शीख समाज आणि वारकरी परंपरेतील अतूट स्नेहबंध

28 Feb 2026 18:10:28
Sikh and Warkari Tradition
 
‘तख्त सचखंड श्री हजूर साहिब’ हे याच गोदावरीच्या तीरावर वसलेले आहे. पंजाब आणि महाराष्ट्र यांच्यातील ऐतिहासिक धार्मिक नात्याचे आणि मैत्रीचे हे एक शक्तिशाली उदाहरण. या दोन महान परंपरांमधील संवादाचा विचार करताना संत नामदेवरायांचे योगदान हा सर्वांत तेजस्वी आणि महत्त्वपूर्ण दुवा ठरतो. वारकरी आणि शीख परंपरेचे हे ऋणानुबंध अवघ्या देशाला जोडून ठेवतात. शीख समाज आणि वारकरी परंपरेचे स्नेहबंध उलगडणारा हा लेख.
 
भारताच्या विशाल आणि वैविध्यपूर्ण नकाशावर पंजाब आणि महाराष्ट्र यांच्यात शेकडो मैलांचे अंतर असले, तरी आध्यात्मिक नकाशावर मात्र हे दोन्ही प्रदेश एकमेकांच्या अत्यंत जवळ आहेत. पंजाबची शीख गुरुपरंपरा आणि महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय हे दोन्ही प्रवाह वरकरणी वेगळे वाटले, तरी त्यांच्या विचारांचा गाभा एकच आहे. हे नाते केवळ एकमेकांवरील प्रभावाचे नाही, तर नामस्मरण, कीर्तन, समता आणि सेवा या समान मानवी मूल्यांच्या धाग्यांनी विणलेले आहे. जिथे धर्म केवळ मंदिरांपुरता मर्यादित राहात नाही, तर तो लोकांच्या जगण्याचा आणि सहजीवनाचा भाग बनतो, तिथे या दोन्ही परंपरा एकरूप होताना दिसतात.
शीख परंपरेचा महाराष्ट्राशी असलेला सर्वांत भक्कम आणि आजही धडधडणारा दुवा म्हणजे नांदेड. शीख धर्मातील पाच प्रमुख तख्तांपैकी एक असलेले ‘तख्त सचखंड श्री हजूर साहिब’ हे याच गोदावरीच्या तीरावर वसलेले आहे. १७०८ मध्ये गुरू गोबिंदसिंह यांचे देहावसान आणि त्यांचा शेवटचा काळ नांदेडमध्ये व्यतीत झाला, ज्यामुळे या शहराला शीख इतिहासात एक अढळ आणि पवित्र स्थान मिळाले. आजही नांदेडकडे येणार्‍या भाविकांची गर्दी पाहिल्यास लक्षात येते की, हा केवळ इतिहासातील एक अध्याय नसून ती एक जिवंत परंपरा आहे. याच मातीतला आणखी एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे, बंदा सिंह बहादूर. वैराग्याकडून योद्धा बनण्याचा त्यांचा प्रवास आणि नांदेडशी असलेले त्यांचे नाते, हे पंजाब आणि महाराष्ट्र यांच्यातील ऐतिहासिक मैत्रीचे एक ज्वलंत उदाहरण आहे.
 
या दोन महान परंपरांमधील संवादाचा विचार करताना, संत नामदेवरायांचे योगदान हा सर्वांत तेजस्वी आणि महत्त्वपूर्ण दुवा ठरतो. ते केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन ते थेट पंजाबपर्यंत पोहोचले. पंजाबमधील घुमान येथे त्यांचे वास्तव्य आणि तिथे त्यांनी केलेली तपश्चर्या हा दोन संस्कृतींच्या मिलनाचा पाया ठरला. संत नामदेवांनी हिंदी आणि ब्रज भाषेत लिहिलेली ६१ पदे (अभंग) शीख धर्माचा अत्यंत पवित्र ग्रंथ ‘श्री गुरू ग्रंथसाहिब’मध्ये सन्मानाने समाविष्ट करण्यात आली आहेत. वारकरी संप्रदायातील विठ्ठल भक्ती आणि शीख धर्मातील निराकार भक्ती यांचा सुंदर संगम नामदेवांच्या रचनेत पाहायला मिळतो. आजही पंजाबमध्ये त्यांना ‘भगत नामदेव जी’ म्हणून पूजले जाते. दोन भिन्न भाषिक प्रदेशांना एका भक्तीच्या सूत्रात बांधण्याचे हे ऐतिहासिक कार्य भारताच्या एकात्मतेचे उत्तम उदाहरण आहे.
 
वारकरी आणि शीख परंपरेचे अंतरंग समजून घेण्यासाठी मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळीचा व्यापक पट लक्षात घेणे आवश्यक ठरते. त्या काळात कर्मकांडांचे बंड मोडून काढत ईश्वराच्या दारात सर्व लेकरांना समान हक्क देणारी लाट देशभर पसरली होती. ‘ईश्वर सर्वत्र आहे आणि सर्व माणसांत समान आहे,’ ही भूमिका दोन्हीकडे प्रकर्षाने दिसते. वारकरी संप्रदायात वारीच्या माध्यमातून शिस्त आणि समतेचा धडा गिरवला जातो, तर शीख धर्मात संगत आणि कीर्तन यांच्या माध्यमातून समाजाला एकोप्याने राहण्याचे शिक्षण मिळते. दोन्हीकडे धर्म हा एकट्या दुकट्याचा नसून तो समुदायाचा उत्सव आहे. या दोन्ही परंपरांमधील साम्य त्यांच्या आचरणात आणि सेवेच्या संकल्पनेत अधिक गडद होते. आषाढीच्या वारीत लाखो वारकरी जेव्हा खांद्याला खांदा लावून चालतात, तेव्हा तिथे श्रीमंत-गरीब हा भेद उरत नाही. वारीतील पंगतीमध्ये अन्नाचे वाटप आणि एकमेकांना दिले जाणारे सहकार्य, हेच चित्र आपल्याला शीख परंपरेतील ‘लंगर’मध्ये दिसते. भुकेल्याला अन्न देणे आणि सेवा करताना आपला मीपणा (अहंकार) गळून पडणे, हा या लंगरमागचा मूळ उद्देश असतो. म्हणूनच, वारी आणि लंगर या दोन्ही व्यवस्था जगाला ओरडून सांगतात की, देवाला शोधण्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही; माणसाचे दुःख कमी करणे आणि निस्वार्थ सेवा करणे, हीच खरी ईश्वरसेवा आहे!
 
आजच्या काळात, जिथे धर्माचा वापर अनेकदा राजकारणासाठी किंवा भेदभावासाठी केला जातो, तिथे वारकरी आणि शीख परंपरेचे हे नाते आपल्याला एक वेगळी दिशा दाखवते. पंढरपूरची विठ्ठलभक्ती आणि नांदेडची गुरुपरंपरा यांची भौगोलिक ठिकाणे आणि उपासनेच्या पद्धती वेगळ्या असल्या, तरी त्यांचा गाभा एकच आहे, माणसाला माणूस म्हणून स्वीकारणे आणि अहंकाराचा त्याग करणे. हे नाते इतिहासातील केवळ काही घटनांपुरते मर्यादित नाही, तर ती भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेची एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. नामाच्या लयीवर चालणारी वारी, कीर्तनाच्या सुरांतून पसरणारी गुरुवाणी आणि संत नामदेवांचा वारसा या गोष्टी अंतिमतः एकाच सत्याकडे बोट दाखवतात. म्हणूनच शीख आणि वारकरी समाजाचे हे नाते केवळ मैत्रीचे नाही, तर आत्मिक एकतेचे आहे.
 
- डॉ. सुनील भोकरे
(लेखक : (भाप्रसे) शहरी आरोग्य, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त आहेत.)
 
 
 
Powered By Sangraha 9.0