ब्रिटिश दांपत्याकडून पॅलेस्टाईनचे पोस्टर; प्रशासनाकडून तात्काळ भारत सोडण्याचे आदेश

04 Feb 2026 21:43:18

मुंबई :
राजस्थानमधील हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र पुष्कर येथे परदेशी पर्यटकांना एक चूक चांगलीच महागात पडली आहे. सार्वजनिक ठिकाणी इस्रायलविरोधी आणि पॅलेस्टाईन समर्थक पोस्टर लावल्याप्रकरणी प्रशासनाने दोन ब्रिटिश नागरिकांना तात्काळ भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २१ जानेवारी रोजी घडली. पुष्करच्या गल्ल्यांमध्ये राजकीय संदेश असलेले स्टिकर्स लावले जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, या ब्रिटिश जोडप्याची ओळख पटली. पोलिसांनी तात्काळ हे पोस्टर हटवले आणि इमिग्रेशन नियमांनुसार या दोघांचा व्हिसा रद्द करण्यात आला.

हे दोघे ब्रिटीश नागरिक असून लुईस गॅब्रिएल आणि त्याची मैत्रीण अनुशी एम्मा अशी त्यांची नावे आहेत. ते टुरिस्ट व्हिसावर भारत भ्रमणासाठी आले होते. मात्र भारत प्रवासात राजकीय घटना करून त्यांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केले. गुप्तचर संस्थांच्या अहवालानंतर प्रशासनाने देश सोडण्यास सांगितला.

पुष्कर पोलिसांकडून सांगण्यात आले की, कोणत्याही परदेशी नागरिकाला भारताच्या भूमीवर राजकीय निषेध किंवा निदर्शने करण्याची परवानगी नाही. पुष्करमध्ये इस्रायली पर्यटकांची मोठी संख्या पाहता सुरक्षा यंत्रणा आता अधिक सतर्क झाल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0