मुंबई : (Jayant Patil) राज्याचे माजी अर्थमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील, कारण ते सत्तेशिवाय फार काळ राहू शकत नाहीत. हे विधान सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारसभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं.
प्रचारसभेत आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, “आता काटा उलटा फिरायला लागलाय. लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत. थोड्या दिवसांत ते भाजपात येतील. ते बाळ सत्तेविना जगू शकत नाहीत. संधी पाहून ते उडी मारतील.” त्यांनी पुढे सांगितले की, जयंत पाटील यांना भाजपात घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी तत्कालीन परिस्थितीनुसार घ्यावा.
राष्ट्रवादी काँग्रेसवर (शरद पवार गट) टीका
सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (शरद पवार गट) गेल्या २० वर्षांच्या काळात वाळवा-शिरगाव पूल, परिसरातील पाणंद रस्ते आणि पाणी योजना यांसारखी विकासकामे न केल्याचा आरोप केला. खोत म्हणाले, “जयंत पाटील २० वर्षे मंत्री राहिले, तरी जनतेसाठी कोणतेही ठोस काम त्यांनी केले नाही. जनतेला गरिबीत ठेवून त्यांना गुलाम बनवण्याचा हेतू राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) होता.”
क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष
त्यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केल्याबद्दलही राष्ट्रवादी काँग्रेसवर (शरद पवार गट) ताशेरे ओढले. खोत म्हणाले, “क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्मारक या भूमीत व्हावे, असे कधीही त्यांच्या मनात आले नाही. समाजासाठी त्यांचे कोणतेही काम नाही. जनसेवेचे एकही काम केले नाही. त्यामुळे त्यांच्या पायात या निवडणुकीत जनता पत्रा ठोकल्याशिवाय राहणार नाही.”
क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयासाठी २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी निधी मंजूर केला होता, मात्र सरकार बदलल्यानंतर तो निधी रोखण्यात आला. आता महायुती सरकारने या महाविद्यालयासाठी १५ कोटी रुपये निधी दिल्याचे ते म्हणाले.
सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्यावर थेट नाव न घेता टीका केली. त्यांच्या या फटकेबाजीमुळे सांगलीच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे.