kolhapur news - कोल्हापुरातून दारकरी कोळ्याचा नव्या प्रजातीचा शोध; शहराच्या मध्यभागी आढळ

    04-Feb-2026
Total Views |
kolhapur news



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
कोल्हापूरातून दारकरी कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (kolhapur news). 'ट्रॅपडोअर स्पायडर' या सामान्य इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोळ्याच्या जातीमधील हा कोळी आहे (kolhapur news). कोल्हापूरच्या शहरी भागामधून कोळ्याची ही नवी जात शोधल्यामुळे तिचे नामकरण कोल्हापूरच्या नावे टाईटनइडिओप्स कोल्हापूरइन्सिस, असे करण्यात आला आहे. (kolhapur news)
 
 
कोळ्यांचा एक गट बीळ खणून त्याच्या तोंडावर दरवाजा बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. 'ट्रॅपडोअर स्पायडर' या सामान्य इंग्रजी नावाने त्यांना ओळखले आते. बिळांना दार करण्याच्या त्यांच्या लकबीवरुन त्यांना 'दारकरी' हे मराठी नाव देण्यात आले आहे. याच दारकरी कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन आणि शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी लावला आहे. हा शोध सत्पाल गंगलमाले यांच्या शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागामधून सुरु असलेल्या पीएचडी संशोधनाचा भाग आहे. प्रा. डॉ. सुनिल गायकवाड हे या अभ्यासक्रमाचे मार्गदर्शक आहेत. त्याचसोबत या संशोधनामध्ये,ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांचा सहभाग आहे. याविषयीचा शोध निबंध 'जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री' या युनायटेड किंग्डममधून प्रकाशित होणार्‍या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकेमधून प्रकाशित झाला आहे.
 
 
कोल्हापूर शहरामधील शिवाजी विद्यापीठ, शेंडा पार्क, कोल्हापूर चित्रनगरीचा परीसर आणि पुईखडीच्या टेकडीवरुन दारकरी कोळ्याच्या नवीन प्रजात आढळून आली आहे. नव्याने शोधलेल्या प्रजातीमधील कोळ्यांच्या दातांची रचना आणि आठ डोळ्यांच्या मांडणीवरुन त्यांचा समावेश 'टाईटनइडिओप्स' या कुळात करण्यात आला आहे. कोल्हापूर शहरामधील त्यांच्या आढळक्षेत्रावरुन त्यांना 'टाईटनइडिओप्स कोल्हापूरईन्सिस' असे नाव देण्यात आले आहे. कोल्हापूरचा दारकरी कोळी गवताळ माळांच्या सपाट पृष्ठभागावर उभी किंवा उतारावरील जमिनीवर तिरकी बिळे करतो. बिळांच्या सुरुवातीला बनवलेले दरवाजे बाहेरच्या बाजूने भोवतालाशी तंतोतंत मिसळलेले असतात. त्यामुळे दरवाजा बंद असतो तेव्हा या कोळ्यांचे अस्तित्व कळून येत नाही. भोवतालात मिसळलेला दरवाजा हा त्यांच्या भक्ष्यांसाठी लावलेला सापळा असतो. भक्ष टप्प्यात आले की हे कोळी क्षणार्धात त्यांना पकडतात आणि आत खेचून नेतात. तसेच हे दरवाजे कोळ्यांना त्यांच्या भक्षकांपासून संरक्षण पुरवतात. आयुष्याचा बहुतेक काळ हे कोळी आपल्या बिळांमधे लपून किंवा दबा धरुन बसलेले असतात. रातकिड्यांसारखे छोटे कीटक हे त्यांचे खाद्य आहे.
 
इतर निरीक्षण
नवीन प्रजातीच्या शोधाबरोबरच, या शोधनिबंधामध्ये त्यांच्या कोल्हापूरातील आढळक्षेत्रामधील आढळाविषयीची प्राथमिक निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. अभ्यासक्षेत्रामधील नैसर्गिक माळरानांवर हे कोळी मोठ्या संख्येने आढळून आले. नैसर्गिक माळरानांवर उंदीरमारी या विदेशी वृक्षाची लागवड केलेल्या परीसरात नवीन प्रजातीच्या कोळ्यांचे कसलेही अस्तित्व आढळून आले नाही. तसेच शिवाजी विद्यापीठ, शेंडा पार्क आणि कोल्हापूर चित्रनगरी परीसरातील नैसर्गीक माळरानांवर हे कोळी मोठ्या संख्येने आढळून आले. कोल्हापूर शहरालगतचा नैसर्गीक माळरानांचा अधिवास असलेला भाग इमारतींचे बांधकाम, शेती यांसाठी वापरात आणला जात आहे. सदरच्या संशोधनामधे अभ्यास केलेले आढळक्षेत्र सोडून भोवतालच्या तीसेक किलोमिटरच्या परीघामधे तरी या कोळ्यांसाठी अनुकूल अधिवास आहे. नव्याने शोधलेल्या कोळ्याचे अस्तित्व या अनुकूल भागांमधे असू शकते, असे संशोधकांचे मत आहे. कोल्हापूरमधील नैसर्गीक गवताळ माळरानांवरील फेरबदल थांबवले नाहीत, त्यांवर केली जाणारी विदेशी वृक्षांची लागवड थांबवली नाही, विदेशी वृक्षलागवड केलेल्या जागांचे पुन:स्थापन केले नाही, तसेच नैसर्गीक माळरानांवरील कोणत्याही प्रकारच्या विकासकामांसाठी केले जाणारे हस्तांतरण थांबवले नाही तर कोल्हापूरच्या दारकरी कोळ्याची प्रजाती स्थानिक पातळीवरुन नष्ट होण्याचा धोका आहे.