नवी दिल्ली : (Bharat Taxi) खाजगी टॅक्सी सेवांमध्ये अनेकदा प्रवाशांना भाडे नाकारले जाणे, अवाजवी दर आकारणे किंवा असभ्य वर्तनाला सामोरे जावे लागते. अशा तक्रारींना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांना विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने थेट पुढाकार घेतला आहे. देशातील पहिले सरकारी मालकीचे टॅक्सी सेवा अॅप ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) गुरुवारी, ५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.(Bharat Taxi)
‘भारत टॅक्सी’मुळे (Bharat Taxi) ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या खाजगी टॅक्सी सेवांच्या मक्तेदारीला आव्हान मिळणार आहे. त्याचबरोबर बाजारात आरोग्यदायी स्पर्धा निर्माण होऊन प्रवाशांना अधिक चांगली, पारदर्शक आणि परवडणारी सेवा मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा, २००२ अंतर्गत नोंदणीकृत असलेली भारत टॅक्सी दि. ६ जून २०२५ रोजी स्थापन करण्यात आली. आठ आघाडीच्या सहकारी संस्थांच्या पाठबळावर या उपक्रमाने दि. २ डिसेंबर २०२५ रोजी दिल्ली-एनसीआर आणि गुजरातमध्ये प्रायोगिक सेवा सुरू केली होती.(Bharat Taxi)
हेहा वाचा : Narendra Modi : थक गए, चले गए! विरोधकांच्या सभात्यागानंतर राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा प्रहार
उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले की, पुढील दोन ते तीन वर्षांत भारत टॅक्सी देशभरात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून कामाख्यापर्यंत पोहोचवली जाईल. या प्लॅटफॉर्ममधील नफा थेट चालकांमध्ये वाटला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सेवेद्वारे प्रवासी कार, तीनचाकी आणि दुचाकी वाहनांची बुकिंग करू शकणार आहेत. भारत टॅक्सी हा स्वदेशी पर्याय म्हणून पुढे येत आहे. तसेच ‘भारत टॅक्सी (Bharat Taxi) सारथी दीदी’ हा उपक्रम प्रवासी तसेच चालक म्हणून महिलांच्या सुरक्षा, सन्मान आणि सक्षमीकरणाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.(Bharat Taxi)
सहकार मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारत टॅक्सी (Bharat Taxi) ही जगातील पहिली आणि सर्वात मोठी सहकारी-आधारित राइड-हेलिंग सेवा, तसेच जगातील सर्वात मोठी चालक-मालकीची मोबिलिटी प्लॅटफॉर्म ठरली आहे. प्रायोगिक प्रकल्प सुरू झाल्यापासून तीन लाखांहून अधिक चालक, एक लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते नोंदणीकृत झाले असून, दिल्ली-एनसीआर आणि गुजरातमध्ये दररोज १० हजारांहून अधिक राईड्स पूर्ण होत आहेत. आतापर्यंत सुमारे १० कोटी रुपये थेट चालकांना वितरित करण्यात आले आहेत. सहकाराच्या माध्यमातून रोजगार, उत्पन्नाची खात्री आणि स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना देणारा भारत टॅक्सी हा उपक्रम देशाच्या मोबिलिटी क्षेत्रात नवा अध्याय सुरू करणारा ठरत आहे.(Bharat Taxi)