवून, मानसपूजेला प्रारंभ कत, चेतनेला एकेका चक्रातून ऊर्ध्वगामी नेणे ही दुसरी कृती. ही संपूर्ण क्रिया मानसिक पातळीवर करावी लागत असल्याने, सहजसाध्य नाही. ध्यानाच्या रूपातून चेतनेची अनुभूती जाणवली, तरी चेतनेला नियंत्रणात ठेवणे कठीण असते. त्यासाठी पूर्व सुकृत आणि गुरुकृपा दोन्ही अत्यावश्यक. या उपासनेतच कुंडलिनीला मूळ स्थानापासून जागृत करण्याची प्रक्रिया सुरू होते. इथे कुंडलिनी निद्रिस्त आणि सूक्ष्म स्वरूपात, मूलाधार चक्राच्याही खाली perineum muscles, ज्याला संस्कृतमध्ये ‘विटपि’ हा शब्द आहे, तिथे स्थित असते. हे स्नायू मानवाच्या लैंगिक भावना उत्तेजित करण्याचे कार्य करतात; तसेच मलमूत्र विसर्जनावरसुद्धा या स्नायूंचे नियंत्रण असते. ’विटपि’ हे स्नायू पडद्यासमान असतात. तेथील निद्रिस्त कुंडलिनी जागृत करून मूलाधार चक्रात आणली जाते. मूलाधार चक्रातून चेतना अतिसूक्ष्म स्वरूपात, अर्थात कामकला स्वरूपात स्वाधिष्ठान चक्रामध्ये ध्यान क्रियेद्वारे आणली जाते. स्वाधिष्ठान चक्रात तिचा शृंगार केला जातो. या चक्रात ही चेतना पूर्ण रक्तवर्णी असते. तेथून तिला मणिपूर चक्रात नेले जाते.

मणिपूर चक्रात कुंडलिनी स्थिरावल्यावर, साधकाच्या बाह्य रूपात बदल घडतात.हे बदल त्याच्या नित्य संपर्कातील लोकांनाही जाणवतात. या चक्रात देवीची अर्घ्यपूजा, पाद्यपूजा केली जाते आणि या चक्रात ती साधकाने दिलेल्या भेटीसुद्धा स्वीकारते. मणिपूर चक्रात देवीला सिंहासन दिले जाते आणि ती त्याच्यावर आरूढ होते. या चक्रात ती सूक्ष्मातिसूक्ष्म स्वरूप अर्थात कुंडलिनी स्वरूप धारण करते. या चक्राच्या पुढे ती अत्यंत शक्तिशाली होते. ही संपूर्ण मानसपूजाच सुरु असल्याने, त्याचे ध्यान ठेवणे अत्यावश्यक. येथून देवीला अनाहत चक्रात नेले जाते, जिथे तिला कर्पूरयुक्त विडा अर्पण केला जातो.

तेथून तिला विशुद्धी चक्रात नेले जाते, जिथे तिची आरती करतात. आरती करताना शुद्ध तुपाचे दिवे लावले जातात. पंचारती किंवा पूर्ण कुंभ आरती केली जाते. विशुद्धी चक्रातून देवीला आज्ञा चक्रात आणले जाते, जिथे तिची कर्पूर आरती केली जाते. इथे देवीला सुगंधी पुष्पांच्या माळा अर्पण करुन, तिला नववधूप्रमाणे सजवले जाते. तिथून तिला सहस्रार चक्रात नेले जाते, जिथे सदाशिव तिची वाट पाहत असतो. त्यानंतर सहस्रार चक्राभोवती साधक एक पटल निर्माण करून,तो तिची वाट पाहतो. ती बाहेर आली की तिला परत मूलाधार चक्रात स्थित केले जाते. याच संपूर्ण क्रियेला ‘समयाचार उपासना’ असे म्हणतात. श्री ललितादेवी या उपासनेस अत्यंत उत्सुक असते, असा या नामाचा अर्थ आहे. अर्थात साधकाने या पातळीवरील स्वतःची प्रगती साधावी, हे देवीलाही अभिप्रेत असते, ज्यामुळे साधकाच्या शरीरात राहूनही तिला पती सदाशिवाशी एकरूप होता येईल, तादात्म्य पावता येईल.

या क्रियेच्या पूर्णत्वाला साधकाची कुंडलिनी पूर्ण जागृत होते. ती साधकाच्या देहातून सातत्यपूर्ण नर्तन करू लागते. तिचे गुहेत स्थित होणे, अर्थात मूलाधारात स्थिर होणे किंवा मूलाधार ते सहस्रार नर्तन हे साधकाच्या इच्छेनुरूप असते. शिवशक्ती मिलनाचा स्वदेहात अनुभव घेणारा साधक हा परम सच्चिदानंद अवस्थेला प्राप्त होतो.

त्याचे सर्व विकार शमन पावतात. त्याच्या ग्रंथींचे भेदन झाले असल्याने, त्याला देह जगवण्यासाठी बाह्य अन्न भक्षण करण्याची गरज संपुष्टात येते. त्याच्या देहातून सातत्यपूर्ण चैतन्याचा प्रवाह निर्माण झाल्याने, कोणताही आजार होण्याची शक्यता नष्ट होते. त्याच्या वासना, विकार आणि विचारांचे पूर्ण शमन झाले असल्याने, त्याच्या डोळ्यांच्या पापण्या अनिमिष होतात. अर्थात त्याच्या पापण्यांची नैसर्गिक उघडझाप कायमची थांबते. तो साधक खर्‍या अर्थाने ब्रह्मचारी होतो. जो सातत्याने परममिलन स्वदेहात अनुभवत आहे, त्याला बाह्य जगतातील कोणतीही स्त्री किंवा पुरुष आपल्या गुण व सौंदर्याने विचलित करू शकत नाही. कुंडलिनी अर्थात चेतना जागृती ही स्त्री आणि पुरुष दोन्ही साधकांना साध्य आहे. ईश्वरी तत्त्वात लिंगभेद नसतो.


- सुजीत भोगले


Powered By Sangraha 9.0