लोकशाहीच्या प्रतीक्षेत लिबिया...

    05-Feb-2026
Total Views |
Libya
 
लिबियाच्या राजकीय इतिहासात सैफ अल-इस्लाम गद्दाफी यांची राहत्या घरात गोळ्या मारून हत्या करण्यात आली. या हत्येने माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांचा मुलगा, संभाव्य राजकीय वारस आणि गद्दाफी युगाशी भावनिक-राजकीय नाळ असलेला शेवटचा प्रभावी चेहराही संपवण्यात आला. प्रश्न असा की, या हत्येने नेमका फायदा कोणाचा झाला? २०११ मध्ये मुअम्मर गद्दाफी यांची क्रूर हत्या झाली, तेव्हा जगाने ‘हुकूमशाहीचा अंत’ आणि ‘लोकशाहीचा प्रारंभ’ असा जल्लोष केला होता. मात्र, १५ वर्षांनंतर लिबियाकडे पाहिले असता, हा जल्लोष किती तोकडा होता याची जाणीव होते. गद्दाफीच्या अंतानंतरही लिबियामध्ये आजतागायत लोकशाही आलेली नाही. उलट, अधःपतनाच्या गर्तेत अधिक खोलवर अडकत गेला.
 
सैफ अल-इस्लाम यांची झिंटानमधील निवासस्थानी हत्या करण्यात आली. सैफ लिबियामध्ये कोणत्याही अधिकृत सत्तास्थानी नव्हते, तरीही ते अनेकांसाठी धोकादायक ठरत होते. कारण, ते गद्दाफी काळातील राज्यसत्तेची, एकसंघ नेतृत्वाची आणि स्थैर्याची आठवण होते. काही गट, जुन्या प्रशासनातील घटक आणि ‘गद्दाफी युग परत आले तरी चालेल; पण अराजक नको’ असे मानणारा वर्ग सैफकडे आशेने पाहत होता. मुअम्मर गद्दाफी यांचे नेतृत्व निःसंशयपणे हुकूमशाही होते. त्यांनी चार दशके लिबियावर लोखंडी मुठीने राज्य केले. विरोधकांचे दमन, राजकीय स्वातंत्र्याचा अभाव आणि व्यक्तिकेंद्रित सत्ता ही त्यांच्या व्यवस्थेची ओळख. मात्र, केवळ राजकीय निकषांवरच त्या काळाकडे पाहणेही अपुरे ठरेल. गद्दाफी यांच्या काळात लिबिया आर्थिकदृष्ट्या आफ्रिका खंडातील एक विकसनशील राष्ट्र होते. गद्दाफी सत्तेच्या काळात लिबियाचे दरडोई उत्पन्न सुमारे ११ हजार अमेरिकन डॉलर्स होते. आज गद्दाफींच्या मृत्यूनंतर १४ वर्षांनी हेच उत्पन्न सहा हजार डॉलर्सच्या घरात घसरले आहे. त्या काळात लिबिया आफ्रिका खंडातील पाचवा श्रीमंत देश मानला जात होता. त्याकाळी सामान्य लिबियन नागरिकाचे जीवनमान तुलनेने स्थिर होते. त्यामुळेच गद्दाफी हे केवळ लिबियापुरते नव्हे, तर हुकूमशाही व्यवस्थेचा अंगीकार करणार्‍या आफ्रिका खंडातील अनेक देशांसाठी ‘एक प्रभावी नेता’ ठरले होते. यामुळेच गद्दाफी-सत्तेचे पतन हे केवळ एका हुकूमशाहीचा अंत नसून, एका विशिष्ट प्रकारच्या राज्यव्यवस्थेचा अचानक खंडित झालेला प्रवास ठरला.
 
गद्दाफींनी त्यांच्या मागे उभी राहील अशी कोणतीही व्यवस्था न उभारल्याच्या पोकळीतून लिबियाचा आजचा संघर्ष जन्माला आला आहे. ‘नाटो’च्या हस्तक्षेपानंतर गद्दाफी राजवट कोसळली. पण, त्यानंतरचा लिबिया हा विविध सशस्त्र गट, जमाती, इस्लामी संघटना आणि परकीय शक्तींच्या संघर्षाचे रणांगण बनला. तेलसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चाललेली स्पर्धा हा संघर्ष अधिक तीव्र करत राहिली. या पार्श्वभूमीवर सैफ अल-इस्लाम गद्दाफी यांचे राजकीय अस्तित्व अनेकांसाठी अस्वस्थ करणारे होते. ते गद्दाफी युगाचे प्रतीक होते. पण, त्याचबरोबर अराजकाला कंटाळलेल्या समाजासाठी एक ‘पर्यायी स्थैर्य’ही होते. मात्र, लिबियामध्ये प्रश्न ‘लोकशाही विरुद्ध हुकूमशाही’ असा सरळ नाही. खरा प्रश्न नियंत्रणाचा आहे.
 
लिबिया कायम अस्थिर राहिल्यासच स्थानिक गट, शस्त्र-व्यापार, तेल-व्यवहार आणि परकीय हस्तक्षेप यांना मोकळे रान मिळते. अशा परिस्थितीत कोणताही प्रभावी नेता तो लोकशाहीवादी असो वा हुकूमशहा, हा अनेकांच्या हितसंबंधांना बाधकच ठरतो. सैफ यांची हत्या याच वास्तवाकडे निर्देश करते. गद्दाफींचा राजकीय वारस संपवून नेमके काय साध्य झाले? गद्दाफी-काळाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता संपुष्टात आली. एकसंघ नेतृत्व उभे राहण्याची शक्यता आणखी लांबली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लिबियामधील संघर्षरत स्थिती कायम ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला. आज लिबियामध्ये लोकशाही नाही, अजूनही लिबिया सत्ताशून्यतेच्याच अंधारातच चाचपडतो आहे. गद्दाफी मारले गेले, त्यांचा मुलगाही मारला गेला; पण सामान्य लिबियन नागरिकाचे आयुष्य अधिक सुरक्षित, समृद्ध किंवा स्वायत्त झालेले नाही. उलट, दरडोई उत्पन्न घसरले आहे, स्थैर्य नष्ट झाले आहे आणि भवितव्य अधिक अनिश्चित झाले आहे. सैफ अल-इस्लाम गद्दाफी यांची हत्या ही म्हणूनच एका व्यक्तीचा अंत नसून, लिबियाला कायम संघर्षरत ठेवण्याच्या धोरणाचा भाग मानावा लागेल.
 
- कौस्तुभ वीरकर