Narendra Modi : थक गए, चले गए! विरोधकांच्या सभात्यागानंतर राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा प्रहार

    05-Feb-2026   
Total Views |
Narendra Modi

मुंबई : ( Narendra Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिनांक ५ फेब्रुवारी रोजी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चेला उत्तर दिले. त्यांनी सांगितले, "गेल्या काही दिवसांत, आम्ही जगातील ९ मोठ्या आणि महत्त्वाच्या देशांसोबत द्विपक्षीय व्यापार करार केले आहेत. २७ देशांचा समावेश असलेल्या युरोपियन युनियनसोबतचा करार हा या सर्व करारांपैकी सर्वात मोठा आहे." युरोपियन युनियनसोबतचा करार असो किंवा अमेरिकेसोबतचा नुकताच झालेला व्यापार करार असो, याबाबत काल पियुष गोयल यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली. संपूर्ण जग या कराराचे खुले कौतुक करत असल्याचे मोदी म्हणाले.
विरोधकांची जोरदार घोषणाबाजी; पंतप्रधान मोदींचा खर्गेंना टोला
 
राज्यसभेत पंतप्रधान मोदी बोलताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू द्या, हुकूमशाही चालणार नाही, अशा घोषणा दिल्या. विरोधकांचा गोंधळ पाहत, मोदींनी मल्लिकार्जुन खर्गे यांना टोला लगावला, "खर्गे यांचे वय लक्षात घेता, मी विनंती करतो की, त्यांना बसूनच घोषणाबाजी करण्याची परवानगी द्या, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही. त्यांच्या मागे तरुण लोक आहेत."
यानंतर विरोधकांनी सभेतून सभात्याग केला, 'थक गए, चले गए' असा टोला मोदींनी विरोधकांना दिला. मोदी म्हणाले, "काँग्रेस सरकारांकडे कोणतीही दूरदृष्टी नव्हती. आपली बरीच शक्ती त्यांच्या चुका सुधारण्यात जात आहे. आज देश धोरणाच्या आधारावर चालत आहे, त्यामुळे जगाचा भारतावर विश्वास वाढत आहे. जगाचे भारताकडे आकर्षण वाढले आहे. त्यांना भारताच्या प्रतिभेचे महत्त्व कळले आहे. आपल्याकडे जगातील सर्वात महत्त्वाचे युवा टॅलेंट आहे, ज्यांच्याकडे स्वप्ने, संकल्प आणि सामर्थ्य आहे. शक्तीचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे."

विकसित भारताच्या दिशेने प्रवास

मोदींनी सांगितले की, स्वतंत्रतेच्या वेळी भारताची अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर होती. काही लोकांच्या चुकीमुळे ती ११व्या क्रमांकावर घसरली. आता आपण तिसऱ्या क्रमांकाकडे वेगाने जात आहोत. आजचा भारत प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने भरलेला आहे. विकसित भारताच्या दिशेने प्रवास करताना गेल्या काही वर्षांत देशाने वेगाने प्रगती केली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आणि समाजाच्या प्रत्येक घटकात परिवर्तनाचा काळ सुरू आहे. भारत जगाशी स्पर्धा करण्यास पूर्ण तयार आहे.
काँग्रेसने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला
 
काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "काँग्रेसने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. देशातील अन्नदाता शेतकऱ्यांनाही त्यांनी सोडले नाही. या देशात १० कोटी शेतकरी आहेत ज्यांच्याकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. त्यांनी छोट्या शेतकऱ्यांकडे कधीच लक्ष दिले नाही. परंतु आमच्या मनात छोट्या शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आणि वेदना होती, त्यामुळे आम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणली आणि इतक्या कमी वेळात आमच्या छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात ४ लाख कोटी रुपये जमा केले." असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र डागले.
 

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.