Charter Planes Safety : चार्टर विमान सुरक्षेचा पर्दाफाश! संसद समितीचा धक्कादायक अहवाल समोर

03 Feb 2026 21:53:30

Charter Planes Safety :

Charter Planes Safety : बुधवार, २८ जानेवारी २०२६, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती येथील विद्याप्रतिष्ठान मैदानावर गुरुवारी २९ जानेवारी रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आता या विमान दुर्घटनेतील अनेक घटकांचा गांभीर्यानं विचार होतोय, अपघातामागची कारणं शोधण्यासाठी सखोल तपास सुरुये. एका बाजूला हा अपघात कसा झाला? नेमकं काय घडलं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरुये. तर दुसरीकडे चर्चा आहे VSR Ventures Private Limited या कंपनीची. ही तीच कंपनी आहे. ज्या कंपनीच्या लियरजेट-45 विमानाच्या अपघातात अजित दादांचा मृत्यू झाला. ही कंपनी VSR एव्हिएशनच्या अंतर्गत चार्टर विमानं, हेलिकॉप्टर्स पुरवण्याचं काम करते. त्यामुळे आता या कंपनीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. दरम्यान अजित पवार यांच्या अपघाताच्या काही महिने आधीच खासगी विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या व्यवस्थापनावर केंद्रीय संसदीय समिती कडून एक अहवाल तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये खासगी व चार्टर्ड विमान सेवा आणि वाहतुकीशी सुरक्षेबाबत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या अहवालात नेमकं काय़ म्हटलंय, VSR कंपनी वादाच्या भोवऱ्यात का सापडलीय, याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया.

अजित पवार हे २८ जानेवारीला सकाळी मुंबईहून बारामती येते व्हीएसआर एव्हिएशन या कंपनीच्या बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ या विमानाने येत होते. मात्र बारामती विमानतळावर उतरण्याच्या काही मिनिटांपूर्वी विमान कोसळले ज्यामध्ये विमानातील ५ ही प्रवाशांचा मृत्यू झालाय. महत्त्वाची बाब म्हणजे, ही पहिलीच घटना नव्हती. याआधीही या सिरीजमधील एक विमान अवघ्या दोन वर्षांपूर्वी मुंबई विमानतळावर कोसळले होते, तरीही अशा तांत्रिक त्रुटी असलेल्या विमानांना 'व्हीव्हीआयपी' ड्युटीसाठी परवानगी दिलीच कशी, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय. मिळालेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर २०२३ रोजी याच कंपनीचे लिअरजेट ४५ हे विमान विशाखापट्टनमहून मुंबईला येत होते. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगच्या वेळी ते कोसळले. या अपघातात विमानाचे दोन तुकडे झाले होते, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे त्या अपघाताचा अंतिम चौकशी अहवाल आजपर्यंत सार्वजनिक झाल्याची माहिती नाही. मात्र यावेळी पुन्हा एकदा त्याच विमानाचा अपघात झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांत एकाच कंपनीच्या विमानाचा दोनवेळा अपघात होणं ही आता चिंतेची बाब ठरलीय. २०२३ च्या अपघाताचा धडा घेऊन या विमानाच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यात आले होते का? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागलाय. ( Charter Planes Safety )

व्हीएसआर व्हेचंर्स प्रा. लि. ही नवी दिल्लीस्थित कंपनी आहे. जिची स्थापना २०११ साली झाली होती. विजय कुमार सिंह आणि रोहित सिंह यांच्याकडून कंपनी चालवली जाते. व्यावसायिक प्रवासाची सेवा देण्यासाठी या कंपनीकडून विमान पुरवली जातात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, व्हीएसआर कंपनीला १५ वर्षांहून अधिक काळ विमान चालविण्याचा अनुभव आहे. कंपनीकडे ६० वैमानिक आहेत आणि हवाई प्रवाशांनी ९९ टक्के समाधान व्यक्त केल्याचा कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर दिल्लीतील महिपालपूर येथे कार्यालय असलेल्या या कंपनीचा मालक कॅप्टन रोहित सिंग यांनी फोन बंद केला असून, ऑफिसमधूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संशय अधिकच बळावला आहे.( Charter Planes Safety )

“आमच्या माहितीप्रमाणे सदर विमान हे अत्यंत चांगल्या स्थितीत होते. याप्रकरणी आता डीजीसीएकडून चौकशी करण्यात येत आहे. कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या विमानात ना तुम्ही होता ना मी होतो. विमान कधी उडवायचं, कधी उतरवायचं हे पायलटच्या हातात असतं.” हे विधान होतं, विजय कुमार सिंग उर्फ कॅप्टन व्हीके सिंग यांचं. हे कॅप्टन व्हीके सिंग कोण तर VSR Ventures Private Limited या कंपनीचे मालक. पुढे ते असेही म्हणाले, “पायलटने आधी विमान धावपट्टी 29 वर उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर धावपट्टी 11 वर उतरवण्याचा प्रयत्न केला असे समजते. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. पायलटला रनवे दिसला नाही आणि त्यातून ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.प्रत्यक्षदर्शींकडून जी माहिती मिळाली आहे, त्याआधारे मी हे सांगत आहे,” असंही म्हटलंय.या अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असताना व्ही.के. सिंग यांनी विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचं सांगत जबाबदारी झटकलीय. तसंच या अपघाताचे खापर त्यांनी पायलटवर फोडलंय.( Charter Planes Safety )

आता प्रश्न असा पडतो की, ज्या कंपनीचा सेफ्टी रेकॉर्ड इतका खराब आहे, त्यांना पुन्हा उड्डाणाची परवानगी कुणी दिली? या गंभीर अपघातानंतर विमान कंपनीची भूमिका काय होती? ज्या विमानांच्या सुरक्षेबाबत गंभीर अहवाल आले होते, त्यांना पुन्हा उड्डाणासाठी 'फिटनेस सर्टिफिकेट' कोणी दिले? नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) या ऑपरेटरच्या विमानांची सखोल तपासणी केली होती का? की राजकीय नेत्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या खाजगी विमान कंपन्यांना अभय दिले जात आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.( Charter Planes Safety )

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे पाच महिन्यांपूर्वी संसदीय समितीने एक अहवाल सादर केलाय, ज्यामध्ये याच प्रश्नांवर विचारमंथन केलंय. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जदयूचे खासदार संजय झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल तयार केला होता. देशात खासगी व चार्टर्ड विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात वेगाने विस्तारत आहेत. परंतु, त्या तुलनेत विमान वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र कमी पडत आहे. त्यामुळे नॉन शेड्यूल्ड सेक्टरमधील या कंपन्यांवर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे त्या अहवालात म्हटले होते. शेड्यूल्ड असलेल्या कमर्शियल एअरलाइन्स आखून दिलेल्या नियमांचे काही प्रमाणात पालन करताना दिसतात, तर खासगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून नियमांच्या पूर्ततेबाबत अनियमितता दिसते असे निरीक्षण समितीने नोंदवले होते.( Charter Planes Safety )

 देशात कॉर्पोरेट जेट, खासगी विमान आणि चार्टर्ड विमानांचे प्रमाण वाढत आहे. परंतु, त्या तुलनेत विमान वाहतुकीवर नियंत्रण ठेवणा यंत्रणा मात्र वाढत नाही. त्यामुळे विमान वाहतूक सुरक्षेशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, असे अहवालात म्हटले आहे. देशात खासगी विमान, चार्टर्ड विमान सेवा क्षेत्र विस्तारत आहे. या सेवा सध्या नॉन शेड्यूल्ड - सेक्टरमध्ये येतात. या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून होत असलेल्या मेन्टेनन्स स्टैंडर्ड, ऑपरेशनल कंट्रोल स्ट्रक्चर व कागदपत्रांची पूर्तता या बाबींवर समितीने चिंता व्यक्त केली आहे-काही चार्टर्ड विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची तांत्रिक आणि सुरक्षा टीम कुशल नसल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. अशा कंपन्यांवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अचानक छापा टाकून तपासणी करण्याची तसेच त्यांच्यावर बारीक नजर ठेवण्याची गरज असल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे.( Charter Planes Safety )

उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका चार्टर्ड विमानातून प्रवास करत होते. बारामती विमानतळावर दृश्यमानता कमी होती. त्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, चार्टर्ड विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे एखाद्या ठिकाणी खराब हवामान असल्यास लैंडिंग करावे की नाही, हा निर्णय देणारे ऑपरेशनल कंट्रोल सेंटर्स नसल्याचे समितीला आढळून आले होते. खासगी विमान सेवा मुख्यतः जिथे इतर कमर्शियल विमानाने जाता येत नाही, त्या ठिकाणी जाण्यासाठी राजकारणी व व्यावसायिक वापरतात. या विमान सेवा पुरवणाऱ्या सगळ्याच कंपन्यांना 'सेफटी मॅनेजमेंट सिस्टिम' (SMS) बंधनकारक करावी, अशी मागणी अहवालात करण्यात आलीय. इतर कमर्शियल विमाने 'सेफटी मॅनेजमेंट सिस्टिम'चे पालन करतात कारण कमर्शियल विमानतळांवर ती सुविधा उपलब्ध असते.( Charter Planes Safety )

खासगी विमान कंपन्यांकडून विमानांचे नियोजन तसेच हवामानाचा अंदाज यांचा रेकॉर्ड ठेवला जातोय की नाही हे तपासणे आवश्यक आहे. विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच संभाव्य धोका काय आहे ? धोका असल्यास पर्यायी व्यवस्था काय आहे? दृश्यमानता कमी असेल तर काय केले पाहिजे ? या बाबींचा विचार करून त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे. खासगी विमानसेवा या नॉन शेड्यूल्ड आहेत म्हणून या बाबींकडे सर्रासपणे दुर्लक्ष होऊ नये, असे समितीने अहवालात म्हटले आहे.खरंतर, या बाबी फक्त अपघातापुरती मर्यादित नाही. हा प्रश्न विमान सुरक्षा, जबाबदारी आणि परवानगी प्रक्रियेचा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यावश्यक आहे.( Charter Planes Safety )
Powered By Sangraha 9.0