
मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू येथील निवासस्थानी १ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिस आणि क्राइम ब्रँच पूर्णपणे सतर्क झाले आहेत. प्राथमिक तपासात हा हल्ला बिश्नोई गँगकडून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेनंतर रोहित शेट्टीच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या घरावर केवळ दोन पोलिस कर्मचारी तैनात होते, मात्र आता अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य शूटरची ओळख पटली असून त्याच्या अटकेसाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत डझनभराहून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
क्राइम ब्रँचच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. गोळीबारासाठी शूटरने अत्याधुनिक देशी बनावटीचे शस्त्र वापरले होते. या शस्त्रातून ७.६२mm कॅलिबरच्या पाच गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिस आता या गोळ्या ७.६२×५१ mm की ७.६२×३९ mm प्रकारातील आहेत, याचा तपास करत आहेत. या दोन्ही प्रकारच्या गोळ्या प्रामुख्याने रायफल आणि मशीनगनमध्ये वापरल्या जातात आणि त्या वेगवान व खोलवर परिणाम करणाऱ्या मानल्या जातात. रोहित शेट्टीच्या घराच्या परिसरात तसेच त्याच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर शूटरने स्कूटीवरून काही अंतर पळ काढला. त्यानंतर त्याने एका ऑटोचालकाला कल्याणला सोडण्याची विनंती केली, मात्र त्या चालकाने नकार दिला. दुसऱ्या एका ऑटोचालकाने त्याला विले पार्ले रेल्वे स्थानकाजवळ सोडले. लोकल ट्रेन सेवा बंद असल्यामुळे शूटरने खासगी वाहनाच्या मदतीने मुंबईबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या दोन्ही ऑटोचालकांचे जबाब नोंदवले आहेत.
दोन आरोपींना मिळाले १० हजार रुपये
क्राइम ब्रांचच्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईत स्कूटी डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या सिद्धार्थ येनपुरे आणि स्वप्नील सकट या दोघांना एकूण १० हजार रुपये देण्यात आले होते. हे पैसे कथित मास्टरमाइंड शुभम लोनकर याने समर्थ पोमाजी याच्यामार्फत दिले. स्कूटी डिलिव्हरीनंतर पुण्याला परतल्यावर ही रक्कम दोघांना देण्यात आली. आता पोलिस तपास करत आहेत की संपूर्ण हल्ल्यासाठी बिश्नोई गँगने एकूण किती रक्कम खर्च केली. यासाठी आरोपींच्या बँक व्यवहारांची छाननी सुरू आहे.
या प्रकरणात पोलिसांनी रोहित शेट्टीचीही चौकशी केली. त्याला कोणत्याही गँगकडून किंवा व्यक्तीकडून धमकी मिळाली होती का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने स्पष्टपणे सांगितले की, त्याला कोणतीही धमकी मिळालेली नाही ना फोन कॉल, ना मेसेज, ना व्हॉइस नोट, ना ई-मेलद्वारे. तपासात असेही संकेत मिळाले आहेत की, गोळीबाराच्या वेळी शूटरसोबत बिश्नोई गँगचे आणखी काही सदस्य उपस्थित होते. त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आदित्य ज्ञानेश्वर गायकी (वय १९ वर्षे), सिद्धार्थ दीपक येनपुरे (वय २० वर्षे), समर्थ शिवशरण पोमाजी (वय १८ वर्षे), स्वप्नील बंडू सकट (वय २३ वर्षे) पोलिस आता मुख्य शूटरच्या अटकेसाठी जोरदार प्रयत्न करत असून, लवकरच या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.