मुंबई : रणवीर सिंगचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘धुरंधर’च्या दुसऱ्या भागाचा धमाकेदार टीझर मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्मात्यांनी प्रदर्शित केला आणि क्षणार्धातच सोशल मीडियावर चित्रपटाची चर्चा रंगू लागली. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चाहत्यांना या दुसऱ्या भागाची आतुरता लागलेली असतानाच एकीकडे उत्साह, तर दुसरीकडे वाद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘धुरंधर २’च्या लोकेशन मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘धुरंधर २’च्या शूटिंगदरम्यान परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यात आल्याप्रकरणी चित्रपटाच्या लोकेशन मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील अतिसंवेदनशील फोर्ट परिसरात आवश्यक परवानगी न घेता ड्रोन वापरण्यात आला. या प्रकरणी १ फेब्रुवारी २०२६ रोजी MRA मार्ग पोलीस ठाण्यात रिंकू राजपाल वाल्मीकी यांच्याविरोधात IPC कलम २२३ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या आदेशांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
संजय दत्तसह संपूर्ण टीम होती शूटिंगमध्ये व्यस्त
रिपोर्ट्सनुसार, १ फेब्रुवारी रोजी संजय दत्तसह संपूर्ण चित्रपट युनिट त्या ठिकाणी शूटिंग करत होती. हा शूटिंग शेड्यूलचा तिसरा दिवस होता. यापूर्वी ३१ जानेवारीला या ऐतिहासिक किल्ल्याची शूटिंगसाठी सजावट करण्यात आली होती. परिसराला पाकिस्तानातील जुन्या व गजबजलेल्या भागासारखे रूप देण्यात आले होते. याच ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात आला, मात्र संबंधित यंत्रणांची अधिकृत परवानगी घेतलेली नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
‘धुरंधर : द रिव्हेंज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
दरम्यान, निर्मात्यांनी ‘धुरंधर : द रिव्हेंज’चा टीझर प्रदर्शित केला असून हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा व दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले असून ज्योती देशपांडे, आदित्य धर आणि लोकेश धर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. स्टारकास्टमध्ये रणवीर सिंग, संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांचा समावेश आहे.
पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः इतिहास रचला होता. ‘धुरंधर’ने भारतात ८३६.९५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला, तर जागतिक स्तरावर १३०३ कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये ओव्हरसीज कलेक्शन २९९ कोटी रुपये, तर भारतामधील ग्रॉस कलेक्शन १००४ कोटी रुपये इतके होते. या यशामुळे ‘धुरंधर २’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखीच वाढल्या असून, वादाच्या सावलीतही हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे.