राष्ट्रीय अखंडतेशी खेळणार्‍यांना माफी नाही...

03 Feb 2026 11:00:19
Amit Shah
 
देशाच्या ईशान्य भागाला भारतापासून वेगळे करण्याचे मनसुबे देशाचे अंतर्गत आणि बाह्य शत्रू अनेक वर्षे आखत आहेत. मात्र, त्यात त्यांना आजवर यश आले नाही. मात्र, हेच करण्याची योजना आता उघड उघड बोलणार्‍यांच्या रक्षणासाठी ‘इंडी’ आघाडीची फौज मैदानात उतरलेली दिसते. विरोधकांच्या या वृत्तीवरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आघात केला आहे.
 
ईशान्य भारतास भू-मार्गाद्वारे उर्वरित भारतास जोडणारा भाग म्हणजे सिलिगुडी मार्गिका. या सिलिगुडी मार्गिकेस ‘चिकन नेक’ या नावानेही ओळखले जाते. प. बंगालच्या वायव्य भागात असलेली सिलिगुडी मार्गिका, सामरिकदृष्ट्या विचार करता भारतासाठी अत्यंत महत्त्वाची. तसेच हा पट्टा अवघ्या २०-२२ किलोमीटर रुंदीचा असून, त्या मार्गाद्वारे ईशान्य भारतातील राज्यांशी संपर्क साधला जातो. ईशान्य भारतातील राज्यांशी रस्त्याद्वारे संपर्क साधणारा हा एकमेव मार्ग असल्याने, त्यामुळे हा सर्व भूभाग भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असाच. या मार्गिकेला लागून बांगलादेश आणि नेपाळची हद्द आहे, तसेच भूतानही फारसा दूर नाही. भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा या ‘चिकन नेक’वर अनेकांचा डोळा आहे. ‘चिकन नेक’चा ताबा कोणी घेतल्यास, ईशान्य भारतापासून हा भाग तोडणे सहजशक्य आहे. या भूभागाचे महत्त्व लक्षात घेऊनच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘चिकन नेक’ हा भूभाग केवळ आणि केवळ भारताचाच असून, देशाच्या प्रादेशिक एकात्मतेस आव्हान देण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले जातील, असा इशारा दिला आहे. आसाममधील बागडोग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. हा भूभाग तोडण्याचा प्रयत्न करणार्‍यांना विरोधी ‘इंडी’ आघाडी पाठिंबा देत असल्याचा आरोपही गृहमंत्र्यांनी यावेळी केला.
 
सिलिगुडी मार्गिकेच्या जवळच असलेल्या बागडोग्रा येथील सभेत बोलताना, दिल्लीमध्ये बसलेल्या काहींनी ‘चिकन नेक’ मार्गिकेचे विभाजन करण्यात यावे अशा घोषणा दिल्या आहेत, याकडे लक्ष वेधून गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "याचे तुम्ही विभाजन कसे काय करणार? ही काय तुमच्या बापाची जमीन आहे? हा भारताचा भूभाग आहे. त्यास कोणीही हात लावू शकत नाही. अशा घोषणा देणार्‍यांना तुरुंगात टाकले आहे. पण, ‘इंडी’ आघाडीचे नेते त्यांची सुटका करण्याच्या प्रयत्नात आहेत,” याकडे गृहमंत्री शाह यांनी लक्ष वेधले. या आरोपींना जामीन मिळावा, यासाठी विरोधी खासदार सर्वोच्च न्यायालयातही गेले होते, याकडेही अमित शाह यांनी लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मिळविण्यासाठी केलेल्या याचिका फेटाळून लावल्याने अखेर सत्याचाच विजय झाला, असेही ते म्हणाले. ‘चिकन नेक’ हा सार्वभौम भारताचा अविभाज्य भाग असताना त्याचे विभाजन करण्यात यावे, असा विचार याच देशात राहणार्‍या काही नतद्रष्ट लोकांच्या मनात येतोच कसा? तसेच अशी मागणी करणार्‍यांचे समर्थन विरोधी नेत्यांतील काही नेते करतात, याला काय म्हणावे? गृहमंत्री अमित शाह यांनी अशा लोकांना ठणकावले हे योग्यच झाले; पण सदैव तिरकस विचार करणार्‍या नेत्यांचे डोळे यामुळे उघडतील का? हाच खरा प्रश्न आहे!
 
अहिंदूंच्या मंदिर प्रवेशबंदीस ‘विहिंप’चा पाठिंबा
 
उत्तराखंड राज्यातील ‘चारधाम मंदिर समिती’ने तेथील मंदिरांमध्ये अहिंदू व्यक्तींच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे, त्याचे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी स्वागत केले आहे. या प्रस्तावास आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदूंची पवित्र स्थाने ही काही पर्यटन स्थळे नाहीत. अशा पवित्र स्थानाचे योग्य ते पावित्र्य राखले गेलेच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. चारधाम समितीने अहिंदू व्यक्तींना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालावी, असा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. असे स्थान म्हणजे काही ‘मंदिर पर्यटन’ नाही, ते पवित्र तीर्थक्षेत्र आहे असे चारधाम समितीने म्हटल्याकडे आलोक कुमार यांनी लक्ष वेधले.
 
अहिंदू समाजास मंदिर प्रवेशास बंदी घालणे घटनेला धरून आहे का? असा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला असता, यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने १९७२ आणि २०२४ साली दिलेल्या निकालाचा हवाला दिला जात आहे. अहिंदू व्यक्तींना मंदिर प्रवेश करण्यास प्रतिबंध करणारा निर्णय योग्य आणि घटनेशी सुसंगत असल्याचा निर्णय, मद्रास उच्च न्यायालयाने दिला होता. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सहसचिव डॉ. सुरेंद्र जैन यांनी यासंदर्भात सांगितले की, केवळ चारधाम मंदिराच्या ठिकाणीच नव्हे, तर भारतातील हिंदूंच्या सर्व पवित्र स्थानी अहिंदू समाजास प्रवेश करण्यावर बंदी घातली पाहिजे. चारधाम मंदिर समितीने जो प्रस्ताव पाठविला आहे, त्यास ‘जमात उलेमा हिंद’चे अध्यक्ष अर्शद मदानी यांनी विरोध केला आहे. "काहींना हा देश केवळ आपलाच आहे असे वाटते,” अशी टीकाही मदानी यांनी यासंदर्भात केली होती. त्यावर भाष्य करताना डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले की, "मदानी यांचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. मक्केमध्ये मुस्लिमेतरांना प्रवेश देण्यात यावा आणि त्याठिकाणी ‘हनुमान चालीसा’चे पठण करण्यास हिंदूंना अनुमती देण्यात यावी, यासाठी मदानी पुढे येतील का?” असा प्रश्नही जैन यांनी मदानी यांना केला. सौदी अरेबियात मक्का आणि मदिना या शहरांमध्ये मुस्लिमेतर नागरिकांना प्रवेश करण्यास कायद्याद्वारे बंदी आहे. त्यामुळे अर्शद मदानी जी बडबड करीत आहेत, त्यास काही अर्थ नाही. हिंदू मंदिरांच्या संदर्भात जी मागणी करण्यात आली आहे, त्यामध्ये मदानी यांच्यासारख्या नेत्याने नाक खुपसण्याची काहीच आवश्यकता नाही.
 
तामिळनाडूत अतिप्राचीन भाला सापडला
 
भारतीय संस्कृती अत्यंत प्राचीन असल्याचे पुरावे देशात विविध ठिकाणी सापडत आहेत. त्या पुराव्यांच्या आधारे भारताने विविध क्षेत्रांमध्ये जी प्रगती केली, त्याची प्रचिती वर्तमानकाळातील अभ्यासकांना येत आहे. तामिळनाडूमधील तिरुमलापुरम येथे पुरातत्व अभ्यासकांना आठ फूट लांबीचा एक भाला सापडला. या भाल्याचा अभ्यास करता, तो साधारणपणे ख्रिस्तपूर्व ३३४५ मधील असल्याचे अभ्यासकांच्या लक्षात आले. हा लोखंडी भाला पाहता आपल्या पूर्वजांनी धातुशास्त्रामध्ये किती मोठी प्रगती केली होती, त्याचीच कल्पना येते. तामिळनाडूमधील तिरुमलापुरमपासून साधारण ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या तेनकासी येथे हा भाला सापडला असून, त्याच परिसरात कमी लांबीचा आणखी एक भाला देखील अभ्यासकांना सापडला. ज्या ठिकाणी हे दोन भाले सापडले, त्याच्या जवळच एक कलश आणि काही सोन्याचे दागिनेही आढळून आले. शत्रूशी लढण्यासाठी प्राचीन योध्यांकडून अशा शस्त्रांचा वापर केला जात असावा किंवा पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी किंवा समारंभानिमित्त त्यांचा वापर केला जात असावा. भगवान मुरुगन यांच्या हातातील अस्त्रासारखा या भाल्याचा आकार असल्याचे दिसून आले. भगवान मुरुगन यास स्कंद, कार्तिकेय, सुब्रमण्य, स्वामिनाथन, दंडपाणी आदी नावांनी ओळखले जाते. या लोखंडी भाल्याचा अभ्यास करता, धातुशास्त्रामध्ये किंवा शस्त्रे निर्माण करण्यामध्ये तत्कालीन व्यक्तींनी किती मोठी प्रगती केली होती त्याचीच कल्पना येते; असे अभ्यासकांचे मत आहे.
 
तामिळनाडूमधील हवा आणि तेथील जमीनही कोरडी असल्याने, हे लोखंडी शस्त्र चांगल्या स्थितीत राहिल्याचे अभ्यासकांचे मत आहे. तसेच अशी शस्त्रे निर्माण करण्यासाठी तत्कालीन लोकांनी किती उच्च प्रतीचे तंत्रज्ञान हस्तगत केले होते, त्याचीही कल्पना यानिमित्ताने येते. आता तामिळनाडू राज्याच्या पुरातत्व विभागाने यासंदर्भात अधिक अभ्यास करण्यासाठी, गांधीनगर येथील ‘आयआयआयटी’च्या धातुशास्त्र विभागाशी संपर्क साधला आहे. तामिळनाडूमध्ये सापडलेला हा भाला पाहता, भारतीयांनी किती प्रगती केली होती त्याचीही कल्पना येते. राजधानी नवी दिल्लीमधील कुतुब मिनार परिसरात असाच एक पोलादी स्तंभ कित्येक शतकांपासून काहीही झीज न होता उभा आहे. तो स्तंभ धातुशास्त्रातील चमत्कार मानला जातो. आता दक्षिण भारतातही सापडलेला प्राचीन भाला लक्षात घेता, या क्षेत्रात देशाच्या विविध भागांनी खूप प्रगती केली होती, हे स्पष्ट होते.
 
- दत्ता पंचवाघ  
 
 
Powered By Sangraha 9.0