मुंबई: (Sunetra Pawar Deputy CM) जेष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत आनंद व्यक्त केला आहे. बारामती येथील गोविंदबाग येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या दोन दिवसांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, यामुळे त्यांनी आणि पक्षाने या निवडीचा आनंद व्यक्त केला आहे. शरद पवार म्हणाले की, या दुःखद घटनेत आम्ही सर्वजण मोठ्या संकटातून जात आहोत आणि सध्या आमचे लक्ष परस्परांना धीर देणे आणि पुढे कसे जायचे यावर आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही राजकीय निर्णयावर सध्या कोणाशीही चर्चा सुरू नाही. पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात असल्याबाबत विचारले असता, त्यावर शरद पवार यांनी भाष्य करण्यास नकार दिला.
अजित पवार यांचा अपघात आणि स्मारकासंदर्भात चर्चा
अजित पवार यांच्या स्मारकाबाबत विचारल्यावर त्यांनी सांगितले की, “ज्या संस्थेच्या जागेची चर्चा सुरू आहे, त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे, त्यामुळे मला माहिती असायला हवी. अद्याप याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. सर्व विश्वस्त एकत्र बसून निर्णय घेतला जाईल, सध्या स्मारकावर चर्चा करणे योग्य नाही.” विमान अपघाताशी संबंधित शंकांबाबत त्यांनी स्पष्ट केले की, “अधिकृत माहिती येईपर्यंत उगीच शंका घेणे योग्य नाही.”
अर्थसंकल्प समाधानकारक
केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, “सामान्य माणसाला यातना होतील असा नवा कर टाळण्यात आला आहे, ही समाधानाची बाब आहे, मात्र देशाच्या विकासाला गती देणारी ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे.”
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल शरद पवार यांनी आनंद व्यक्त करत म्हटले की, “या परिस्थितीत त्यांनी पद स्वीकारले, यामुळे पक्षाला आणि सरकारला स्थैर्य मिळाले आहे.” अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.