
मुंबई : शुक्रवार आला की सिनेप्रेमींना वीकेंडची ओढ लागते. आठवड्याभराच्या धावपळीनंतर थिएटर असो वा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षक शुक्रवारची वाट पाहत असतात, कारण याच दिवशी सस्पेन्स, थ्रिलर, अॅक्शन, हॉरर आणि फॅमिली ड्रामासारख्या विविध प्रकारातील नवीन चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. त्यामुळे या विकेंडला प्रेक्षकांसाठी खास काय य़ेत आहे पाहूयात. फेब्रुवारी 2026 चा पहिला शुक्रवार मात्र खास ठरणार आहे. कारण या दिवशी केवळ 2-3 नाही, तर तब्बल 9 चित्रपट आणि सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे हा वीकेंड नक्कीच मनोरंजनाने भरलेला असणार आहे.
वध 2 (Vadh 2)
फेब्रुवारी महिना थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात अनेक मोठ्या चित्रपटांची रांग लागली असून, त्याची सुरुवात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या ‘वध 2’ या चित्रपटाने होत आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आलेल्या या सिक्वेलमध्ये प्रेक्षकांना अधिक गूढता, ट्विस्ट आणि धक्कादायक वळणं अनुभवायला मिळणार आहेत.
जॅझ सिटी (Jazz City)
थिएटरमध्ये ‘वध 2’ दाखल होत असताना, ओटीटीवर प्रेक्षकांना 1971 च्या बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर आधारित कथा पाहायला मिळणार आहे. ‘जॅझ सिटी’ ही सीरिज जिमी नावाच्या व्यक्तीभोवती फिरते, जो आपल्या भूतकाळापासून पळण्याचा प्रयत्न करतो. मात्र आंतरराष्ट्रीय हेरगिरी आणि सत्तासंघर्षाच्या जाळ्यात तो अडकतो. कोलकात्यातील एका जॅझ क्लबमध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित ही 10 भागांची सीरिज आहे.
रिलीज: 6 फेब्रुवारी
प्लॅटफॉर्म: Sony Liv
शैली: ऐतिहासिक ड्रामा
शबद: रीत आणि रिवाज (Shabad: Reet Aur Riwaaz)
ही एक कमिंग-ऑफ-एज फॅमिली ड्रामा कथा आहे. गोष्ट आहे घुप्पी या मुलाची, ज्याला हकलण्याची समस्या आहे आणि तो एक यशस्वी फुटबॉलपटू बनण्याचं स्वप्न पाहतो. मात्र त्याच्या वडिलांची इच्छा आहे की त्याने त्यांच्या पावलावर पाऊल टाकत रागी गायक व्हावं. वडील–मुलाच्या नात्यातील भावना, संघर्ष आणि समजूतदारपणा या कथेत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
रिलीज: 6 फेब्रुवारी
प्लॅटफॉर्म: ZEE5
शैली: फॅमिली ड्रामा
हॉन्टेड 3D: घोस्ट ऑफ द पास्ट (Haunted 3D: Ghosts of the Past)
मिमोह चक्रवर्ती आणि चेतना पांडे यांची प्रमुख भूमिका असलेला हा हॉरर चित्रपट या शुक्रवारी थेट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. पुन्हा एकदा कथा एका भयावह हॉन्टेड हाऊसभोवती फिरते. चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केलं आहे.
रिलीज: 6 फेब्रुवारी
प्लॅटफॉर्म: थिएटर्स
शैली: हॉरर ड्रामा
द राजा साब (The Raja Saab)
प्रभास आणि संजय दत्त यांची बहुचर्चित फिल्म ‘द राजा साब’ आता ओटीटीवर येत आहे. 9 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नव्हतं. कथेत राजू नावाचा तरुण आपल्या हरवलेल्या वडिलांचा शोध घेताना दिसतो. ओटीटीवर ही फिल्म प्रेक्षकांची मनं जिंकते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
रिलीज: 6 फेब्रुवारी
प्लॅटफॉर्म: Jio Hotstar
शैली: हॉरर ड्रामा
क्वीन ऑफ चेस (Queen of Chess)
ही एक प्रेरणादायी डॉक्युमेंट्री असून, ती जगातील टॉप 10 बुद्धिबळपटूंमध्ये स्थान मिळवणारी एकमेव महिला जुडिट पोल्गार यांच्या जीवनावर आधारित आहे. पुरुषप्रधान खेळात त्यांनी केलेला संघर्ष, यशाचा प्रवास आणि गॅरी कास्पारोव यांच्याशी असलेली त्यांची चुरस, हे सगळं या डॉक्युमेंट्रीत प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे.
रिलीज: 6 फेब्रुवारी
प्लॅटफॉर्म: Netflix
शैली: डॉक्युमेंट्री
किस किसको प्यार करूं 2 (Kis Kisko Pyaar Karoon 2)
कपिल शर्मा यांची लोकप्रिय कॉमेडी फिल्म आता ओटीटीवर येत आहे. थिएटरनंतर आता हा चित्रपट डिजिटल प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. या भागात पारुल गुलाटी, त्रिधा चौधरी आणि आयशा खान प्रमुख भूमिकेत आहेत. हसत-हसत वेळ घालवायचा असेल, तर हा पर्याय योग्य ठरेल.
रिलीज: 6 फेब्रुवारी
प्लॅटफॉर्म: Jio Hotstar
प्रकार: कॉमेडी
फाइंडिंग हार्मनी: अ किंग्स व्हिजन (Finding Harmony: A King’s Vision)
अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणारी ही डॉक्युमेंट्री सीरिज राजा चार्ल्स तृतीय यांच्या पर्यावरण संवर्धनासाठी असलेल्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकते. पर्यावरणीय शाश्वततेसाठी त्यांच्या प्रयत्नांची कथा केट विंसलेट यांच्या आवाजात मांडण्यात आली आहे.
रिलीज: 6 फेब्रुवारी
प्लॅटफॉर्म: Amazon Prime Video
प्रकार: डॉक्युमेंट्री
भाबीजी घर पर हैं – फन ऑन द रन (Bhabiji Ghar Par Hain! – Fun On The Run)
टीव्हीवर प्रचंड लोकप्रिय ठरलेला ‘भाबीजी घर पर हैं’ हा सिटकॉम आता थेट मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटात आसिफ शेख, शुभांगी अत्रे आणि रोहिताश्व गौर आपल्या लोकप्रिय भूमिका साकारणार आहेत. विनोद आणि सटायरने भरलेली ही फिल्म प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे.
रिलीज: 6 फेब्रुवारी
प्लॅटफॉर्म: थिएटर्स
प्रकार: सिटकॉम कॉमेडी
एकूणच, फेब्रुवारी 2026 चा पहिला शुक्रवार मनोरंजनाच्या बाबतीत प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे थिएटर असो किंवा ओटीटी, प्रत्येकासाठी काही ना काही खास नक्कीच आहे.