कह रैदास... भेद न कोई!

04 Feb 2026 11:54:25
Sant Rohidas Maharaj
 
संत रोहिदास महाराजांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त ‘विश्व हिंदू परिषद’ कुलाबा जिल्हा, रायगड विभाग, कोकण प्रांत, तसेच ‘रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबई’ आणि ‘समाज कल्याण समिती’ या संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून मुंबई आणि नवी मुंबई येथील हिंदू समाजातील सामाजिक समरसतेचा दीप अधिक प्रखर केला गेला. संत रोहिदास महाराजांनी भेदभाव, जातीयता आणि समानतेची दरी मोडून मानवता, समानता आणि आत्मसन्मानाचा जो मार्ग दाखवला, त्याचा आजच्या बदलत्या काळात अधिक व्यापक अर्थ हिंदू समाजाला लाभतो. या संस्थांचे उपक्रम समाजात एकात्मता आणि सामाजिक समरसतेची नवी उभारी निर्माण करत आहेत. त्याविषयीचा आढावा...
 
हिंदू समाजातील भेदभाव आणि जातीयतेच्या भिंती केवळ भाषणांनी नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतूनच कोसळू शकतात, हा विचार नवी मुंबईतील कामोठे येथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. संत रोहिदास महाराजांच्या ६४९व्या जयंतीनिमित्त ‘विश्व हिंदू परिषदे’तर्फे आयोजित सामाजिक समरसता यज्ञ व सहभोजन कार्यक्रमाने सामाजिक ऐयाचा ठोस संदेश समाजापर्यंत पोहोचवला. माघ पौर्णिमेच्या दिवशी ‘विश्व हिंदू परिषद’ कुलाबा जिल्हा, रायगड विभाग, कोकण प्रांत यांच्या पुढाकारातून हा उपक्रम कामोठे येथे राबवण्यात आला. समाजातील विविध घटकांमध्ये समानता, बंधुता आणि परस्पर सन्मानाची भावना दृढ करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. संत रोहिदास महाराजांनी आपल्या विचारांतून माणुसकी, आत्मसन्मान आणि समतेचा जो संदेश दिला, तो आजच्या समाजात अधिक अर्थपूर्ण ठरतो, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
 
‘विश्व हिंदू परिषद’ गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक समरसतेसाठी सातत्याने कार्यरत आहे. हिंदू समाजातील जातीयता, अस्पृश्यता आणि सामाजिक दरी दूर करण्यासाठी केवळ वैचारिक मंथन न करता, प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याची भूमिका परिषद सातत्याने मांडत आली आहे. समरसता यज्ञ आणि सहभोजनासारखे उपक्रम हीच भूमिका कृतीतून व्यक्त करतात.कार्यक्रमात उपस्थित समाजबांधवांनी ‘दैवी विग्रह’ यज्ञात आहुती अर्पण करून सामाजिक समरसतेचा संकल्प केला. त्यानंतर सर्वांनी एकत्र बसून सहभोजन केले. कोणताही भेद न ठेवता, एकाच पंगतीत भोजन करणे हा सामाजिक समतेचा प्रभावी अनुभव ठरला. हा क्षण अनेकांसाठी केवळ कार्यक्रम न राहता आत्मचिंतनाचा आणि परिवर्तनाचा ठरला.
 
यावेळी कोकण प्रांत समरसता सहप्रमुख कृष्णाजी बांदेकर यांनी सामाजिक समरसतेच्या कार्याचा संदर्भ देत, समाजात एकात्मता टिकवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. संत रोहिदास महाराजांचा संदेश हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण समाजाला जोडणारा असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मैत्रीबोध परिवारा’चे संत मित्र जीव आणि साध्वी रूपाली भारती यांनी आपल्या आशीर्वचनातून संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे स्मरण करून दिले. मानवतेचा, समानतेचा आणि परस्पर सन्मानाचा भाव जीवनात उतरवण्याची गरज त्यांनी उपस्थित समाजबांधवांसमोर मांडली.
 
कार्यक्रमाला विविध सामाजिक स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून यज्ञात सहभाग घेतला, सहभोजन केले आणि सामाजिक समरसतेचा भाव प्रत्यक्ष कृतीतून अनुभवला. या एकत्रित सहभागामुळे समाजातील भेदाभेद दूर करण्याचा संदेश अधिक प्रभावीपणे पुढे गेला. संत रोहिदास महाराजांच्या ६४९व्या जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता, समाजपरिवर्तनाची दिशा दाखवणारा ठरला. सामाजिक समरसता ही केवळ संकल्पना न राहता ती आचरणात आणली पाहिजे, हा संदेश कामोठे येथील या कार्यक्रमातून ठळकपणे अधोरेखित झाला.
 
‘विश्व हिंदू परिषद’ यांच्या आयोजनाखाली झालेल्या या कार्यक्रमात सहभागी होताना हिंदू धर्मातील सामाजिक समरसता केवळ विचारांपुरती न राहता, प्रत्यक्ष कृतीत अनुभवायला मिळाली. यज्ञात आहुती अर्पण करताना आणि सहभोजनात सहभागी होताना समाजातील भेद विसरून एकतेचा भाव मनात रुजला. संत रोहिदास महाराजांचा समतेचा संदेश आजही समाजाला जोडणारा आहे, याची प्रचिती या उपक्रमातून आली. अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक ऐय अधिक दृढ होईल, असा विश्वास वाटतो.
 
- बाळासाहेब वर्पे, उद्योजक मुंबई
 
रोहिदास समाज पंचायत संघ’ मुंबई आणि ‘समाज कल्याण समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या ६४९व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजोपयोगी उपक्रमांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले. या कार्यक्रमातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘वधू-वर सूचक समिती’च्या संकेतस्थळाचे उद्घाटन. हे उद्घाटन समाजनेते व आमदार मंगेश कुडाळकर, ‘रोहिदास समाज पंचायत संघा’चे अध्यक्ष मयूर देवळेकर आणि ‘वधू-वर सूचक समिती’चे अध्यक्ष शशिकांत आंबेकर यांच्या हस्ते पार पडले. समाजातील युवक-युवतींसाठी सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह विवाह व्यवस्थेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरले. कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. दीपप्रज्वलन उपाध्यक्ष गणेश चव्हाण यांच्या हस्ते माजी विश्वस्त विजय गोवळकर, संघ निवडणूक समिती अध्यक्ष जगदीश जळगावकर, विश्वस्त पंढरीनाथ जानवलकर, दीपक अडविरेकर, महिला संघटन समिती अध्यक्षा अश्विनी प्रभुलकर, चिटणीस सपना बसनकर, विभाग अध्यक्ष केशव पंदिरकर आणि एकनाथ धयालकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 
याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष गणेश चव्हाण, बळीराम सुसवीरकर, निवडणूक समिती अध्यक्ष जगदीश जळगावकर, सचिव संतोष गोठणकर आणि सूर्यकांत दाभोळकर यांनी मनोगते व्यक्त केली. संत रोहिदास महाराजांचे समता, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाचे विचार आजच्या समाजासाठी किती आवश्यक आहेत, यावर सर्व वक्त्यांनी भर दिला. कार्यक्रमात अध्यक्ष मयूर देवळेकर यांनी संत रोहिदास भवनाच्या बांधकामासंदर्भात सविस्तर माहिती दिली. २०२६ मध्ये या भवनाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त करत, समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. आमदार मंगेश कुडाळकर यांनी "संत रोहिदास भवनासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल,” असे स्पष्ट आश्वासन याप्रसंगी उपस्थितांसमोर दिले.
 
या कार्यक्रमात ‘रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबई’च्यावतीने युवा प्रतिनिधी म्हणून सलोनी देवळेकर यांनी केलेल्या भाषणात समाजातील युवकांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि सामाजिक सन्मान या विषयांवर त्यांनी ठामपणे भूमिका मांडली. उपस्थितांनी त्यांच्या भाषणाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘समाज कल्याण समिती’ अध्यक्ष सुनील वायंगणकर यांनी केले. पंचायत पदाधिकारी, विभाग पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्या आणि मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती कार्यक्रमाच्या व्यापकतेचे द्योतक ठरली. संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम केवळ उत्सव न राहता, समाजाच्या संघटित आणि सशक्त भविष्याचा निर्धार करणारा ठरला.
 
नव्या पिढीतून समाज प्रगती
 
आजचा चर्मकार युवक दया नाही, तर समान संधी मागत आहे. शिक्षणासाठी वेळेवर शिष्यवृत्ती, स्वतंत्र वसतिगृहे, स्पर्धा-परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन, कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आणि उद्योजकतेसाठी सुलभ कर्ज योजना या केवळ मागण्या नाहीत, तर समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक बाबी आहेत. नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन, संधी आणि व्यासपीठ दिले, तर चर्मकार समाज देशाच्या विकासात निर्णायक भूमिका बजावेल.
 
-सलोनी देवळेकर, युवा कार्यकर्ती, रोहिदास समाज पंचायत संघ
 
 
- सागर देवरे
 
 
 
Powered By Sangraha 9.0