या प्रश्नाचे काय करायचे?

    05-Feb-2026   
Total Views |
Rahul Gandhi
 
भारताविरोधात भूमिका घेणार्‍या परदेशी लोकांना भेटणे, तिथे भारताबद्दल नकारात्मक भूमिका मांडणे, या कामात राहुल गांधी माहीर आहेत. ते असे का करतात? ते कोण आहेत? यावर कधीकाळी त्यांच्याच काँग्रेस पक्षात असलेल्या; पण २०२४ साली भाजपत प्रवेश केलेल्या आणि खासदार झालेल्या रवनीत सिंग बिट्टू यांचे म्हणणे पाहू, संसदेमध्ये राहुल गांधी रवनीत बिट्टू यांच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न करत म्हणाले, "हॅलो, गद्दार दोस्त. चिंता करू नकोस, तू पुन्हा काँग्रेसमध्ये येशील.” यावर रवनीत सिंग यांनी हात तर मिळवलाच नाही, वर ते म्हणाले की, "देशाच्या शत्रूशी माझे काही देणे-घेणे नाही.” यावर राहुल गांधींनी काही प्रतिक्रिया दिली नाही. खरेतर संसद म्हणजे टिवल्याबावल्या करण्याचा किंवा लुटुपुटुचे आरोप करण्याची जागा आहे का? पण, राहुल गांधी संसदेची मर्यादा न राखता वर्तन करतात. मग, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची जबरदस्ती गळाभेट घेणे आणि नंतर कसे नाटक केले, या अविर्भावात डोळा मारणे असू दे की, महिला संसद जिथे बसल्या आहेत, त्या दिशेने फ्लाईंग किसचा अविर्भाव करणे असू दे; एकापेक्षा एक वायफळ गोष्टी राहुल गांधी करत असतात.
 
संविधानाचा अपमान करत मागे राहुल गांधींनी कोणत्यातरी छोट्या लाल पुस्तकाला संविधानाचा दर्जा दिला होता. पंतप्रधान मोदी, भाजपचे केंद्र सरकार यांच्याविरोधात भयंकर खोटेनाटे बोलायचे. त्यात अदानी, चीन वगैरेंचा उल्लेख करायचा की, झाले राहुल गांधी यांचे भाषण. एक सर्वसामान्य घरातली व्यक्ती पंतप्रधानपदी आहे, हे सत्य आजही राहुल गांधींसाठी दुःखद आहे की, काय असे वाटते. पण, मोदी केवळ भाजपचेच नव्हे, तर करोडो भारतीयांचे पंतप्रधान आहेत. प्रचंड कष्टाने आणि तपाने भाजप केंद्र सरकारपदी आरूढ झाली, हे कुणीही मान्य करेल; पण हे सत्यदेखील राहुल गांधींना समजत नाही. तर, अशा या राहुल गांधींबद्दल रवनीत यांचे मत योग्य की, अयोग्य? यावर सर्वेक्षण झाले, तर जनतेचे मत काय असेल? तसेही भारतभर फिरून आपल्याच गटातील लोकांसमोर भाषण करणे वेगळे आणि जनतेच्या सुख-दुःखाशी समरस होऊन भारताला प्रगतिपथावर नेणे वेगळे. पण, हे राहुल गांधींना सांगणार कोण? आणि सांगितले तरी त्यांना समजेल का? तर इथून प्रश्न आहे. या प्रश्नाचे काय करायचे?
 
‘त्या’ बहिणींचा ‘गेम’...!
 
गाझियाबादची १२ वर्षांची पाखी, १४ वर्षांची प्राची आणि १६ वषार्र्ंची विंशिका या तिघी बहिणी. कोरियन लव्ह गेम (टास्क बेस्ड गेम)चे त्यांना अतिव्यसन जडले होते. त्यांच्या पालकांनी सर्व तर्‍हेने या खेळापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण, हा गेम खेळणे सोडण्यापेक्षा आम्ही जीव देऊ, असे त्या तिघी बहिणी त्यांच्या पालकांना म्हणत. नुकतेच त्या तिघी बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. भयंकर आणिदुःखद! ‘कोरोना’ काळात शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणावर भर सुरू झाला. त्यावेळी सहा वर्षांची पाखी, आठ वर्षांची प्राची आणि दहा वर्षांची विंशिका यांच्या हातातही शिक्षणाच्या नावावर मोबाईल आला. मात्र, त्या तिघीजणी ‘कोरियन लव्ह गेम’ खेळू लागल्या. पुढे साल २०२२च्या उत्तरार्धात शाळा-महाविद्यालये उघडली. पण, गेम खेळता येणार नाही म्हणून मुलींनी शाळेतही जाणे सोडले. त्यांनी या गेमचे जवळजवळ सगळेच टास्क पूर्ण केले. त्या मुली सांगू लागल्या की, त्या इथल्या नाहीतच; तर त्या कोरियन राजकुमारी आहेत. पालकांनी त्यांना समजावले. पण, मुली खेळाच्या आहारी गेल्या होत्या. मग, त्यांनी मोबाईल वापरू नये, यासाठी पालकांनी त्यांच्यावर सक्ती केली.
 
खेळता येणार नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली की, त्या गेममध्ये त्यांना नवव्या मजल्यावरून उडी मारण्याचा ५०वा टास्क दिला गेला होता? दुसरीकडे मुलींनी ऑनलाईन गेमसाठी शाळा सोडली, तरी पालक गप्प राहिले? मुली अतार्किक-अवास्तव जगात वावरू लागल्या, हे जाणवल्यानंतर पालकांनी काय केले? मुली माणसात याव्यात, यासाठी त्यांनी काय केले? घरात असे काय वातावरण होते? या सगळ्या प्रश्नांचे प्रमुख उत्तर एकच आहे, ते म्हणजे दुरावलेले किंवा अति-अवास्तव आणि विनाकारण लाडावलेले नातेसंबंध. मुलांची कोणतीही इच्छा पूर्ण केली नाही, तर मुलं आपल्यापासून दुरावतील ही भीती. लहान मुलांनाही एकांत द्यायलाच हवा, अशी मानसिकता. ही भीती, ही मानसिकता आज पालकांमध्ये घट्ट रुजली आहे. या अशा पालकत्वामुळेच मुलांचे भविष्य अंधारत आहे, हे सत्य आहे. ‘कोरियन गेम’मुळे या मुलींचा हकनाक बळी गेला, बिचार्‍या मुली. या पार्श्वभूमीवर मुलांपेक्षा पालकांनी सावध राहणे गरजेचे!
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.