आदिशक्तिपीठातर्फे देण्यात येणारा ‘शक्ती पुरस्कार २०२६’ सन्मान तनुजा सावंत-देशमुख यांना जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा हा लेख...
२०१३ पासून शासकीय आरोग्य योजना टाटा स्मारक रुग्णालये, मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये, टाटा ट्रस्टची रुग्णालये अशा ५० पेक्षा जास्त रुग्णालयांमध्ये आणि भारतातील नऊ राज्यांमध्ये प्रभावीपणे राबविणार्या तनुजा देशमुख-सावंत यांना हा मानाचा समजला जाणारा ‘ शक्ती पुरस्कार २०२६’ जाहीर झाला. मालाड पूर्व येथील आदिशक्तिपीठातर्फे देण्यात येणारा ‘शक्ती पुरस्कार २०२६’ हा आरोग्यक्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणार्या या रणरागिणीला जाहीर झाला आणि भारतीय नारीशक्तीच्या पंक्तीत अशाच एका नक्षत्राची नोंद झाली.
हा केवळ पुरस्कार नाही, तर ही पोच आहे,पावती आहे, तनुजा यांच्या परिश्रमाची, संघर्षाची आणि हजारो रुग्णांनी दिलेल्या आशीर्वादाची. त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. जोगेश्वरीतील बांद्रेकरवाडीतील चाळीतील अगदी छोट्याशा घरात त्यांचे बालपण गेले. वडील रमेश सावंत हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. मोठी ताई निवेदिता ही ‘अभाविप’ व ‘समरसता मंचा’चे काम करत होती; लहान भाऊ निलेश सावंत हा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक. त्यामुळे समाजसेवेचे बाळकडू अगदी लहानपणापासून मिळत गेले. त्याही ‘अभाविप’च्या कार्यकर्ता बनल्या. मराठवाडा, खान्देश या ठिकाणी पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करत असताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी केलेली आंदोलने, संघर्ष यातूनच त्या घडत गेल्या.
‘क्षेत्र कुठेही रिक्त राहिले, हे आता होणे नाही,’ अशा संदर्भाचे एक गीत संघ परिवारात सर्वश्रुत आहे. याच उक्तीप्रमाणे आरोग्य शासकीय योजनांचा अभ्यास करत विकास देशमुख यांनी ‘छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन्स’ नावाची कंपनी सुरू केली होती. शासनाच्या आरोग्य योजना या सर्वसामान्य गरजू रुग्णांपर्यंत पोहोचण्यास विलंब होत होता. अनेक त्रुटी त्यात होत्या. या सर्वांचा अभ्यास करत सुरू केलेल्या कंपनीची धुरा त्यांच्या पत्नी तनुजा देशमुख यांनी सांभाळली. विकास देशमुख यांच्या सोबत आरोग्यसेवाकार्यात तनमनधन अपूर्ण काम केले. गेल्या १३ वर्षांच्या कालावधीत ६६.५५ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना २३ हजार, २८८ कोटींपेक्षा जास्त रकमेचे उपचार शासकीय आरोग्य योजनेच्या माध्यमातून मिळवून दिले.
१० हजार, ३६३ पेक्षा जास्त लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. कंपनीमध्ये तनुजा ‘बॉस’ असल्या, तरी त्यांच्या स्वभावामुळे त्या सगळ्यांना आपलीशी करणारी मोठी बहीणच वाटतात. यामुळे ‘सी. एस. क्रिएटिव्ह सोल्युशन्स’ ही कंपनी न राहता, एक कुटुंबच झाले आहे आणि हे कुटुंब एकाच ध्येयाकडे मार्गक्रमण करत आहे; ते म्हणजे, रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येकाला शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. तनुजा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्तम पद्धतीची मार्गक्रमणा करत आहे.
२४x७ उपलब्धता, ‘आरोग्यदूत सॉफ्टवेअर’मार्फत बेड ते बेड सर्व्हिसेस (शासकीय आरोग्य योजनांचा लाभ बेडजवळ मिळतो, धावपळ करण्याची गरज नाही.) सेवाव्रती, १०० टक्के क्लेम सक्सेस, समुपदेशन, डॉक्टरांसाठी कार्यशाळा आणि सर्वांत महत्त्वाचे शून्य तक्रार पॉलिसी अशी काही प्रमुख वैशिष्ट्ये म्हणता येतील. शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून असंख्य रुग्णांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणार्या तनुजा देशमुख यांना ‘शक्ती पुरस्कार’ जाहीर होणे, हा एक आनंदाचा विषय असून तनुजा यांना या पुरस्कारासाठी खूप खूप शुभेच्छा. तनुजा देशमुख. यांनी चालवलेला आरोग्यसेवेचा हा महायज्ञ असाच पुढे सुरू राहील, यात तीळमात्र शंका नाही. त्यांचे हे आरोग्यसेवेचं काम असेच पुढे वाढत राहो आणि सर्वांचे आराध्य प्रभू श्रीराम आपल्याला उदंड आयुष्य देवो, अशा मनापासून शुभेच्छा!
- प्रसाद मोर्जे