Pankaja Munde: मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; उड्डाणापूर्वीच...

03 Feb 2026 12:03:50
 
Pankaja Munde
 
छत्रपती संभाजीनगर : (Pankaja Munde) भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून उड्डाण घेण्यापूर्वीच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यामुळे मोठा संभाव्य धोका टळला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी त्या मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी लातूर आणि सोलापूर दौऱ्यावर जाणार होत्या. मात्र उड्डाणापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे पायलटच्या निदर्शनास आल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. (Pankaja Munde)
 
हेही वाचा :  Navnath Ban: ‘ऑपरेशन लोटस’ आरोपांवर भाजपचा पलटवार; नवनाथ बन यांचे राऊतांना सडेतोड उत्तर, म्हणाले, ‘उद्या न्यायालयाने...’
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडे या सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे रवाना होणार होत्या. मात्र उड्डाणापूर्वी नेहमीप्रमाणे करण्यात येणाऱ्या तपासणीदरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे आढळले. सुरक्षिततेचा विचार करता पायलटने तात्काळ उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला. परिणामी पंकजा मुंडेंना आपला दौरा आणि सभांची वेळ पुढे ढकलावी लागली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचा प्रचार दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आज लातूरनंतर सोलापूर जिल्ह्यातील मंद्रूप आणि कुंभारी येथे सायंकाळी ६ आणि ८ वाजता त्यांच्या सभा नियोजित आहेत. (Pankaja Munde)
 
विशेष म्हणजे, सोमवार, २ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद निवडणूक प्रचारादरम्यान भाषण करताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, “मी जिल्हा परिषद प्रचारासाठी हेलिकॉप्टरने फिरते, त्यामुळे माझी आई देव पाण्यात ठेवते.” आणि नेमक्याच दुसऱ्या दिवशी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा योगायोग चर्चेचा विषय ठरला आहे. (Pankaja Munde)
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यात आधीच अस्वस्थतेचे वातावरण आहे. अशा पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर येताच पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सुदैवाने हा बिघाड वेळेत लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून, पंकजा मुंडे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. (Pankaja Munde)
 
Powered By Sangraha 9.0