कुतूहलातून छंदाकडे...

    04-Feb-2026
Total Views |
Shriram Somase
 
बालवयात संगीताविषयी असलेल्या कुतूहलातून जन्मलेल्या छंदाच्या आधारे स्वप्नांना गवसणी घालणार्‍या श्रीराम सोमासे यांच्याविषयी...
 
मानवाला अनेक गोष्टींचे कुतूहल असते. त्यापायी तो एकतर ती गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा दुर्लक्ष करतो. एखाद्या गोष्टीचे कुतूहल माणसाला स्वस्थ बसू देत नाही. हे कुतूहलच विश्वातील अनेक शोधांचे जनक ठरते. कोणत्याही संशोधनामागे कुतूहलाचाच मूलाधार असतो. या कुतूहलातून निर्माण झालेली जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी अनेकांनी आयुष्यभर मेहनत घेतल्याचे दिसते. यामध्ये काही यशाची शिखरे पादाक्रांत करतात, तर काहींचे कुतूहल शेवटपर्यंत कुतूहलच राहाते. पण, काहीही झाले तरी कुतूहल माणसाला स्वस्थ बसू देत नाही, हेच खरे. याच कुतूहलाचे रूपांतर छंदामध्ये करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीराम सोमासे.
अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील कापरेवाडी या गावी श्रीराम यांचा जन्म झाला. जन्मापासून दृष्टिहीनता असल्याने श्रीराम यांचे बालपण तसे सामान्य मुलांपेक्षा थोडे विशेष राहिले. साधारण आयुष्याची पहिली दोन वर्षे आई-वडिलांबरोबर घालवल्यानंतर श्रीराम यांच्या आत्यांनी त्यांना भविष्यातील शिक्षणाच्या दृष्टीने बदलापूरजवळील प्रगती अंध विद्यालय या निवासी शाळेमध्ये प्रवेश घेऊन दिला. साधारणत: तीन वर्षांचे श्रीराम त्या शाळेमध्ये आता शिक्षणाचे धडे बालवाडीमध्ये गिरवू लागले होते. काळाच्या ओघात ते शाळेच्या वातावरणात रमले आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलू लागले. ही शाळा दृष्टिबाधितांसाठी असली, तरीही इथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मिळणारे प्राधान्य वादातीत होते. तसेच शाळेच्या प्रांगणातच गांधर्व महाविद्यालयाची शाखा असल्याने संगीताचे संस्कार शाळेतील मुलांवर होणे निसर्गन्यायाने आलेच.
 
सभाधीटपणा आणि कुशाग्र बुद्धिमत्ता या दोन गुणांचे वरदान जन्मतःच श्रीराम यांना लाभलेले. त्यामुळे शाळेमध्ये शिकवलेल्या कविता, ‘भगवद्गीते’चे अध्याय श्रीराम यांचे अर्थासहित पाठ असत. त्यामुळे शाळेला भेट देण्यासाठी कोणी अधिकारी अथवा पाहुणे आल्यास स्वागतासाठी पुढे जाणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये श्रीराम यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाई. याचकाळात श्रीराम यांच्यातील संगीत कलेचे गुण शिक्षकांनी हेरले. पुढे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये इयत्ता चौथीपर्यंत श्रीराम यांनी गायनाच्या चार परीक्षाही दिल्या. याचकाळात श्रीराम यांच्या मनामध्ये वादन कलेविषयी प्रचंड कुतूहल निर्माण होत असे. त्यामुळे ते शाळेमधील विविध वाद्ये मोकळ्या वेळेत सहज वाजवण्याचे प्रयोग करून बघत. असे दिवस जात असताना श्रीराम यांच्या शाळेतील वादन करणारा एक विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडला. त्यामुळे नवीन वादकाचा शोध सुरू झाला. शाळेचे गाण्याचे कार्यक्रम ठिकठिकाणी होत असल्याने त्यांना वादकाची निकड भासू लागली. अशा वेळी पुन्हा शिक्षकांनी ती जबाबदारी श्रीराम यांच्यावर टाकली. गाण्याच्या चार परीक्षा आणि फावल्या वेळेमध्ये मुक्त छंद म्हणून सामान्य मुलाप्रमाणे वाद्य वाजवणे या पलीकडे संगीताचा, त्यातल्या त्यात वादन कलेचा श्रीराम यांच्याशी काहीही संबंध आलेला नव्हता. मात्र, आजवर कुतूहल असलेली वादन कला जवळून अनुभवायला मिळणार, याचे एक अप्रूप त्यांना होते. त्यामुळे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि शाळेतील शिक्षक, काही मित्र आणि ऐकीव निरीक्षणाच्या जोरावर त्यात प्रावीण्य मिळवले.
 
मात्र, हा प्रवास इतका सुलभ झालेला नाही. त्यासाठी अनेक चुकांमधून त्यांना शिकावे लागले. चुका सांगायला कोणी नसल्याने एखादे वाद्य वाजवताना त्यातील निर्माण होणारा नाद ऐकून त्याच्यातील फरकावरून स्वत:मध्ये सुधारणा कराव्या लागल्या. त्यामुळे एखादी चूक सुधारण्यासाठी लागणारा कालखंड हा नेमका किती असे, हेदेखील निश्चित नसे. मात्र, या सगळ्यात श्रीराम यांनी त्यांच्यातील छंद जोपासला. तो जोपासतानाच त्यांनी शिक्षणाचीही आस सोडली नाही. दहावीनंतर मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयातून इतिहास विषयामध्ये पदवीदेखील घेतली, त्याचबरोबर विविध प्रकारची वाद्ये वाजवण्याची कलादेखील महाविद्यालयातील जीवनकाळात आत्मसात केली. आजमितीला तबला, ढोलकी, ढोलक, ढोल, दिमडी अशी जवळपास ३२ प्रकारची वाद्ये ते वाजवतात, तर सात ते आठ वाद्यांचे आवाज तोंडी काढण्याची कलादेखील त्यांनी आत्मसात केली आहे.
या सगळ्या कलेच्या जोरावरच श्रीराम महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘यूथ फेस्टिव्हल’मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झाले. तसेच कुतूहल म्हणून त्यांनी एका एकांकिकेमध्येही काम केले असून, सध्या विविध कार्यक्रमांना साथसंगत करण्याबरोबरच ते एका हिंदी चित्रपटाचे लेखनदेखील करत आहेत. भविष्यामध्ये संगीत-संयोजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या श्रीराम सोमासे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा.
 
- कौस्तुभ वीरकर