ऑस्ट्रेलियामध्ये महात्मा गांधींचा पुतळा चोरीला; ४२६ किलोचा पुतळा ग्राइंडरने कापला

04 Feb 2026 18:36:55

मुंबई :
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे असलेला गांधीजींचा कांस्य पुतळा चोरांनी ग्राइंडरने कापून चोरून नेला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध करत ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांना पुतळा परत मिळवून देण्याचे आणि गुन्हेगारांना अटक करण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोव्हिल येथील ऑस्ट्रेलिया इंडियन कम्युनिटी सेंटरमध्ये महात्मा गांधीजींचा ४२६ किलोग्रॅम वजनाचा कांस्य पुतळा होता. चोरीच्या उद्देशाने चोरांनी ग्राइंडर वापरून पुतळ्याच्या पायापासून कापला यामुळे या पुतळ्याचे फक्त पंजेच त्या ठिकाणी शाबूत राहिले.

दरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, मेलबर्नमधील रोव्हिल येथील ऑस्ट्रेलिया इंडिया कम्युनिटी सेंटरमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अज्ञात लोकांनी केलेल्या नुकसानाचा आणि ते हटवण्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करावी.  

मेलबर्न पोलिसांनी भंगार विक्रेत्यांना कांस्य पुतळा विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. तसेच कोणत्याही संशयास्पद हालचालीची त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचे प्रतीक म्हणून पुतळा उभारण्यात आला होता.
Powered By Sangraha 9.0