Ajit Pawar Last Call: अजितदादांचा अखेरचा फोन कॉल, अपघात होण्याच्या ९ मिनिटाआधी काय बोलले?

04 Feb 2026 17:04:36
AJIT PAWAR LAST CALL
 
मुंबई : (Ajit Pawar last call) राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचं मुंबईहून बारामतीकडे जाताना २८ जानेवारी रोजी सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या खासगी विमानात अजितदादांचा प्रवास सुरू होता. लँडिंगच्या अगोदरच हा विमान अपघात झाला, ज्यात अजितदादांसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र अपघात होण्याच्या फक्त ९ मिनिटाआधी अजितदादांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांना केलेला फोन कॉल अखेरचा ठरला.

अजितदादांनी अपघातापूर्वी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांना केलेला हा अखेरचा कॉल रेकॉर्ड समोर आला आहे. अपघाताच्या दिवशी सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी अजितदादांचा हा अखेरचा कॉल कार्यकर्त्याला आला होता. आणि त्यानंतर ०८ वाजून ४६ मिनिटांनी अजितदादांचा अपघात झाला.

अपघआत होण्यापूर्वी अजितदादांचं श्रीजीत पवारांसोबत बोलणं झालं होतं. श्रीजीत पवार यांनी केलेल्या मेसेजला अजितदादांनी कॉल करून उत्तर दिलं होतं, असं अजितदादांशी शेवटचा संवाद साधणारे श्रीजित पवार यांनी सांगितलं. श्रीजित पवार हे अजित पवारांचे नात्याने चुलत पुतणे लागतात. त्यांनी अजितदादांना जिल्हा परिषदेच्या उमेदवार निवडीबाबत मेसेज केला होता. हा मेसेज अजितदादांनी बारामतीला विमान आल्यानंतर जेव्हा लँडिंग होणार होते. तेव्हा फोनला रेंज येताच वाचला. त्यानंतर लगेच अजितदादांनी श्रीजित पवार यांना कॉल केला. याबाबत श्रीजित पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेत म्हटलं की, अजितदादा कायम कामासाठी तत्पर असायचे. सातत्याने काम करण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यानुसार माझा मेसेज पाहिल्यानंतर ८ वाजून ३७ मिनिटांनी कॉल माझ्या नंबरवर आला होता. हा त्यांचा शेवटचा कॉल होता असं त्यांनी सांगितले.
 
अखेरच्या कॉलवर अजितदादांनी सर्व जातीधर्माला मी सोबत घेऊन जातोय आणि आपण सगळे एकत्र राहतोय. सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. तू निवांत राहा असं दादांनी म्हटलं. १ मिनिटांचा हा कॉलवरील संवाद होता असं श्रीजित पवार यांनी सांगितलं. हा कॉल रेकॉर्ड ऐकवण्याचा मुद्दा एवढाच की एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने मेसेज केला तरीही दादा तत्परतेने त्यांना कॉल करत होते. फ्लाईटमध्ये असतानाही जसे त्यांच्या फोनला रेंज मिळाली त्यांनी हा कॉल केला असं श्रीजित पवार म्हणाले.

काय होता तो शेवटचा संवाद?
 
अजितदादांनी सुमारे एक मिनिट श्रीजीत पवार यांच्याशी संवाद साधला. या संवादात अजितदादांच्या आवाजात तीच कामाची ओढ आणि सर्वसमावेशकतेची भावना दिसून आली. मी इतका महत्त्वाचा नव्हतो की अजितदादांनी लँडिंगच्या वेळी मला फोन करावा, पण प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याचा त्यांचा स्वभाव होता. असं श्रीजीत पवार म्हणाले.
 
अखेरच्या कॉलवर अजितदादा नेमकं काय बोलले?
 
अजितदादा - तुम्हाला माहिती नसते, काय नसते.. आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा..
 
श्रीजीत पवार - नाही, दादा मला जे वाटले ते तुमच्याशी बोललो
 
अजितदादा - माहिती आहे, पण तसं नाही, माळी समाजाला मी सुपे गटातून उमेदवारी दिलेली आहे. तिथे ओबीसींचे आरक्षण होते. बाकीच्यांनी दिले नाही. इतर पक्षांनी दुसरेच दिलेत, आपण तसे केले नाही.
 
श्रीजीत पवार - चालेल, दादा तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय घ्या
 
अजितदादा - ठीक आहे, ओके...
अजितदादांनी का केला होता फोन?
 
दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी अजितदादा बारामतीला येत होते. सकाळी मुंबईहून खासगी विमानाने अजितदादा बारामतीला निघाले. मात्र हे विमान बारामतीत लँडिंग होताना त्याचा अपघात झाला. या अपघातात अजितदादांसह ४ जणांचा दुदैवी मृत्यू झाला. पण सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी अजितदादांनी कॉलवर कार्यकर्त्याशी संवाद साधला. त्यानंतर ८ वाजून ४६ मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला.
Powered By Sangraha 9.0