‘ग्लोबल’ गोदा आरती

03 Feb 2026 12:19:34
godavari aarti
 
एखादा सण असो किंवा उत्सव, त्यामध्ये सर्व समाज एकवटला जातो तेव्हा निश्चितच त्याला जागतिक दर्जाचे स्वरूप प्राप्त होते. समाजाच्या एकत्र येण्याने अशा उत्सवांना एकप्रकारे त्याला शाश्वत स्वरूपच प्राप्त होत असते. याचा अनुभव नाशिककर ‘याची देही याची डोळा’ दररोज घेत आहेत. मागील काही वर्षांपासून गोदातीरावर ‘गोदा आरती‘चे आयोजन करण्यात येते आहे. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली असून, त्यामध्ये विशिष्ट समाजाचाच समावेश न करता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंच-परिवर्तनातील महत्त्वाचा घटक असलेल्या ‘समरसता’ या मूल्याला डोळ्यासमोर ठेवत, सर्वधर्मीय प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून दररोज होणार्‍या गोदावरीची आरतीविषयी सर्वसामान्य नाशिककरांना जिव्हाळा वाटेल. या समितीमधील प्रत्येक प्रतिनिधी गोदा आरतीला जागतिक स्वरूप कसे प्राप्त होईल, या विचारानेच भारावलेला दिसतो.
 
त्यामुळे अल्पावधीतच दररोज होणार्‍या गोदामाईच्या सेवेला, जागतिक मान्यता मिळत असल्याचे होणार्‍या गर्दीवरून दिसून येते.
अगदी दोनच दिवसांपूर्वी नारीशक्तीचा जागर करताना, एक हजार, १११ महिलांच्या माध्यमातून गोदा आरती करण्याचे शिवधनुष्य ‘गोदावरी तीर्थ सेवा समिती’ने उचललले होते. त्याला माता-भगिनींनी इतका भरभरून प्रतिसाद दिला की, प्रत्यक्षात एक हजार, ४०० जणींनी त्यामध्ये सहभाग घेतला. यावरून प्रत्येकाला ही गोदा आरती आपलीशी वाटू लागल्याचे स्पष्ट होते. हे कमीच की काय म्हणून, गोदा आरती कशी करायची, याचे मूळची नाशिकच्या असलेल्या; पण सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या एका महिलेने नाशिकमध्ये येत प्रशिक्षणही घेतले. यासोबतच ‘गोदावरी तीर्थ समिती’च्या प्रतिनिधींना आरती कशी करावी हे शिकवण्यासाठी, देशभरातून आमंत्रणे येत आहे. नाशिकमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक गोदा आरतीमध्ये सामील झाल्याशिवाय, माघारी फिरत नाही. त्यामुळेच दररोज अनेक विदेशी पर्यटक या आरतीमध्ये भक्तीभावाने सहभागी झाल्याचे दिसून येते. आगामी काळात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने, देश-विदेशातून येणार्‍या भाविक आणि पर्यटकांमुळे जगाच्या कानाकोेपर्‍यात गोदामाईची होणारी ही सेवा पोहोचणार आहे. त्यामुळे येत्या काळात या आरतीला ती खर्‍या अर्थाने ‘ग्लोबल’स्वरुप मिळेल, हे निश्चित.
 
नाशिकचा सिंहस्थ विकास
 
एकीकडे नाशिकच्या गोदा आरतीचा नावलौकिक जगभर होत असताना, दुसरीकडे नाशिकचाही चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत संपूर्ण नाशिक नगरी देश-विदेशातील पर्यटकांच्या स्वागतासाठी नटलेली असेल, हे सध्या शहरात वायुवेगाने सुरू असलेल्या विकासकामांवरून दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘रामकाल पथ’ उभारणीला चांगलाच वेग आला असून, निर्माणादरम्यान येणारे सर्वप्रकारचे अडथळे शासन आणि प्रशासनाच्या समन्वयाने दूर केले जात आहेत. सिंहस्थ काळात हा प्रकल्प नाशिकच्या वैभवात नक्कीच भर घालणार यात तिळमात्र शंका नाही.
 
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी, पाच हजार, ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ केला. तर सिंहस्थासाठी मोठ्या प्रमाणावर केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, नाशिकच्या विकासातही त्यामुळे भर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे, विरोधकांकडून सातत्याने सुरू असणार्‍या अपप्रचारालाही एकप्रकारची चपराक बसली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे यंदा सहा महिने पाऊस पडल्याने, शहरातील सर्वच रस्ते चांगलेच खराब झाले होते. त्यामुळे शहराचा विकास थांबल्याचा आरोप सातत्याने सुरू होता. महापालिका निवडणुकीत तर भारतीय जनता पक्षावर आरोप करण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही. पण, विरोधकांच्या टीकेला भाजपच्या वतीने सुरू केलेल्या विकासकामांतूनच उत्तर दिले गेले आहे. आता शहरातील वाहतुककोंडीची समस्या सोडविण्यासाठी रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले असून, त्यामुळे संपूर्ण शहराची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदतच होणार आहे. यामुळे वाहतूक व्यवस्थेवरील ताण हलका करण्यासाठीही हवाई वाहतुकीची नवीन धावपट्टीचाही विकास केला जात आहे. जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्प आणण्यासाठी ‘निमा’, ‘आयमा’, ‘लघुउद्योग भारती’ या संस्था सातत्याने प्रयत्नारत असून, या एकत्रित प्रयत्नांमुळे नाशिक खर्‍या अर्थाने विकासाच्या मार्गावर अग्रेसर झाले आहे.
 
- विराम गांगुर्डे  
 
 
 
Powered By Sangraha 9.0