sea turtle kokan - रत्नागिरीच्या किनाऱ्यांवरील बंधाऱ्यामुळे सागरी कासवांचे हाल
03-Feb-2026
Total Views |
मुंबई (अक्षय मांडवकर) - एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने सागरी कासवाच्या संवर्धनासाठी राज्यपातळीवर समित्या स्थापन करण्याचा आदेश दिलेला असताना, दुसरीकडे राज्यात मात्र, त्याच सागरी कासवांच्या अधिवासाचा ऱ्हास करण्याचे काम सुरू आहे (sea turtle kokan). कोकणातील महत्त्वाच्या सागरी कासवांच्या विणीच्या किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक सागरी कासवे अंडी न घालता समुद्रात परतत आहेत (sea turtle kokan). पतन विभागाकडून हे बंधारे किनाऱ्याच्या मध्यभागी बांधण्यात येत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे (sea turtle kokan). त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सागरी कासवाच्या संवर्धनासाठी घेतलेल्या पुढाकाराला सरकारी विभाग हरताळ फासत असल्याचे दिसत आहे. (sea turtle kokan)
रत्नागिरी जिल्ह्यात किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी काही किनाऱ्यांवर धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. पतन विभागाने दिलेल्या माहितीनंतर महाराष्ट्र शासनाने यासाठी जिल्ह्यात २५ किनाऱ्यांच्या संरक्षणासाठी बंधाऱ्यांच्या कामाला मान्यता दिली होती व त्यासाठी निधीही मंजूर केला होता. त्याअंतर्गत या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, या कामामुळे सागरी कासवांच्या विणीसाठी महत्त्वाचे असणाऱ्या किनाऱ्यांना शथी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. उदा. भाट्ये, नेवरे आणि दापोलीतील आडे सारख्या किनाऱ्यावर बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी मादी कासव अंडी न घालताच परतत असल्याचे निरीक्षण कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी नोंदवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २८ किनाऱ्यांवर सागरी कासवांची वीण होते. त्यापैकी २५ किनाऱ्यांवर हे बंधारे प्रस्तावित आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात ज्याठिकाणी किनारा संपतो त्याठिकाणी हे बंधारे बांधण्यात येत नसून किनाऱ्याच्या मध्यभागी ते बांधण्यात येत आहेत. यामुळे किनारा दोन भागांमध्ये विभागला असून कासव विणीचा बहुतांश भाग हा बंधाऱ्याच्या बांधकामामध्ये बाधित झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे हे बंधारे काही ठिकाणी दगडाचे तर काही ठिकाणी वाळूच्या पिशव्यांचे बांधले जात आहेत. म्हणजेच पिशव्यांमध्ये वाळू भरुन बंधारा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात या पिशव्यांमधील वाळू बाहेर पडून ती किनाऱ्यावर पसरुन किनाऱ्याचा पोत बिघडण्याची शक्यता आहे.
मादी कासवे परतली
नेवरे, भाट्ये आणि आडे या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या सागरी कासवाच्या माद्या अंडी न घालता परतल्याची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे किनाऱ्यावर यंदा प्रथमच कासवाची वीण होत आहेत. त्याठिकाणी ११ घरटी आढळून आली आहेत. मात्र, अशा परिस्थितीत त्याठिकाणी बंधाऱ्याचे काम किनाऱ्याच्या मध्यभागी सुरु झाल्याने अंडी घालण्यासाठी येणाऱ्या मादी कासव परतत आहेत. भाट्ये किनाऱ्यावर देखील अशीच परिस्थिती आहेत. त्याठिकाणी गतवर्षी आठ घरटी सापडली होती. दापोली तालुक्यातील आडे किनाऱ्यावर बंधाऱ्याचे काम सुरू असल्यामुळे अजून एक कासव अंडी घालण्यासाठी आलेले नाही. दरम्यान येत्या काळात वारे, गुहागर, कोळथरे, कर्दे, मुरुड, लाडघर या किनाऱ्यांवर बंधारा बांधण्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे याठिकाणी सागरी कासवांना केंद्रस्थानी ठेवून बंधाऱ्याचे काम होणे अपेक्षित आहे.