अस्वस्थ मनांचा आरसा

03 Feb 2026 13:21:12
Mental Health
 
बदलत्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याकडे वैद्यकीय व संवेदनशील दृष्टिकोनातून पाहणे, आज काळाची गरज बनली आहे. समाजाचे हेच वास्तव एका संस्थेच्या वाढत्या मनोविकाराबाबतच्या अहवालातून समोर आले. त्याच पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या या वाढत्या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचा घेतलेला आढावा...
 
भारतीय समाज आज एका विलक्षण विरोधाभासाच्या टप्प्यावर उभा आहे. एकीकडे आर्थिक प्रगती, तंत्रज्ञानातील क्रांती आणि जागतिक संधी यांचा विस्तार होत असतानाच, मानवी मन मात्र अधिकाधिक अस्वस्थ, असुरक्षित आणि थकलेले दिसते. अलीकडील वैद्यकीय निरीक्षणे आणि मानसिक आरोग्यविषयक अभ्यास यांतून याबाबतचे एक गंभीर वास्तव समोर येते. मानसिक समस्यांवर काम करणार्‍या एका संस्थेच्या ताज्या अहवालानुसार मानसिक आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, त्यातील ६० टक्के रुग्ण हे ३५ वर्षांखालील वयोगटातील आहेत. वैद्यकीय दृष्टिकोनातून ही बाब समाजाच्या अंतर्मनातील बदलांचे द्योतक आहे. मानवी मन हे जैविक, मानसिक आणि सामाजिक घटकांच्या परस्पर संवादातून घडत असते. आजचा समाज या तिन्ही पातळ्यांवर असंतुलन अनुभवत आहे. जैविक पातळीवर झोपेचा अभाव, अनियमित जीवनशैली, सततचा स्क्रीनचा वापर आणि शारीरिक हालचालींचा अभाव मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारा ठरतो. मानसिक पातळीवर अपयशाची भीती, अपेक्षांचे ओझे आणि सतत काहीतरी साध्य करण्याची सक्ती मनावर दडपण आणणारी ठरत आहे, तर सामाजिक पातळीवर नातेसंबंधांमधील दुरावा, खुंटलेला संवाद आणि त्यामुळे वाढणारी एकाकीपणाची भावना अधिकच तीव्र होत आहे.
 
आजचा तरुण केवळ करिअरच्या शोधातच नाही; तो स्वतःच्या अस्तित्वाचाही अर्थ शोधत आहे. मात्र, या शोधप्रक्रियेत त्याला आधार देणारी ‘कुटुंब’ नावाची यंत्रणाच कमकुवत होत चालली आहे. समाजमाध्यमांवर सतत दिसणारे यशस्वी चेहरे, आनंदी आयुष्याची चमकदार चित्रे आणि तुलना करण्याची सवय यांमुळे स्वमूल्याची जाणीवच ढासळते. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास, ती मानवी आयुष्यात चिंता, नैराश्य, व्यसनाधीनता आणि आत्महानीसारख्या गंभीर मानसिक आजारांना खतपाणी घालते. आजमितीला या बदलांचा परिणाम घराघरातही प्रकर्षाने जाणवू लागला आहे. कुटुंबसंस्था, जी पूर्वी भावनिक सुरक्षिततेचा बुरुज होता, तीच आज अनेकदा तणावाचे केंद्र झालेली दिसते. पालक आणि मुलांमधील संवाद कमी होत आहे; भावना व्यक्त करण्याऐवजी त्या दडपल्या जात आहेत. मानसिक आजाराची लक्षणांकडे, जसे की सततचा थकवा, चिडचिड, अलिप्तता, झोपेचे विकार किंवा अचानक झालेले वर्तनबदल यांकडे ‘स्वभावाचा दोष’ म्हणूनही पाहिले जाते. या गृहीत धरण्याचा परिणाम म्हणजे, वैद्यकीय हस्तक्षेप उशिरा होतो आणि आजारातील गुंतागुंत अधिकच वाढते. वेळेवर आजाराची ओळख आणि उपचार झाल्यास, बहुतांश मानसिक आजार आटोक्यात आणता येऊ शकतात, असे मनोविकारतज्ज्ञ सांगत असतानाही त्याकडे पूर्ण दुर्लक्ष होते.
 
या वाढत्या मनोविकाराच्या पार्श्वभूमीवरच यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मानसिक आरोग्याला दिलेले प्राधान्य महत्त्वाचे ठरते. मानसिक आरोग्यसेवा विस्तारण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद, राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थांची उभारणी, जिल्हास्तरावर समुपदेशन व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण ही पावले वैद्यकीय व्यवस्थेला बळकटी देणारी आहेत. मानसिक आजार हे वैयक्तिक अपयश नसून, सार्वजनिक आरोग्याचाच एक भाग असल्याची भूमिका धोरणात्मक पातळीवर स्वीकारली जाणे, ही सकारात्मक बाब ठरते. तथापि, या विकारांच्या निवारणासाठी वैद्यकीय उपचारांसोबतच सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरील संवेदनशीलताही तितकीच आवश्यक आहे. कुटुंबाने ऐकण्याची भूमिका स्वीकारणे, भावनांना मान्यता देणे आणि मदत मागणे म्हणजे, कमजोरी असल्याचा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनात संतुलित दिनचर्या, पुरेशी झोप, शारीरिक हालचाल आणि डिजिटल माध्यमांवरील मर्यादा हे उपाय मानसिक आरोग्याच्या प्रतिबंधात्मक उपचारांचा भाग ठरू शकतात. एकूणच मानसिक आरोग्याचे संकट हे समाजाच्या अंतर्मनातील अस्वस्थतेचे प्रतीक आहे. बदल वेगाने होत असताना, मनाला जुळवून घेण्यास लागणारा अवकाश कमी होत चालला आहे. वैद्यकीयशास्त्र, सार्वजनिक धोरण आणि मानवी नातेसंबंध यांचा समन्वय साधला, तरच या अस्वस्थ मनांना दिलासा मिळू शकेल, अन्यथा प्रगतीच्या झगमगाटात हरवलेले मानवी मन हे आपल्या काळातील सर्वांत मोठे मानवी अपयश ठरेल.
 
 
Powered By Sangraha 9.0