मुंबई : मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत शुक्रवार दि.२७ रोजी काँग्रेसचे सतेज पाटील यांची फिरकी घेतली. गोकुळच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गोकुळ मधील मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांची मैत्री सर्वश्रुत आहे. हाच धागा पकडून मंत्री शंभूराज देसाई हे सतेज पाटील यांना उद्देशून म्हणाले की, तुमचं दोघांचं गोकुळच मिटलं काय ? यावेळी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी हसून दाद दिली. तसेच लक्षवेधी वेळी सतेज पाटील काही काळ सभागृहात बाहेर होते तेव्हा लक्षवेधी रद्द करावी अशी फिरकी शंभूराज देसाई यांनी घेतली. यावेळी उपसभापती डॉक्टर निलमताई गोऱ्हे यांनीही संधी सोडली नाही आणि सतेज पाटील यांना उद्देशून तुम्ही बाहेर जाऊन सेटलमेंट करून आलात असं वाटलं असा टोला लगावला. सतेज पाटील तुम्ही बाहेर जाऊन काय करून आलात याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे असेही उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे म्हणाल्या. त्यावर कॉफी पिऊन आलो असे उत्तर सतेज पाटील यांनी दिले.तर मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सतेज पाटील यांचा उल्लेख भावी विरोधी पक्षनेते असा करण्यात आला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.