पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ अर्थात, ‘बीएलए’ने मोठा हल्ला करत पाकिस्तानी लष्कराला हादरवून सोडले. ‘बीएलए’ने एकाच वेळी १४ शहरांमध्ये हल्ले केले असून, यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या किमान १५ जवानांचा मृत्यू झाला असून, कित्येकजण जखमीदेखील झाले आहेत. या हल्ल्याच्या भीषणतेमुळे अनेक ठिकाणाहून पाकिस्तानी सुरक्षारक्षकांनी पोस्ट सोडून पळदेखील काढला. या हल्ल्याचा सर्वाधिक फटका बलुचिस्तानची राजधानी क्वेटाला बसला असून, शहरातील अनेक भागांवर ‘बीएलए’ने तात्पुरते नियंत्रण मिळवले आहे. स्वयंचलित शस्त्रांनी सज्ज ‘बीएलए’चे लढवय्ये सैनिक शहरात खुलेआम फिरताना दिसत असून, असेच दृश्य नुश्की, मस्तंग, कलात आणि इतर शहरांमध्येही पाहायला मिळाले.
यामध्ये कोणाचे किती सैनिक मारले गेले, यावरून बरेच दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. पाकिस्तानी सुरक्षा दलाचे म्हणणे आहे की, ‘बीएलए’चे ९०हून अधिक अतिरेकी ठार झाले असून, पाकिस्तानच्या १५ जवानांना प्राण गमवावे लागले. तर दुसरीकडे ‘बीएलए’ने पाकिस्तानी सुरक्षा दलांचे ८४ सदस्य ठार झाल्याचा दावा करतानाच, त्यांच्या सैनिकांनी बलुचिस्तानच्या १४ शहरांतील विविध ४८ ठिकाणी हल्ले केल्याचेदेखील ‘बीएलए’ने म्हटले आहे. ‘बीएलए’ने या हल्ल्याला ‘ऑपरेशन हेरोफ फेज २’ असे नाव दिले आहे. ‘हेरोफ’ हा बलुची भाषेतील शब्द असून, त्याचा अर्थ ‘काळे वादळ’ असा होतो. ‘बीएलए’ने पहिल्यांदा ऑगस्ट २०२४ मध्ये या मोहिमेची सुरुवात केली होती. त्यावेळी या मोहिमेंतर्गत बलुचिस्तानच्या १२ जिल्ह्यांमध्ये हल्ले करण्यात आले होते. तज्ज्ञांच्या मते, या मोहिमेची वेळदेखील विशेष आहे. शेजारील इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि अस्थिरतेकडे जगाचे लक्ष असताना ‘बीएलए’नेदेखील ही संधी साधल्याचे म्हटले जात आहे. सध्या इराणकडे आधीच आंतरराष्ट्रीय लक्ष केंद्रित झालेले असताना या हिंसाचाराचा उद्देश इराणलगत असलेल्या बलुचिस्तानकडे जगाचे लक्ष वेधण्याचा असू शकतो. महरंग बलोच यांच्या अटकेनंतर युवकांमध्ये संताप वाढला असून, आता शांततामय संघर्ष हा पर्याय नसल्याची भावना त्यांच्यात बळावत आहे. अलीकडे सशस्त्र गटांमध्ये महिलांची संख्याही वाढते आहे. ‘ऑपरेशन हेरोफ’मध्येही ‘बीएलए’च्या दोन महिला सैनिक सहभागी झाल्या होत्या. संघटनेने प्रथमच आपल्या निवेदनात या महिलांची नावेदेखील जाहीर केली आहेत.
यापैकी पहिली महिला २३ वर्षीय आसिफा मेंगल असून, ती ‘बीएलए’च्या ‘मजीद ब्रिगेड’शी संबंधित होती. आसिफाने पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या मुख्यालयावर घातक हल्ला केल्याचाही दावा करण्यात आला आहे. आसिफाने या कारवाईमध्ये स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा वापर केला होता. या ऑपरेशनदरम्यान, तिने सुरक्षा दलांच्या तळांना लक्ष्य केले आणि मोहीम पूर्ण करतानाच तिचा मृत्यू झाला. ‘मजीद ब्रिगेड’ ही ‘बीएलए’ची सर्वाधिक धोकादायक व आत्मघाती हल्ल्यांसाठी ओळखली जाणारी युनिट असून, या युनिटने यापूर्वीही अनेक मोठ्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. दुसर्या महिला लढवय्याचे नाव हवा बलोच असून, तिला ‘द्रोशम’ या नावानेही ओळखले जात होते. ती संघटनेच्या सशस्त्र लढाऊ युनिटचा भाग होती. या मिशनमध्ये तिने आघाडीवर राहून पाकिस्तानी जवानांविरोधात कारवाई केली. मात्र, चकमकीदरम्यान हवा बलोचचादेखील मृत्यू झाला. मोहिमेदरम्यानचा हवा बलोचचा शस्त्रांसहितचा एक व्हिडिओही ‘बीएलए’ने प्रसिद्ध केला आहे.
एकंदरीतच, बलुचिस्तानमधील हा संघर्ष केवळ लष्करी कारवाईपुरता मर्यादित न राहता आता सामाजिक, राजकीय आणि मानवी पैलूंनाही स्पर्श करताना दिसतो. ‘बीएलए’ने केलेले दावे, त्यातील महिला लढवय्यांचा सहभाग आणि त्याभोवती निर्माण झालेल्या कथानकामुळे पाकिस्तानसमोरील अंतर्गत सुरक्षेचे आव्हान अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. मात्र, या सर्व घटनांचा दीर्घकालीन परिणाम बलुचिस्तानच्या परिस्थितीवर आणि पाकिस्तानच्या अंतर्गत स्थैर्यावर काय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्यातरी ‘ऑपरेशन हेरोफ फेज २’मुळे पाकिस्तानी लष्कराच्या मर्यादा आणि बलुचिस्तानचा प्रश्न पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.