गीतासार (भाग ३)

05 Feb 2026 11:10:00

शंभर कौरव

ज्ञानांध धृतराष्ट्रापासून जाणतेपणी अंध झालेल्या गंधारीला शंभर पुत्र व एक पुत्री झाल्याचे दाखविले आहे. या सर्व एकशेएक पुत्र व पुत्रीची नावे ‘दुः’ म्हणजे वाईट अशा विशेषणांनीचे सुरू झाली आहेत. आपल्यामध्ये वाईट म्हणजे दुर्वृत्ती अनेक म्हणजे शंभर असतात. असल्या शंभर वृत्तीरूप प्रवाहांद्वारेच आपले अधःपतन होते. ज्ञानांध धृतराष्ट्रालाच असले वाईट वृत्तीरूप शंभर पुत्ररुप कौरव असतात. त्यांची नावे दु:र्योधन, दुःशासन, दुःवृत्त, दु:मती, दु:विजय अशी असून, झालेल्या एकाच मुलीचे नावही दुःशिला अर्थात कुलटा ठेवले आहे. आपल्यातील एकशे एक वाईट वृत्ती, आपल्यातील संख्येने अल्प असलेल्या चांगल्या वृत्तीरुपी पांडवांचा जन्मतःच द्वेष व हेवा करतात. कौरवही सुरुवातीपासूनच पांडवांचा हेवा, द्वेष व शत्रुत्व करतात.

पांडव

पांडव हे पंडुचे पाच पुत्र. पंडित हा शब्द ‘पंड’ म्हणजे ज्ञान, या शब्दापासून उत्पन्न झाला. पंडित कोण? तर गीता सांगते, ‘पंडित: समदर्शिनः’ जो सर्वांना समभावाने पहातो तो पंडित. पंडु म्हणजे ज्ञानाची उत्तम रचना करणारी साधकातील वृत्ती होय. संस्कृतमध्ये जी अवस्था अथवा व्यक्ती सर्वोच्च स्थितीमध्ये असते, अशा अवस्था वृत्तीच्या नावाच्या शेवटी ‘उ’कार लावतात. जसे पंड-पंडु, मंड-मंडु, रघ-रघु, ईक्ष्वाक-ईक्ष्वाकु, काक-काकु, उपनिषद - उपनिषदत्सु इत्यादी. या पंडुचे पाच पुत्र म्हणजे पांडव होत. पांडव पाचच का? तर आपली ज्ञानेंद्रिये पाच व प्राणही पाच असतात.

धर्म

पांडवातील ज्येष्ठ बंधु धर्म आहे, जो आपल्या पिंडधर्मानुसार उत्क्रांतीकडे मार्गक्रमण करणारा श्रेष्ठ असा साधक आहे. प्रत्येक व्यक्तीने आपली उन्नती आपाल्या पिंडरचनेनुसारच करायला हवी. तरच तो साधक उन्नतीच्या परमोच्च अवस्थेप्रत जाऊ शकतो. स्वतःच्या पिंडधर्म रचनेनुसार परम उन्नती करणार्‍यालाच व्यास ‘धर्म’ म्हणतात. हा धर्म पांडवांचा ज्येष्ठ बंधू असून, त्याला युधिष्ठिरही म्हणतात. युद्धामध्ये जो न डगमगणारा आहे तो युधिष्ठिर. कोणत्या युद्धात युधिष्ठिर स्थिर होता? अध्यात्म हे वृत्तींचे अंतर्युद्ध आहे.

भीम

पांडवांमधील भीम हा द्वितीय पांडव. भीम म्हणजे साधनेतील प्रकांड बल ! वायू तत्वाचा साधक. हा भीम अतिशय बलशाली दाखविला आहे. आपण आपल्या धर्माला अनुसरून वागल्यास साधकात विलक्षण सात्त्विक बळ येते. अर्थात हे बळ आणि गदायुद्धातील कुशलता दुर्योधनालाही होती; परंतु त्या शक्तीचा उपयोग तो वाईट कर्मासाठीच करतो.

अर्जुन

तिसरा पांडव अर्जुन होय! ‘अर्’ म्हणजे येणार्‍या सर्व बाधांना एखाद्या ’आरी’ म्हणजे तीक्ष्ण शस्त्राने, अर्जुन म्हणजे साधनेत येणार्‍या सर्व बाधांना एखाद्या आरिप्रमाणे चिरत, आपले अध्यात्मिक ध्येय गाठणारा साधक होय. म्हणूनच सर्व पांडवात अर्जुन अधिक वीर दाखविला आहे. अर्जुन त्याच्या काळातील सर्वोत्तम धनुर्धर असला तरी, कौरवांच्या पक्षातील कर्णदेखील अर्जुनाहून श्रेष्ठ योद्धा दाखविला आहे. परंतु कर्णाचे जीवन दिखावटी ज्ञान आणि वीरतेमध्येच व्यग्र आणि धन्य होते. शेवटी सत्याचाच विजय होतो. उत्तम शरसंधान कोणते? याबद्दल उपनिषदकार सांगतात, ‘प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्षमुच्चते’. प्रणवोपासना हे धनुष्य असून, त्यावर संधारण केलेला शर म्हणजे बाण ब्रह्मात मारायचा असतो. ज्याचे सर्व कर्म ब्रह्माकडे अर्पण असते, त्याचे शररूपी कर्म ब्रह्म सोडून कधीच अन्य स्थानी लागत नसते. असल्या अर्जुनरूपी साधकाचे शरसंधान अचूकच असते. नकुल आणि सहदेव अध्यात्मिक साधना करणार्‍या साधकाला येणार्‍या उच्च आणि उच्चतर अनुभूती व अवस्था होत. याबद्दल आपण पुढे विचार करू. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला उपनिषदांनी अतीउच्च म्हणजे, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे स्थान दिले आहे. हे भगवान श्रीकृष्ण साधकवीर अर्जुनाच्या रथाचे वृत्ती युद्धात सारथ्य करतात.
उपनिषद सांगतात -

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु |
बुद्धिं तु सारथिं विद्धि मनःप्रग्रह मेव च ॥

आत्मा रथाचा मालक असून शरीर हा रथ आहे. बुद्धी त्या रथाची सारथी असून, मन संयमरूप लगाम आहे. भगवान श्रीकृष्ण अशा तर्‍हेने अर्जुनाच्या रथाचे सारथी व पंच सद्वृत्तीरूप पांडवांचे उपदेशक होत, ज्यामुळे कौरव-पांडवात नेहमी चाललेल्या वृत्तीरूप युद्धात पांडववृत्ती निश्चितपणे विजय मिळविते. ‘भग’ म्हणजे कल्याणकारक आणि भगवान म्हणजे कल्याणकारक बुद्धीतत्त्व. ‘श्री’ म्हणजे श्रेष्ठ आणि कृष्ण म्हणजे साधना करताना कर्षण करणारी साधकातील आत्मावस्था. शास्त्रे कृष्ण शब्दाची व्याख्या सांगतात ‘कर्षति इति कृष्णः’. जी अवस्था विश्वातील अनंत शक्तींना कर्षण करते, तिला ‘कृष्ण’ म्हणतात. अष्टांग योगात समाधी ही अती श्रेष्ठ अवस्था होय. समाधी अवस्थेत साधक तुरीय अवस्थेत असतो. असली तुरीय अवस्था, साधकाकडे विश्वातील अनंत शक्तीचे कर्षण करते. अशा तर्‍हेने साधकामध्ये विश्वातील सर्व दिव्य शक्ती आकर्षित होऊन, तो स्वतः भगवान म्हणजेच विश्वचालक होतो. यासाठीच भगवान श्रीकृष्ण अवस्थेला पूर्णावतार मानण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेद्वारे वीर साधक अर्जुनाला उपदेश केला. तो उपदेश केवळ अर्जुनासाठी नसून, वेदव्यासांनी भगवान श्रीकृष्णांच्या आदर्शाद्वारे सार्‍या विश्वालाच केला आहे. म्हणूनच ‘भगवद्गीता’ केवळ हिंदूंचाच नाही तर संपूर्ण मानवजातीचा आदर्श व्यवहार ग्रंथ आहे, उच्च आदर व्यवहार संहिता आहे.

आठ संख्यायुक्त श्रीकृष्ण

भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये आठ संख्येला खूप महत्त्व आहे. श्रीकृष्णाची जन्मतिथी अष्टमी आहे. श्रीकृष्ण हे त्यांच्या आईवडिलांचे आठवे मूल. श्रीकृष्णाला आठ बायका दाखविल्या आहेत. या आठ संख्येचे कारण अष्टांग योग आणि अष्ट महासिद्धी होत. अष्टांग योगात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी अशी आठ अंगे आहेत. अष्ट योग अभ्यासात ही समाधी अवस्था अतीश्रेष्ठ मानली जाते. संस्कृत भाषेत समाधी हा शब्द पुल्लिंगी मानला आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्णरूपाची उच्च अवस्था ही पुरुष दाखविली आहे. समाधी अवस्था अष्टयोगातील आठवी उच्च अवस्था असल्याने, श्रीकृष्णसुद्धा आठवेच दाखवून त्यांच्या पत्नीही अष्टसिद्धीच दाखविल्या आहेत.

- योगिराज हरकरे



Powered By Sangraha 9.0