मुंबई :(Marathi Bhasha Diwas 2026) “आपल्याकडची मराठी संपत चालली आहे हे फक्त मुंबईतील लोकांनाच वाटतं. वास्तविक, मराठीचे भविष्य अंधारात नाही, उलट मराठीचा दिवा कायम तेवत राहील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे” असे प्रतिपादन प्रख्यात लेखक अंबरीश मिश्र यांनी केले.
दि. २८ फेब्रुवारी रोजी, बोरिवलीच्या श्री मोरेश्वर सेवा संघाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य मराठी ग्रंथ जत्रेच्या दुसऱ्या दिवशी मराठीतील प्रख्यात लेखक अंबरीश मिश्र यांनी ‘ मराठी : माणूस, भाषा आणि संस्कृती ‘ या विषयावर श्रोत्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मराठी भाषेचा इतिहास, त्यांनी आपल्या खुमासदार शैलीतून उलगडून सांगितला. हा इतिहास सांगत असताना, भाषा ही केवळ सांस्कृतिक बाब नसून, भाषा ही जैविक आणि वांशिक असते हे त्यांनी उदाहरणासहीत लोकांना सांगितले. मातृभाषा या शब्दाचा आगळा वेगळा अर्थ मांडताना ते म्हणाले की “ भाषेचा रथ स्त्रीने चालवला म्हणून तिला ‘मातृभाषा’ असं म्हटलं जातं.” इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरील लोकांचे दाखले देत, तत्कालीन समाज व्यवस्थेच्या भाव विश्वावर त्यांनी अत्यंत मार्मिकपणे बोट ठेवलं. लोकमान्य सेवा संघाच्या प्रदीर्घ कारकिर्दीचे कौतुक करत, वर्तमानातील लोकांनी अशा व्यक्तींकडून आणि संस्थांकडून आदर्श घेतला पाहिजे असे सुद्धा ते म्हणाले.
“आपण सगळ्या गोष्टी सरकारकडे मागितल्याच पाहिजे का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा असं म्हणत त्यांनी लोकांना अंतर्मुख होण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर लाडकी बहिण सारख्या योजनेसाठी बनावट खाती उघडणाऱ्या लोकांची सुद्धा त्यांनी कानउघडणी केली. सदर कार्यक्रमाला बोरिवलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.