शीख ‘सिकलीगर’ : लढाऊ परंपरेचे वारसदार!

28 Feb 2026 17:45:01

शीख ‘सिकलीगर’ समाज म्हणजे शिखांच्या लढाऊ परंपरेचा वारसदार समाज. सहाव्या व दहाव्या गुरूंच्या काळात ‘सिकलीगर’ हे कारागीर व शस्त्रनिर्माते म्हणून शीख धर्माच्या सैनिकीकरणाला पाठबळ देत होते. शीख सिकलीगर समाजाने धर्माच्या संरक्षणासाठी सातत्याने योगदान दिले आहे. शीख सिकलीगर समुदायाची ऐतिहासिक परंपरा, त्याचबरोबर समाजाची सामाजिक-राजकीय उपेक्षा याचा आढावा घेणारा हा लेख...

गुरुनानक यांनी १५व्या शतकात स्थापन केलेला शीख धर्म हा आध्यात्मिक, लढाऊ आणि सामाजिक तत्त्वांनी जोडलेल्या विविध समुदायांचा व्यापक समूह आहे. यामध्ये सिकलीगरांचे स्थान विशेष आहे. कारण ते कारागीर व शस्त्र-निर्माते म्हणून सहाव्या व दहाव्या गुरूंच्या काळात शीख धर्माच्या सैनिकीकरणाला पाठबळ देत होते. त्यांचे मूलभूत योगदान असूनही, अनेक राज्यांच्या जनगणनेत त्यांना ‘शीख’ म्हणून मान्यता दिली जात नाही आणि अल्पसंख्याकांचे लाभही त्यांना नाकारले जातात. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम, ‘१९९२’च्या ‘कलम २ (क)’अंतर्गत भारतातील शीख समुदायाला अल्पसंख्याक समुदाय म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे.

शीख लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे १.९ टक्के आहे. शीख लोकसंख्येची स्वना तीन गटांत विभागलेली आहे : सामान्य (४६.४ टक्के), अनुसूचित जाती (३१.१ टक्के) आणि ओबीसी (२९.८ टक्के). शिखांमध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाण अत्यल्प (०.८ टक्के) आहे. उत्पत्ती आणि ऐतिहासिक उगम ‘सिकलीगर’ हा शब्द फारसी ‘सैकलगार’ (saiqalgar) या शब्दापासून आला असून, त्याचा अर्थ धातू; विशेषतः शस्त्रे, पॉलिश करणारा किंवा चमकवणारा असा होतो. कालांतराने सिकलीगर शस्त्र पॉलिश करणार्‍यांपासून कुशल लोहार व शस्त्रनिर्माते बनले. त्यांचा शीख धर्माशी संबंध १७व्या शतकाच्या सुरुवातीचा आहे. गुरू हरगोबिंद साहिब सहावे गुरू (१५९५-१६४४) यांच्या काळात, ज्यांनी आपल्या अनुयायांना संघटित व शस्त्रसज्ज करून शीख ओळखीचा लढाऊ पैलू अधोरेखित केला.

मारवाडमधील लोहार (आयर्न-स्मिथ) यांना या कार्यासाठी अमृतसर येथे आणण्यात आले आणि पुढे ते ‘सिकलीगर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांना निवारा व देखभाल देण्यात आली. भाय रामचंद (नंतर रामसिंह) हे शीख धर्मात ‘दीक्षित’ होणार्‍यांपैकी पहिले होते. दहावे गुरू, गुरू गोबिंद सिंहजी यांच्या नेतृत्वाखाली या समुदायाची ओळख अधिक द़ृढ झाली. त्यांनी ‘खालसा’ सेनेसाठी शस्त्रनिर्मिती केली आणि नांदेड (महाराष्ट्र) येथील प्रवासासह अनेक महत्त्वाच्या लष्करी मोहिमांमध्ये गुरूंना साथ दिली. अशाप्रकारे शीख एक संघटित, प्रशिक्षित समुदाय म्हणून विकसित झाले, जे मुघलांच्या अत्याचाराविरुद्ध लढू शकले आणि आपले स्वातंत्र्य जपू शकले.

शीख लष्करीपरंपरेतील भूमिका

गुरू गोबिंदसिंह यांच्या नेतृत्वाखाली सिकलीगरांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यांनी आनंदपूर साहिब येथे शस्त्रनिर्मिती केली आणि ‘चमकौर’सारख्या महत्त्वाच्या युद्धांत शौर्याने लढले, जिथे रामसिंह यांसारख्या व्यक्तींनी ‘शहादत’ प्राप्त केली.  १७०८ मध्ये गुरूंच्या निधनानंतरही सिकलीगरांनी शीख राजघराण्यांची सेवा सुरू ठेवली, विशेषतः पटियाळा शीख राज्याचे संस्थापक महाराजा आला सिंह यांच्या काळात. त्यांनी अफगाण आक्रमक अहमद शाह अब्दालीच्या फौजांकडून बंदिवानांची मुक्तता करण्यामध्येही भूमिका बजावली. ‘सिकलीगर’ हा शब्द पंजाबमध्ये या शस्त्रकार जमातीसाठी एक प्रसिद्ध ओळख बनला.

महाराजा रणजितसिंह यांच्या काळात सिकलीगरांचे कौशल्य अधिक विकसित झाले आणि लाहोर येथे मोठ्या प्रमाणावर बंदुका व रायफल्स तयार करण्यात आल्या. या शस्त्रांचा वापर अ‍ॅग्लो-शीख युद्धांमध्ये करण्यात आला. मात्र, ब्रिटिश वसाहतवादी राजवटीत, ‘गुन्हेगारी जमाती’ कायद्यांतर्गत सिकलीगरांना अन्यायकारकरीत्या ‘गुन्हेगारी जमात’ म्हणून घोषित करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय दडपला गेला आणि प्रशासनात आजही टिकून असलेला कलंक त्यांच्यावर बसला. सामाजिक-आर्थिक स्थिती जगण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी अनेक पिढ्यांपासून त्यांनी धातूची भांडी, चाकू व घरगुती वापराच्या वस्तू तयार करण्याचा व्यवसाय केला; परंतु आधुनिक उद्योगांमध्ये तयार होणार्‍या यंत्रनिर्मित वस्तूंशी ते स्पर्धा करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना पुरेसा उदरनिर्वाह मिळाला नाही.

आजही ते भारताच्या विविध भागांत विखुरलेले असून, अत्यंत दारिद्य्रात जीवन जगत आहेत. आज ‘सिकलीगर’ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि पंजाब येथे पसरलेले आहेत. ते बहुतेकवेळा झोपडपट्ट्यांत, शहरांच्या कडेला किंवा दुर्गम वसाहतींमध्ये राहतात. ते ‘डेरा’(आश्रमासारखी जागा)मध्ये राहतात आणि प्रत्येक ‘डेरा’मध्ये एक-दोन वृद्ध आजोबा कुटुंबप्रमुख म्हणून असलेली मोठी कुटुंबे राहतात. अनेकजण अतिक्रमित जमिनीवर राहतात आणि जमीनमाफिया व सरकारी यंत्रणांकडून हकालपट्टीच्या धोक्याला सामोरे जातात. आंध्र प्रदेशातील रंगारेड्डी जिल्ह्यातील निजामाबाद व कुकटपल्ली, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, मध्य प्रदेशातील खंडवा आणि हिमाचल प्रदेशातील नाहन या भागांमध्ये ‘सिकलीगर’, ‘बंजारा’ आणि ‘लुबाणा’ असे काही आदिवासी शीख धर्माचे निष्ठावंत अनुयायी आहेत, जे फाळणीनंतर आजपर्यंत उपेक्षितच राहिले आहेत. ते देशभरात लहानलहान गटांत विखुरलेले आहेत. त्यांची भाषा ‘सिकलीगरी’ ही मारवाडी, हिंदी व पंजाबी यांचे मिश्रण असून, त्यात ‘गुरबाणी’चे शब्दही आढळतात.

‘सिकलीगर’ समाजात लिंगभेद पाळला जात नाही आणि एखाद्या कुटुंबात मुलगी नसेल, तर मुलगी दत्तक घेतली जाते. विधवा पुनर्विवाहाची उदाहरणे फारच क्वचित आढळतात. बहुतेक विधवा अविवाहित व स्वतंत्र राहणे पसंत करतात. ‘सिकलीगर’ २१व्या पिढीत सुशिक्षित होऊन डॉक्टर, अभियंते बनण्याची आणि चांगले जीवन जगण्याची आकांक्षा बाळगतात. उदाहरणार्थ, पुण्यात काही तरुण सिकलीगर ‘गोल्फ क्लब’मध्ये ‘कॅडी’ म्हणून काम करतात आणि त्याच वेळी लोहारकामही करतात. काहीजण आपल्या समाजाची प्रतिमा व दर्जा बदलण्यासाठी ‘आयएएस’ अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात.

शीखविरोधी हिंसाचार आणि त्यानंतरची परिस्थिती दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सिकलीगर समुदायांवर नोव्हेंबर १९८४च्या हत्याकांडाचा भीषण परिणाम झाला. दारिद्य्र व अदृश्यतेमुळे असुरक्षित असलेल्या अनेकांवर हल्ले झाले आणि ते मारले गेले. विशेषतः ज्यांनी आपली लढाऊ प्रतिमा जपली होती, जे पारंपरिक शीख-शौर्याशी जोडले जात होते, ते स्वतःचे संरक्षण करण्यात अधिक यशस्वी ठरले. यावरून त्यांच्या अस्तित्वाची असुरक्षितता अधोरेखित होते. संस्थात्मक प्रतिसाद आणि तळागाळातील चळवळी सिकलीगरांच्या हक्कांसाठी अनेक तळागाळातील प्रयत्न झाले आहेत.

‘फोरम फॉर फॉरगॉटन शीख्स’ या संस्थेने, ज्याचे नेतृत्व स्व. नानकसिंह निश्टर (हैदराबाद), मोहिंदरसिंह (चंदीगढ) आणि इतर कार्यकर्ते करत होते; समाजाच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगा’चे सदस्य हरचरणसिंह जोश यांच्या नेतृत्वाखाली २००८ मध्ये केलेल्या क्षेत्रीय अभ्यासात औरंगाबाद व पुण्यातील गंभीर दारिद्य्र नोंदवले गेले आणि तपशीलवार शिफारशी सादर करण्यात आल्या. निष्कर्ष एकेकाळी शीख धर्माच्या लष्करी पायाभरणीत अत्यंत महत्त्वाचे असलेले ‘सिकलीगर’ आजच्या भारतात सर्वात उपेक्षित शीख उपसमूहांपैकी एक बनले आहेत. दारिद्य्र, सामाजिक अदृश्यता व संस्थात्मक दुर्लक्ष यांनी चिन्हांकित त्यांची सद्यस्थिती ही त्यांच्या ऐतिहासिक शौर्य व धार्मिक निष्ठेच्या पूर्णतः विरोधात आहे. त्यांना संस्थात्मक पाठबळ देणे आणि सामाजिक-आर्थिक समावेशनाला चालना देणे हे केवळ न्यायाचेच नव्हे, तर शीख धर्माच्या बहुविध परंपरेचे जतन करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.

धोरणात्मक शिफारशी ‘एनसीएम’च्या सर्वेक्षणावर व नृवंशशास्त्रीय पुराव्यांवर आधारित पुढील धोरणात्मक उपाय अत्यावश्यक आहेत :- अधिकृत मान्यता : सर्व राज्यांमध्ये जनगणना व राजपत्र अधिसूचनांमध्ये सिकलीगरांना ‘शीख’ म्हणून मान्यता देणे. निवास-सुरक्षा : मालकी हक्कासह घरे देणे; ५४.४ टक्के लोकांकडे कायदेशीर घरे नाहीत. कल्याणकारी योजनांमध्ये प्रवेश : ‘बीपीएल’ कार्ड, रेशन कार्ड व जातप्रमाणपत्रांचे वितरण सुनिश्चित करणे. मूलभूत सुविधा : ५२.१ टक्के लोकांना स्वच्छ पाणी, ८३.३ टक्के लोकांना स्वच्छतागृहे नसणार्‍या नागरिकांसाठी शौचालये बांधणे व कचरा व्यवस्थापन व्यवस्था उभारणे. शिक्षण : शाळा, माध्यान्ह भोजन व प्रौढ शिक्षणाद्वारे साक्षरता वाढवणे, धातुकाम व इतर हस्तकलेमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देणे. जनजागृती मोहिमा : अल्पसंख्याक हक्क व कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम राबवणे. ७. कौशल्याधारित उद्योगांना पाठबळ : सूक्ष्म वित्तपुरवठा, सहकारी संस्था व तांत्रिक प्रशिक्षणाद्वारे पारंपरिक कारागिरीचा उपयोग करणे.

- तेजसिंग बावरी



Powered By Sangraha 9.0