मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कॅनडामधील मिसिसॉगा सेलेब्रेशन स्क्वेअर येथे हिंदू कॅनेडियन नागरिक बांग्लादेशी हिंदूंवरील अत्याचाराविरोधात एकत्र आले होते. उणे २३ अंश सेल्सिअस इतक्या तीव्र थंडीला सामोरे जात त्यांनी बांगलादेशमधील छळ सहन करणाऱ्या धार्मिक अल्पसंख्याकांसाठी आवाज उठवला. यामध्ये हिंदू, ख्रिश्चन, जैन, बौद्ध तसेच इतर समुदायांचा समावेश आहे, ज्यांना आजही हत्या, लैंगिक हिंसा, छळ आणि पद्धतशीर भेदभावाला सामोरे जावे लागत आहे.
हिंदू कॅनेडियन नागरिकांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना आवाहन केले की, या सुरू असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनांविरोधात तत्त्वनिष्ठ आणि लोकशाही मार्गाने ठोस पावले उचलावीत तसेच असुरक्षित अल्पसंख्याक समुदायांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. गेल्या दहा वर्षांत, आणि विशेषतः अलीकडच्या काही महिन्यांत, हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांची, हजारो घरांची तोडफोड किंवा जाळपोळ झाल्याची तसेच हिंदूंच्या हत्यांच्या अनेक घटनांची एक अत्यंत चिंताजनक मालिका समोर आली आहे. या अमानुष अत्याचारांकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर गांभीर्याने लक्ष देणे आणि दोषींना जबाबदार धरणे अत्यावश्यक आहे.