लग्नानंतरही हिंदूच राहशील म्हणून लग्न केलं, नंतर जबरदस्तीने धर्मांतर केलं

Total Views |

मुंबई :
  कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे प्रेमाच्या नावाखाली एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुटुंब, समाज आणि स्वतःचा धर्म त्यागून प्रेमासाठी सर्वस्व दिलेल्या एका हिंदू तरुणीला अखेर न्यायासाठी पोलिसांच्या दारात धाव घ्यावी लागली आहे. मुस्लिम युवकाने तरूणीला लग्नानंतर तू हिंदू राहू शकते असे सांगितले मात्र लग्नानंतर तिचे धर्मांतर करत सादिया तबस्सुम असे तिचे नाव ठेवले.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ साली कॉलेजचे शिक्षण घेत असताना तिची ओळख परवेज या तरुणाशी झाली. ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. मात्र विवाहाचा विषय पुढे येताच तिच्या कुटुंबीयांनी धर्म वेगळा असल्याने या नात्याला तीव्र विरोध केला. त्या वेळी परवेजने तिच्या कुटुंबीयांना विश्वास दिला की तो कधीही तिला धर्म बदलण्यास भाग पाडणार नाही. या आश्वासनावर विश्वास ठेवत १५ डिसेंबर २०१९ रोजी दोघांचा विवाह पार पडला.

लग्नानंतर काही काळातच परवेजच्या वागण्यात मोठा बदल झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तिने सांगितले की, तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी मानसिक तसेच शारीरिक दबाव टाकण्यात येऊ लागला. धर्मांतर न केल्यास घटस्फोट देण्याची धमकीही दिली गेली. संसार वाचवण्यासाठी आणि नातं टिकवण्यासाठी अखेर तिने इस्लाम स्वीकारला आणि तिचे नाव सादिया तबस्सुम ठेवण्यात आले. तरीही घटस्फोट न देता परवेजने दुसऱ्या महिलेशी निकाह केला.  

आपल्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप करत सादियाने प्रथम स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र तेथून अपेक्षित मदत न मिळाल्याने तिने थेट बेंगळुरू पोलीस आयुक्त, डीजीपी आणि आयजीपी यांच्याकडे दाद मागितली आहे. प्रेमाच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली असून, आता आपल्या दोन निष्पाप मुलांच्या भविष्यासाठी न्याय हवा आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया पीडितेने दिली आहे.

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.