धारणीय वेगांमधील पुढील मानस आवेग आहे मान - यालाच ‘दंभ’ असे बोलीभाषेत म्हटले जाते. या भावनिक उत्कट इच्छा, ज्यावर नियंत्रण करणे गरजेचे आहे, असे आयुर्वेदशास्त्र सांगते, त्याबद्दल सविस्तर आजच्या लेखातून वाचूया.
मान (स्वाभिमान नव्हे,) म्हणजे आपल्या बाह्य रूपाबद्दल किंवा आपल्या बौद्धिक क्षमतेबद्दल गरजेपेक्षा अधिक मान-घमंड-गर्व वाटणे, यालाच आयुर्वेदात ‘मान’ असे म्हटले आहे. शरीर आणि मन यांत सतत बदल होत असतो, ते जीर्ण होत असते. या नाशवंत शरीराबद्दल किंवा क्षमतेबद्दल वाजवीपेक्षा अधिक अभिमान वाटणे, राखणे हे चुकीचे आहे. मनुष्याने वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक, बौद्घिक इ. प्रगती केल्यावर, त्याला स्वतःबद्दल अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. पण, प्रगती आहे, (स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नव्हे) प्रगती-मग ती शालेय (विद्यालयीन/महाविद्यालयीन) कलाक्षेत्रात किंवा शारीरिक क्षमतेच्या बळावर असो, ही प्रगती वैयक्तिक असते. उदा. एखाद्या विद्यार्थ्याला आधीच्या परीक्षेपेक्षा पुढील परीक्षेत अधिक गुण मिळाले, तर ती प्रगती त्याची वैयक्तिक असते आणि त्याची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांबरोबर करू नये. तसेच रूप-रंग-भाषासमृद्धी-उंची-एकंदरीत व्यक्तिमत्त्व व राहणीमान यातही जर बदल घडवून आणला, तर त्याबद्दल समाधान, आनंद व अभिमान वाटणे चांगलेच आहे. पण, सोशल मीडियावर सतत पोस्ट्स करणे, फॉलोअर्स गोळा करणे, त्यांच्या कमेंट्सवर आपला आनंद ठरविणे (कोणी हिणविले की वाईट वाटणे व चांगले म्हटले की अत्यानंद होणे) किंवा कमेंट्स, लाईक्स मिळाल्याच नाही, तर हताश होणे इ. सगळे ‘मान’ या धारणीय वेगाचेच सद्यो रूप आहे.
दंभ हा शारीरिक रूपाबद्दल असू शकतो (वर्ण, केस, बांधा, आकर्षक व्यक्तिमत्त्व इ.) इतरांची वाहवा मिळविण्यासाठी जीवापाड झटणे किंवा इतरांना मुद्दामून निरीक्षणास आणून देणं आणि असे वारंवार करणे. याला ‘दंभ’ असे म्हणतात. त्याचबरोबर आपल्या क्षमतांबद्दल, गुणांबद्दल कौतुक असणे, अभिमान असणे चांगलेच आहे; पण ती स्तुती डोक्यात जाऊ देऊ नये किंवा वारंवार-वरचेवर सर्वांनीच आपली वाहवा करावी, असे ही वाटू नये. उदा. एखाद्याचे गाणे/पुस्तक जर खूप नावाजले, प्रसिद्ध झाले, तर त्या कलाकाराला/लेखकाला आनंद नक्कीच होणार, व्हावा; पण इतरांनी सतत स्तुतीसुमने उधळावीत, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे किंवा आपले तेवढेच चांगले आणि इतरांचे ‘पानी कम चाय’ असे वाटू लागले, तर याला ‘दंभ’, ‘मान’ असे म्हणतात.
गुणी व्यक्तींची कामगिरी, उपलब्धीदेखील अनेक असू शकतात. पण, ती व्यक्ती आणि तिची प्रसिद्धी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत; हे त्या व्यक्तीने नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. माझा आवाज, माझी कला, माझे यश इ. हे टप्प्याटप्प्याने जसे वाढू शकते, तसे त्याचा र्हासही होऊ शकतो, हे कायम लक्षात ठेवावे. बालपणी, तारुण्यात खूप खुलते; पण जसे वार्धक्य येऊ लागते, तसे शारीरिक गुण कमी होऊ लागतात. शारीरिक रूपाबद्दल दंभ असलेली व्यक्ती वार्धक्य कधीच स्वीकारू शकत नाही. ‘एजिंग ग्रेसफुली’ ही संकल्पनाच त्यांना पटत नाही.
‘मान’ या धारणीय वेगामुळे ती व्यक्ती त्या एका क्षणामध्ये अडकून राहू शकते, ज्यात तिला सर्वांत जास्त यश/प्रगती/मान मिळालेला असतो. अशा वेळेस वैयक्तिक प्रगती खुंटू लागते. ‘मान’ या भावनेमुळे स्वतःचे कायम वर्चस्व टिकावे, स्वामित्व टिकावे, यासाठी क्वचितप्रसंगी हानिकारक धोकादायक पद्धतीनेही प्रयत्न केले जाऊ शकतात ( By hook and cook ) किंवा ती व्यक्ती वैयक्तिकरित्या त्या क्षणातच अडकून राहते. तो परमानंद/यश मिळालेल्या क्षणाचा थोडाही विसर पडून देत नाही. सतत त्याच क्षणांबद्दल विचार, बोलणे छायाचित्र बघणे इ. पण यामुळे ती व्यक्ती खूप आत्मकेंद्री होत जाते. इतरांच्या सुख-दुःखाच्या क्षणात पूर्णपणे सहभागी होऊ शकत नाही किंवा स्वतःचा विकासही पूर्ण साधण्यात क्वचितप्रसंगी अपयशी ठरू शकतात. ‘मान’ या धारणीय आवेगामुळे ती व्यक्ती एकाकी होऊ शकते, चिडचिडी, मूडी, आपल्याच विश्वात हरवलेली अशी होऊ शकते. यावर काही साधे-सोपे उपाय आहेत. आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की, आपले सर्वोच्च ध्येय मोक्षप्राप्ती हे आहे. तेव्हा आहे ते सर्व (चांगले-वाईट, यश-अपयश) हे सर्व ईश्वरचरणी अर्पण करणे महत्त्वाचे आहे. ‘इदं न मम’-जे काही कमाविले (श्रेय, यश, कीर्ती, प्रसिद्धी, धन इ. इ.) ते सर्व माझे नाही आणि याने मिळणारे सुख व समाधान हे क्षणिक आहे, असे जाणावे. यातील ऐहिक सुख हे नाममात्र आहे आणि यापलीकडे पोहोचणे, हे माझे ध्येय आहे, असे जाणणे गरजेचे आहे. आपल्या ‘अपीअरन्सेस, अचिव्हमेन्ट्स, टॅलेंट्स’वर फक्त केंद्रित राहिलो, तर भोवर्यात होडी अडकल्यासारखे आहे. ती होडी बुडणारच. त्यातून बाहेर पडणे, हे गरजेचे आहे.
आपण जेव्हा ‘माझा हात’, ‘माझा चेहरा’ इ. म्हणतो, तेव्हा आपण स्वतःला त्या अवयवापासून भिन्न मानतो, हे दर्शविते. (उदा. ‘माझा हात दुखतो’ असे आपण म्हणतो; ‘मी दुखतो’ असे नाही म्हणत) यात मी-माझे याचे अस्तित्व जाणणे महत्त्वाचे आहे. चिखलात राहूनदेखील कमळ जसे सुंदर खुलते, तसेच शरीर-मन-बुद्धीरूपी दलदलीत आत्मा हा निर्लिप्त राहतो आणि त्याची प्रगती हेच सर्वोच्च ध्येय असणे महत्त्वाचे आहे. जेव्हा व्यक्ती केवळ अन्नमय कोषात अडकून राहते, तेव्हा ती सूक्ष्म रूपाचा विचार करूच शकत नाही. तहान, भूक, झोप, शरीर इ.पर्यंत सीमित राहते. मान या अवगुणामुळे ती व्यक्ती इतरांचा आदर करण्यात सक्षम नसते. आपण मोेठे, आपलेच बरोबर, आपले ते सत्यवचन व वर्तन असे वाटू लागते/लागू शकते. या अवगुणातून बाहेर पडण्यासाठी समत्वभाव अंगीकारणे खूप गरजेचे आहे. मान असेपर्यंत तेथे विनम्रता येऊ शकत नाही. माझे अपयश म्हणजे मी नाही, हे पदोपदी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वकोषातून बाहेर पडण्यासाठी इतरांचा विचार, आदर, ममत्वभाव उत्पन्न करण्यासाठी सेवाभाव अंगीकारणे गरजेचे आहे. ही सेवा शारीरिक, आर्थिक, बौद्धिक इ. स्वरुपाची असू शकते. modesty / humility / humbleness असे भाव जोपासावे लागतात.
मिळाले आहे, त्यात कृतज्ञता मानणे व देवाचरणी अर्पण (हे यश कीर्ती/समृद्धी/माझी एकट्याची नाही. मी केवळ निमित्तमात्र) असा भाव अंगीकारला, तरच विनयशीलता आणि विनम्रता उत्पन्न होऊ शकते. कुठल्याही पाटीवरचे आधीचे लिहिलेले पुसल्याशिवाय त्यावर पुन्हा लिहिता येत नाही. लिहिलेच, तर वाचता येत नाही, बोध होत नाही, आकलन होत नाही. कोर्या, सुंदर पाटीवर लिहिल्यास सुंदर वाचता येते, नवीन काही लिहिता येते. मान या धारणीय वेगाबद्दलही असेच आहे. पूर्वीचे यश/अति मान सोडल्याशिवाय यशाच्या नवीन शिखरापर्यंत पोहोचणे शक्य नाही. तेव्हा कार्य करत राहावे. त्याच्या फळाची अपेक्षा करून कार्य करू नये. असे केल्याने मनाला शांतता मिळते. मन उद्विग्न राहात नाही आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)