मुंबई (विशेष प्रतिनिधी) - खानदेशामधून प्रथमच खुरपी बदकाची नोंद करण्यात आली आहे (falcated duck). महाराष्ट्रात स्थलांतरी असणाऱ्या या दुर्मीळ जातीच्या बदकाच्या राज्यातून तुरळक नोंदी आहेत (falcated duck). अशा परिस्थितीत जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणामध्ये या पक्ष्याचे दर्शन घडले आहे. (falcated duck)
हिवाळा संपून राज्यात सध्या थंडीचा जोर पूर्णपणे ओसरला आहे. हवामानात बऱ्याच अंशी बदल झालेला आहे. परंतु राज्यातील विविध पाणथळींवर हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांची खूप चांगल्या संख्येने रेलचेल आढळून येत आहे. जळगाव जिल्हा देखील त्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील हतनूर, वाघूर अशा वेगवेगळ्या पाणथळींवर अजूनही हिवाळी स्थलांतरी पक्ष्यांनी थांबा घेतलेला आहे. अशातच जळगावचे पक्षीमित्र राहुल, प्रसाद आणि ध्रुव सोनवणे यांनी वाघूर धरण जलाशयावर खुरपी बदकाची नोंद केली आहे. खानदेशातील या बदकाची ही पहिली नोंद ठरली आहे. बदकाची ही जात प्रामुख्याने उत्तर भारतात स्थलांतर करते. त्यामुळे महाराष्ट्रात या बदकाच्या फार दुर्मीळच नोंदी आहेत. राज्यातून वर्धा (२०१७) आणि गोंदिया (२०२४) याठिकाणी हे बदक दिसल्याची नोंद आहे.
खुरपी बदक हे पूर्व आशियातील एक डॅबलिंग बदक आहे. यामधील नर बदकाचे डोके हिरव्या आणि कांस्य रंगाच्या चमकदार छटांनी आकर्षक दिसते. शरीर चांदीसारख्या रंगाचे असते आणि पाठीवर असलेली शेपटीकडील वाकडी (कोयत्यासारखी) पिसे याला त्याचे खुरपी बदक हे नाव मिळण्याचे कारण आहे. हे बदक सायबेरिया, मंगोलिया आणि जपान येथे प्रजनन करतात, तर हिवाळ्यात आग्नेय आशिया व भारतात स्थलांतर करतात. ती प्रामुख्याने गोड्या पाण्याची सरोवरे, तलावांमध्ये आणि दलदलीच्या भागात आढळतात. आययूसीएनच्या लाल यादीत या बदकांचा समावेश संकटसमीप श्रेणीत करण्यात आला आहे.