मुंबई: (Rohit Pawar) दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व कोण करणार? पक्षाची धुरा कोणाच्या हाती येणार तसेच अजित पवारांकडे असणारी पदे कोणाकडे जाणार तसेच दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार का, यावरही राजकीय चर्चेला उधान आलं. दरम्यान पवार कुटुंबीयांची एकत्र बैठक झाली आणि त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रोहित पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांचे स्मारक उभारण्यासाठी भेट दिली. यावेळी रोहित पवार म्हणाले की, “घाईघाई विमानाने ते निघाले आणि ही दुर्देवी घटना घडली. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. अजित पवार ज्या विचारांना पुढे घेऊन जात होते, त्या विचारांना लोकांनी पाठिंबा द्यावा. राजकारणातील मोठे नेते अजित पवार होते. जर त्यांना आदरांजली द्यायची असेल, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते जिथे जिथे उभे आहेत, तिथे लोकांनी त्यांना सहकार्य करावं, असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी यावेळी केलं.
दरम्यान, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. यामुळे शपथविधीसाठी घाई झाली, तसेच दोन्ही गटांच्या विलिनीकरणावरूनही वाद निर्माण झाले. यावर रोहित पवार म्हणाले, “उपमुख्यमंत्रीपद आणि अजित पवारांच्या पक्षाचे नेतृत्व हे सुनेत्रा पवारांकडेच राहावे, ही आमची इच्छा आहे. मात्र या दुःखाच्या काळामध्ये आम्हाला यावर थेटपणे बोलता येत नाही, असं रोहित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “लोकप्रतिनिधी जनतेच्या आशीर्वादाने निवडून येतात. जर आमदारांनी अशी इच्छा व्यक्त केली असेल, तर त्याचा आदर केला पाहिजे. तसेच पक्षातील विविध सेलचे अध्यक्षही सुनेत्रा पवार यांचेच नाव पुढे करत आहेत. त्यामुळे ही जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे द्यावी. कुणी कितीही प्रयत्न केले तरी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, लोक आणि कुटुंबाचे म्हणणे दुर्लक्षित करता येणार नाही. सुनेत्रा काकीच या पक्षाच्या प्रमुख राहतील.”
विलीनीकरणाची चर्चा झाली नाही
विलीनीकरणाबाबत विचारल्यावर रोहित पवार म्हणाले, “सध्या अशी चर्चा कुठेही सुरु नाही. वरिष्ठ नेते अजित पवारांच्या पक्षासाठी प्रयत्न करत आहेत की नाही, याची माहिती आम्ही देऊ शकत नाही. ९ फेब्रुवारीनंतर तेरावे झाल्यानंतर परिवारात यावर चर्चा होईल. आतापर्यंत यावर कुठलाही निर्णय झाला नाही,” असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले.
सरतेशेवटी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे आणि दुसरीकडे त्यांच्या गटातील (शरद पवार गटातील) नेते अगदी शरद पवार देखील विलीनीकरणाची चर्चा झाली असल्याचे बोलत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे भविष्य काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.