ज्ञानदीप लावू जगी....

05 Feb 2026 11:32:03

कीर्तन ही केवळ भक्तीची अभिव्यक्ती नसून ती विचार, आणि समाजप्रबोधनाची परंपरा आहे. मात्र, बदलत्या श्रवणसवयींमध्ये आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावात या परंपरेचे स्थान नेमके काय, हा प्रश्न उपस्थित होतो. अशा वेळी विविध कीर्तनपरंपरांना एकत्र आणणारे ‘कीर्तनविश्व’ हे डिजिटल व्यासपीठ एका व्यापक सांस्कृतिक उपक्रमाचे द्योतक ठरते. आधुनिक माध्यमाचा वापर करताना येणारी आव्हाने तसेच या उपक्रमाची भूमिका या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ‘कीर्तनविश्व’ या उपक्रमाचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटुकले यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी साधलेला संवाद...

‘कीर्तनविश्व’ हे कीर्तनकारांसाठी डिजिटल व्यासपीठ उभारण्यामागे वैचारिक भूमिका काय होती?

कीर्तन हा एक प्राचीन ‘मीडिया’ आहे. समाजमनावर सकारात्मक संस्कार करण्याचे, त्याला नैतिकतेचे शिक्षण देण्याचे अणि धर्माभोवती केंद्रित आपले आयुष्य कसे जगावे, याचे मार्गदर्शन करणारी ती शिक्षणव्यवस्था होती. आधुनिक माध्यमांचा जन्म हा १२५ वर्षांपूर्वीचा आहे; मात्र कीर्तनाला लाभलेली परंपरा ही त्याहून प्राचीन आहे. पूर्वी या देशामध्ये वेद-उपनिषदांमध्ये असलेल्या ज्ञानाचे सुलभीकरण करून, समाजापर्यंत नेण्याचे कार्य या पुराणकार आणि कीर्तनकारांनी केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मानवी आयुष्य हे इतके गतिमान झाले आहे, की त्याला स्वतःकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. मानवी आयुष्यामध्ये शारीरिक भुकेबरोबरच मनाचीही भूक महत्त्वाची आहे. हीच भूक भागवण्याचे कार्य डिजिटल माध्यमातून करावे, या विचाराने ‘कीर्तनविश्व’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ कोविड काळात २०२१मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रोवण्यात आली. याची मूळ प्रेरणा कोल्हापूरच्या मुरगुड येथील प. पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख आणि अमरावतीच्या प. पू मंदाताई गंधे या आध्यात्मिक अधिकारी व्यक्तींनी आयोजन केलेल्या २०१५ सालच्या अमरावती येथील कीर्तन संमेलनामध्ये आहे. त्यावेळी स्वयंसेवक म्हणून सेवारत असताना मिळालेल्या प्रेरणेतून याची सुरुवात झाली.

आजच्या काळात कीर्तनाचे नेमके महत्त्व काय?

सध्या कीर्तन म्हणजे ’कॉमेडी’ करण्याचे माध्यम असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरत आहे. वास्तविक, कीर्तनामध्ये अनेक परंपरा आहेत. कीर्तनाची मूळ परंपरा ‘नारदीय परंपरा’ आहे. नवविधा भक्तीमधील कीर्तन ही दुसर्‍या क्रमांकाची आहे. त्यामुळे सनातन वैदिक धर्मामध्ये संसाराला शंकराचार्यांनी मिथ्या मानले आहे. ब्रह्म हेच एकमेव सत्य आहे आणि त्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे भक्तिमार्ग. आज समाजातील तरुणांवर पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव आहे. त्यामधून क्षणिक आनंदाची अनुभूतीदेखील होते. मात्र, दुसरीकडे त्यांचे पालक, आजी-आजोबा ऐकत असलेल्या कीर्तने, प्रवचनातून नेमक्या कोणत्या सुखाचा अनुभव येतो याचेच या पिढीला आकलन होत नाही. अशा वेळी देशातील या संभ्रमित झालेल्या या तरुणांना कीर्तन मार्ग दाखवते. समाजातील अठरापगड जातींमध्ये असणार्‍या कीर्तनपरंपरांचा ‘कीर्तनविश्व’ या उपक्रमामध्ये समावेश आहे. नारदीय कीर्तनाबरोबरच, रामदासी, वारकरी, दासगणू, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा अशा विविध परंपरांच्या माध्यमातून ‘कीर्तनविश्व’ने समरसतेला महत्त्व दिले आहे.

परंपरेने चालत आलेली कीर्तनसंस्कृती आणि आजचा डिजिटल प्रेक्षक या दोहोंमध्ये सेतू बांधताना काय तारेवरची कसरत करावी लागते?

भारतीयांमध्ये, खासकरून महाराष्ट्रीय माणसामध्ये धार्मिकता, सहिष्णुता त्यांच्या रक्तात आहे. सध्या तो भांबावलेला आहे. अशा वेळी त्याच्यावर चढलेली अविद्येची काजळी काढण्यासाठीच ‘कीर्तनविश्व’ उपक्रम काम करतो आहे. या उपक्रमासाठी अनेक मान्यवरांचे सहकार्य, मार्गदर्शन लाभले. यामध्ये उपक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प. पू स्वामी गोविंददेव गिरी आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे हे याचे मुख्य समन्वयक आहेत. याबरोबरच चैतन्य महाराज देगलूरकर, अवंतिकाताई टोळे अशा अनेक मोठ्या मान्यवरांची साथ लाभली. आज चांदा ते बांदा संपूर्ण महाराष्ट्र, तसेच गोव्यातीलही कीर्तनकारही या उपक्रमामध्ये आवडीने सहभागी होत आहेत. फक्त सर्व कीर्तनकारांचे वेळापत्रक संभाळण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. मात्र, सगळेच कीर्तनकार आत्मीयतेने सहकार्य करतात. समाजाकडूनही आमच्या या उपक्रमाला भक्कम पाठिंबा मिळत असून, आज या उपक्रमाला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरोप तसेच अगदी आखाती देशांमधील श्रोतेही लाभले. त्यामुळे या सगळ्यामध्ये कसरत नसून, सर्वत्र निव्वळ आनंदाचीच अनुभूती आहे.

आशयाची सातत्यपूर्ण गुणवत्ता राखणे हे मोठे आव्हान असते; त्यामुळे निवड कशी करता?

यामध्ये शुभांगी आफळे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आफळेबुवांबरोबरचा संसार आणि सासरे गोविंदस्वामी यांची सेवा यांमुळे कीर्तनाचा त्यांचा अभ्यास जवळपास ४० वर्षांचा आहे. त्यानंतर कीर्तनामध्ये ‘पीएचडी’धारक असलेल्या प्रख्यात प्रवचनकार कल्याणीताई नामजोशी, चारुदत्तबुवा आफळे, चैतन्यमहाराज देगलुरकर, डॉ. विजय भटकर हे सगळे व्यासंगी आणि तज्ज्ञही मार्गदर्शन करतात. स्वामी गोविंद देवगिरी यांचेही मोलाचे मार्गदर्शन कायम मिळत असते. तसेच, या उपक्रमासाठीचे तांत्रिक सहाय्य ‘भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम’चे तंत्रज्ञ करत आहेत. सध्या उपक्रमाला तीन वर्षे झाल्यावर नव्या विषयांची निकड भासू लागल्याने, देशातील मंदिरांवर कीर्तने केली, पुराणांचे खरे स्वरुप, त्यातील ज्ञान लोकांपर्यंत जाण्यासाठी आफळेबुवांनी २४ भागांची कीर्तनमालिकाच सादर केली. सध्या भारतीय ज्ञानशाखेचा ज्ञानशाखेच्या प्रसारावर ‘कीर्तनविश्व’ काम करत आहे.

आजवर ‘कीर्तनविश्व’वर किती कीर्तने उपलब्ध आहेत आणि एकूण जनमानसाची प्रतिक्रिया काय?

सध्या ‘कीर्तनविश्व’च्या युट्यूब वाहिनीवर ८०० पेक्षा अधिक विविध विषयांची, तसेच विविध शैलींतील कीर्तने आज श्रोत्यांसाठी उपलब्ध आहेत. रा. स्व. संघाच्या काही सरसंघचालकांच्या कार्याची महती सांगणारी कीर्तनमालिकाही या वाहिनीवर आहे. १०-१५ देवतांची जन्माची कीर्तने आम्ही ‘कीर्तनविश्व’ वाहिनीवर प्रसिद्ध केली होती. महाराष्ट्रातील काही गावांमध्ये कीर्तनासाठी बुवा न मिळाल्याने, ही कीर्तने स्क्रीनवर लावून उत्सव साजरे केले गेले. आमच्यासाठी हा विलक्षण अनुभवच होता. परदेशांतही अनेकदा उत्सवकाळात अशीच ‘कीर्तनविश्व’वरील कीर्तने ऐकली जातात. यामुळे कृतार्थतेची भावना मनामध्ये निर्माण होते.

आजचा प्रेक्षक माहितीने समृद्ध, पण संयमाने गरीब आहे, असे म्हटले जाते. अशा काळात लोकांचा रस टिकून राहावा, यासाठी काय काळजी घेता?

मानवी आयुष्यातील संयम कमी झाल्याचे मी तरी मानत नाही. मुळात, ही सगळी मार्केटिंगची किमया आहे. मानवी शरीराला जेवढी गरज आहे, तेवढे अन्न मिळाल्याशिवाय भूक भागणार नाही. तद्वतच मनाचीही एक भूक आहेच. त्याच्या शांतीसाठी आवश्यक त्या प्रमाणात खाद्य त्याला द्यावेच लागणार. भाकरीची भूक बर्गरवर कशी भागेल? आम्ही ईश्वराचे कार्य करत असल्याने लोकांच्या मागे जाण्यापेक्षा, त्यांना सात्त्विक आनंद कसा देता येईल, याचा विचार आम्ही करतो. आज अनेक घरांमध्ये जेवण झाल्यानंतर दररोज नित्यनेमाने ‘कीर्तनविश्व’वरील एखादे कीर्तन ऐकल्याशिवाय झोपायचे नाही, हा नित्य उपक्रम झाला आहे. आवड असली की सवड मिळतेच; त्यासाठी विशेष काही करावे लागत नाही.

भविष्यातील पिढी कीर्तनाकडे केवळ धार्मिक बाब म्हणून पाहील की वैचारिक-सांस्कृतिक वारसा म्हणूनही बघेल?

सध्या समाजामध्ये वैचारिक, सांस़्कृतिक शिक्षण देणारी व्यवस्थाच उपलब्ध नाही. मॅकॉलेच्या शिक्षणपद्धतीने लोकांना अर्थ आणि काम यांमध्येच गुंतवून ठेवले आहे. मानवी जीवनाचा त्यापलीकडचा अर्थ आज लक्षात येत नाही. मात्र, आजकालच्या तरुणांना जीवनामध्ये कशाची तरी उणीव जाणवू लागली आहे. पण, त्यांना मार्गदर्शन करणारी, आधार देणारी व्यवस्थाच कुठे आहे? अशा वेळी अनेक तरुणांना तो आधार ‘कीर्तनविश्व’मुळे मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही मुले तसे झपाटल्यासारखे कीर्तन बघतात. आम्ही एक कीर्तन प्रवचनाचा ऑनलाईन वर्गदेखील घेतला होता. यामध्ये प्रवेश घेतलेल्या ५०० जणांपैकी, जवळपास १५० जणांनी प्रत्यक्ष कीर्तन-प्रवचन करण्यास सुरुवातही केली.

कीर्तनपरंपरेला आधुनिक व्यासपीठ देताना सर्वांत मोठा धोका आणि सर्वांत मोठी संधी कोणती आहे?

डिजिटल तंत्रज्ञान एक शस्त्र आहे. आजवर हिंदू समाजाला आजूबाजूच्या जगात चाललेल्या घटनांची कल्पनाच नसे मात्र, डिजिटल तंत्रज्ञानाने आज हिंदू जागृत तर झालाच, पण परिस्थितीबाबत साक्षर आणि सजगही झाला. त्यामुळे पुढील काळामध्येही डिजिटल माध्यमांचा वापर वाढणार आहेच. त्यात आता कृत्रिम बुद्धिमत्ता आली आहे. त्यामुळे पुढे होणारे संक्रमण फार मोठे आहे. यामध्ये हॅकिंग, परकीय कंपन्यांनी एखादी कलाकृतीवर बंदी घालण्याचा धोका आहेच. त्यामुळेच आम्ही ‘कीर्तनविश्व’ वाहिनीचे अ‍ॅप्लिकेशन तयार केले असून, येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रोत्यांच्या सेवेमध्ये दाखल होईल.

डिजिटल युगाशी जोडताना भविष्यात काय नवीन योजना आखल्या आहेत?

सेवेत येणार्‍या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून एक कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तसेच, कीर्तनाबरोबरच प्रवचनांसाठी आम्ही ‘प्रवचनविश्व’ नावाची वाहिनी सुरू करत आहोत. तसेच ‘संवत्सरीय प्रवचनमाला’ उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यातील एक आठवडा प्रवचने आणि ‘बारोमास व्याख्यानमाले’च्या माध्यमातून श्रोत्यांसाठी व्याख्याने घेऊन येत आहोत. तसेच, दहा हजार लोकांनी कीर्तनकार-प्रवचनकार व्हावे, यासाठीही आम्ही प्रयत्न करणार आहोत.


- कौस्तुभ वीरकर




Powered By Sangraha 9.0