‘जय श्रीराम’च्या घोषणांमुळे साधू-संतांवर हल्ला; टीएमसी समर्थकांवर आरोप, एक अटकेत!

    03-Feb-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारच्या काळात असहिष्णुतेचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान साधू-संतांवर हल्ला करण्यात पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात घडली आहे. ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे साधू-संतांवर हा हल्ला झाल्याचा आरोप आहे. मारहाणीचा आरोप तृणमूल काँग्रेस च्या कार्यकर्त्यांवर करण्यात आला असून, या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे.

अशी माहिती आहे की, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील भगवानपूर ब्लॉकमधील गुडग्राम परिसरात संघाने शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्वामी सूर्यानंद यांच्यासह काही साधू-संत उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असताना ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या जात होत्या. त्यावेळी काही धर्मांध लोक तेथे आले आणि साधूंना अशा घोषणा का देता, असा सवाल केला. त्यानंतर साधूंना दिलेले उत्तर खटकल्याने धर्मांध लोकांनी साधूंना शिवीगाळ केली, मारहाण केली आणि त्यांच्या कपड्यांनाही फाडले. स्वामी सूर्यानंद यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना चंडीपूर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

भाजपचा दावा आहे की हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी केला. केवळ ‘जय श्रीराम’ म्हटल्यामुळे साधू-संतांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आणि मारहाण करण्यात आली, असा आरोप आहे. भाजप नेते शंकुदेव पांडा यांच्यासह अनेकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करत बंगालमध्ये हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावत, हा भाजपमधील अंतर्गत वादाचा परिणाम असू शकतो, असे म्हटले आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले की मुख्य आरोपी जगन्नाथ मैती आणि त्याच्या काही साथीदारांवर हल्ल्याचा आरोप आहे. पोलिसांनी जगन्नाथ मैती याला अटक केली आहे. उर्वरित आरोपी कोण होते आणि संपूर्ण घटना नेमकी कशी घडली, याचा तपास सुरू आहे. ही घटना बंगालमधील धार्मिक आणि राजकीय वातावरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेत आणखी एक कडी ठरली आहे. साधू-संतांवरील हल्ल्याच्या बातमीमुळे जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून, तपासाच्या निष्कर्षांची प्रतीक्षा केली जात आहे.

व्होट-बँक राजकारणाच्या नावाखाली हल्लेखोरांचे संरक्षण
'जय श्री राम' या पवित्र घोषणेचा जयघोष करणे; ही एक अशी घोषणा आहे जी प्रत्येक स्वाभिमानी हिंदूच्या आत्म्यात घुमते. टीएमसी-समर्थित गुंड आणि 'जिहादींचे साधू संतांवर जंगली जनावरांप्रमाणे तुटून पडणे ही केवळ अराजकता नाही, तर हिंदू अभिमान व्यक्त करण्याचे धाडस करणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध राज्य-प्रायोजित दहशतवाद आहे. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत, पश्चिम बंगाल हे हिंदूविरोधी शक्तींचे शिकारस्थान बनले आहे. दिवसेंदिवस सनातन्यांना लक्ष्य केले जात आहे, मंदिरांची तोडफोड केली जात आहे, संतांवर हल्ले होत आहेत आणि हिंदूंना अपमानित केले जात आहे, कारण राज्य सरकार तुष्टीकरण आणि व्होट-बँक राजकारणाच्या नावाखाली हल्लेखोरांचे संरक्षण करते. हा केवळ एका संतावरील हल्ला नाही, तर तो आपल्या श्रद्धेवर, आपल्या ओळखीवर आणि आपल्या अस्तित्वावर केलेला हल्ला आहे.

- सुवेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, आमदार, भाजप पश्चिम बंगाल

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक