शाहू, फुले, आंबेडकरांच्या आदर्शांचा मार्ग दाखवून सरोजिनी देवरे यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पावलावर शिक्षण, समाजसेवा आणि साहित्यप्रेमाची प्रेरणा जपली आहे. त्यांचा हा कार्यपरिचय...
सरोजिनी यांचा बालपणाचा प्रसंग हा त्यांच्या शिक्षणक्षेत्र, साहित्यप्रेम आणि समाजसेवी चळवळीतील दृष्टिकोनाचा मूळ ठरतो. त्यांच्या मातोश्री कै. सुमनबाई अर्जुन माळी या नाशिक जिल्ह्यातील खेड्यात वसलेल्या शिक्षिका आणि समाजसेविका होत्या. त्या आपल्या संपर्कातील प्रत्येक गरीब, गरजू मुलाला शाळेत येण्यास प्रोत्साहन देत; जेवण, कपडे आणि शिक्षणासाठी मदत करत असत. त्या दृश्यामुळे लहानपणापासून सरोजिनी देवरे यांनी मनाने ठरवून ठेवले की, शिक्षण हे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्यांकरिता संधी देण्याचे माध्यम असावे.
सरोजिनी देवरे या गेल्या २८ वर्षांपासून विविध भाषिक पार्श्वभूमीतील मुलांना मराठी शिकवून त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहेत. घाटकोपर (पू) येथील असल्फा परिसरातील ‘श्री साईनाथ शिक्षण संस्थे’च्या प्राथमिक विद्यालयात सरोजिनी देवरे या साहाय्यक शिक्षिका आहेत. बहुभाषिक पार्श्वभूमीमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद हा पहिला त्यांच्यासमोर आव्हान ठरतो. सरोजिनी देवरे यांनी अशा अडथळ्यांवर मात करत प्रत्येक मुलाला आत्मविश्वासाने मराठी बोलायला प्रवृत्त केले. चूक झाली तरी चालेल; पण गप्प बसू नका, हा त्यांचा ठाम नियम. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांनी लहान नाटकसंवाद, बोधकथा स्पर्धा, कृतिप्रधान उपक्रम राबवले आहेत. नियमित भाषिक कार्यशाळा, वाचन सत्रे आणि लेखन उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना जास्तीत-जास्त बोलते केले.
माहेरून शैक्षणिक सेवेचे व्रत जोपासणार्या सरोजिनी यांना सासरच्या देवरे कुटुंबानेही नेहमीच पाठबळ दिले. पती कै. नानासाहेब देवरे यांनी सरोजिनी यांच्या सर्व शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांच्या निधनानंतर सरोजिनी देवरे आणि कुटुंबीयांनी त्यांच्या स्मरणार्थ साहित्यिक उपक्रम सुरू केले. कै. नाना देवरे यांच्या नावाने दरवर्षी उत्कृष्ट वाङ्मयासाठी राज्यस्तरीय रोख पुरस्कार दिला जातो, जो नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी निरंतर सुरू आहे. सरोजिनी देवरे यांचा अनुभव फक्त वर्गखोलीपुरताच मर्यादित नाही. त्या वाचन आणि लेखन क्षेत्रातदेखील सक्रिय आहेत. ‘वाचन साखळी महाराष्ट्र’ या समाजमाध्यमातील नामांकित समूहात नियमितपणे सक्रिय राहून, त्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करून त्यांची समीक्षणे प्रकाशित केली आहेत. १०० पुस्तकांच्या समीक्षणानंतर दिला जाणारा ‘वाचनयात्री’ पुरस्कार त्यांच्या नावावर नोंदवला गेला. या उपक्रमामुळे महाराष्ट्रभरातील वाचक मराठी साहित्याकडे वळले.
शाळेत मराठी शिकवण्यासोबत सरोजिनी देवरे यांनी नवीन लेखकांना प्रोत्साहन देण्यासही महत्त्व दिले. नवीन प्रकाशित होणारी पुस्तके त्या स्वतः विकत घेऊन वाचतात, त्यांची समीक्षणे माध्यमांतून प्रसिद्ध करतात. लेखकांच्या साहित्यकृतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी कै. नाना देवरे यांच्या नावाने उत्कृष्ट वाङ्मय रोख पुरस्कार सुरू केला. शिक्षकांचे अनुभव जतन व्हावेत, विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमांचे दस्तावेजीकरण व्हावे, यासाठी ‘कहाण्या ज्ञानदीपच्या’ या पुस्तकात विविध शिक्षकांचे अनुभव संकलित करण्यात आले. ‘सूर्योदय प्रतिष्ठान, महाराष्ट्र’कडून त्यांच्या कार्यासाठी राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक’ हा नामांकित पुरस्कार देण्यात आला.
यासोबतच सरोजिनी देवरे यांचे कार्य फक्त शाळेत किंवा साहित्य क्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता, त्यांनी समाजसेवा क्षेत्रातही महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले. गरीब, वंचित कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मार्गावर आणणे, समाजातील अंधश्रद्धा दूर करणे, बाल वयोगटातील मुले आणि मुलींच्या आरोग्य आणि पोषणाची काळजी घेणे, या क्षेत्रात त्या सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे घाटकोपर विभागातील अनेक कुटुंबे सामाजिकदृष्ट्या सशक्त झाल्या आहेत. आपले मत व्यक्त करताना सरोजिनी सांगतात की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर भाषा जपण्याची जबाबदारी अधिक वाढली आहे. त्याचा दृष्टिकोन स्पष्ट आहे की, भाषा जपण्यासाठी मुलांना, शिक्षकांना आणि वाचकांना सातत्याने मार्गदर्शन करणे, साहित्यिक उपक्रम राबविणे आणि नव्या लेखकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
सध्याच्या काळात मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी सरोजिनी देवरे सातत्याने पुढाकार घेत आहेत. त्यांनी लवकरच ‘शब्दसुमन’ बहुउद्देशीय संस्था स्थापन करण्याचा मानस ठेवलाय. या संस्थेद्वारे विविध साहित्यिक उपक्रम राबविले जातील, मराठी पुस्तके प्रकाशित केली जातील, लेखकांना संधी मिळवून देणे आणि वाचकांमध्ये भाषाप्रेम निर्माण होण्याच्या उद्देशाने ही संस्था कार्यरत राहील, असे त्या म्हणतात. सरोजिनी देवरे यांचा अनुभव, कार्य आणि दृष्टिकोन म्हणजे महाराष्ट्रातील अनेक मुलांना शिक्षण, संस्कृती आणि साहित्याच्या मार्गावर नेणारी प्रेरणा आहे. सरोजिनी देवरे यांचा गेल्या २८ वर्षांपासून अविरत असलेला अध्यापन, समाजसेवा आणि वाचन-लेखनाचा अनुभव समाजाला, विद्यार्थ्यांना आणि मराठी भाषेला समृद्ध करणारा ठरत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.
- सागर देवरे