शनिवार, दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ८.१० वाजताच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकावर एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. धावती लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन रुळावर पडल्याने २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. चेतना चंद्रशेखर देवरुखकर असे या महिलेचे नाव असून, ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र लोकलमधील प्रचंड गर्दी, धावती गाडी आणि क्षणभराचा अंदाज चुकल्याने चेतनाचा तोल गेला आणि ती थेट रेल्वे रुळावर कोसळली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. हा संपूर्ण थरारक प्रकार बदलापूर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ पाहताना केवळ थरार किंवा भीती वाटत नाही, तर मुंबई उपनगरी रेल्वे व्यवस्थेतील गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर येतात. पण ही महिला नेमकी कोण होती? त्या दिवशी बदलापूर स्थानकावर नेमकं काय घडलं? आणि असे अपघात वारंवार का घडत आहेत? आणि हे अपघात थांबवण्यासाठी काय सुविधा केल्या पाहिजेत सविस्तर जाणून घेऊयात...
चेतना चंद्रशेखर देवरुखकर या बदलापूर पूर्वेतील ज्युवेली गावात असलेल्या जगन्नाथ गॅलेक्सी या सोसायटीत राहत होत्या आणि ठाण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या. रोजप्रमाणे शनिवारी सकाळी त्या कामासाठी बदलापूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सकाळी ८.१० वाजताची सीएसएमटी लोकल पकडण्यासाठी आल्या. मात्र लोकल सुटत असल्याचे लक्षात येताच, उशिर होईल या विचाराने त्यांनी चालती गाडी पकडण्याचा निर्णय घेतला. चेतना महिला डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्या डब्यात आधीच प्रचंड गर्दी होती. प्रवाशांच्या गर्दीतून आत शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांचा तोल गेला आणि त्या थेट रुळावर पडल्या. लोकलच्या वेगामुळे त्यांना जोरदार धक्का बसला आणि या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी चेतनाला चालती गाडी पकडू नका, असे सांगत थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उशिर होईल या विचाराने आणि रोजच्या सवयीमुळे चेतनाने कदाचित तो इशारा दुर्लक्षित केला आणि हा अपघात घडला.
दुर्दैवाने अशी ही एकच घटना नाही. गेल्याच आठवड्यात सायन आणि माटुंगा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान देखील अशीच एक घटना घडली. शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजता सीएसएमटीकडे जाणाऱ्या चालत्या लोकल ट्रेनमधून तीन प्रवासी खाली पडले. या घटनेत तिघेही प्रवासी गंभीर जखमी झाले. सुदैवाने त्यांचा जीव वाचला असून सध्या सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसत आहे. विशेषतः ठाणे-कल्याण आणि त्यापुढील बदलापूर, कर्जत, कसारा या पट्ट्यात लोकसंख्या आणि प्रवासीसंख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र या वाढीच्या तुलनेत रेल्वे सुविधांमध्ये आवश्यक तेवढी वाढ झालेली नाही. परिणामी, लोकल ट्रेनमध्ये अक्षरशः जीवघेणी गर्दी पाहायला मिळते. प्रवाशांना दररोज प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आणि जर हे अपघात थांबवायचे असतील, तर केवळ प्रवाशांना दोष देऊन चालणार नाही. यासाठी लोकलगाड्यांची संख्या वाढवणे, फेऱ्या वाढवणे, १२ डब्यांच्या गाड्यांचे १५ डब्यांमध्ये रूपांतर करणे, तसेच कल्याण-कर्जत आणि कल्याण-कसारा शटल सेवा प्रभावीपणे सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय मेट्रो, मोनोरेल आणि लोकलला पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर भर देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दरम्यान, प्रवाशांनीही चालती गाडी पकडण्याचा मोह टाळणे आणि स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे हेही तितकेच गरजेचे आहे. कारण एक चुकलेला क्षण आयुष्यभरासाठी महागात पडू शकतो.