मुंबई : अफगानिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धाचे ढग जमा झाले असून, पकिस्तानने अफगाणिस्तान विरोधात युद्धाची घोषणा केली आहे. पाकिस्तानी हवाई दलाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानने कारवाई करत पाकिस्तानच्या 15 चौक्या ताब्यात घेतल्या होत्या. अफगाणिस्तानच्या या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या काबुल आणि कंदाहर या नागरी वस्त्यांवर हवाई हल्ले करत, यु्द्धाची घोषणा केली आहे.
पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी काही केल्या शमत नसून, अमेरिका आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अफगाणिस्तानची कळ काढत दोन देशांमधल्या तणावामध्ये भर घातली आहे. रविवार दि. 22 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून गुरुवार दि. 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानवर हल्ला करत त्यांच्या लष्करी चौक्यांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यामध्ये 55 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा अफगाणिस्तानच्यावतीने करण्यात आला. अफगाणिस्तानच्या या हल्ल्याच्या विरोधात पाकिस्तानने ऑपरेशन गझब लिक हक सुरु करत, अफगाणिस्तानातील प्रमुख शहरांच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. या हल्ल्याध्ये 122 तालिबानी सैनिक मारल्याचा दावा पाकिस्ताने केला. पकिस्तानने काबुल शहरावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओदेखील पाकिस्तान सरकारच्यावतीने समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आला. तर, पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील रुग्णालयालाही लक्ष्य केल्याचा दावा स्थानिक वृत्तसमुहांनी केला आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या या कृतीला उत्तर देताना पाकिस्तानमधील इस्लामाबादनजीकच्या प्रमुख शहरांना लक्ष्य करत हवाई हल्ले केल्याचा दावा अफगाण सैन्याच्यावतीने करण्यात आला आहे. पाकिस्तानने देखील अफगाण सेना त्यांच्या शहरांना लक्ष्य करण्यसाठी ड्रोन तंत्रज्ञान वापरत असल्याचे म्हटले आहे. यामध्ये ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानातील अणुऊर्जा केंद्रालाही अफगाणिस्तानने लक्ष्य केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर कराची शहरामध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असून, पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
विविध देशांनी या दोन देशातील संघर्षावर चिंता व्यक्त केली असून, शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन देखील केले आहे. या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने अनेक मुस्लीम देशांशी संवाद साधला आहे. या दरम्यान अफगाणिस्तानविरोधातील लष्करी कारवाई सुरु असल्याचे पाकिस्तानने म्हटले असून, आम्हांला शांततेच्या मार्गाने तोडगा हवा असला तरीही पाकिस्तानची कोणतीही आगळीक सहन करणार नसल्याचे अफगानिस्तानने म्हटले आहे.
पाकिस्तानला जळी स्थळी काष्ठी पाषाणी भारत दिसे...
पाकिस्तानातील वाढत्या दहशतवादी कृत्यांमागे भारताचा हात असल्याचा बेछूट आरोप, पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी म्हटले आहे. पाकिस्तानातील प्रत्येक हल्ल्यामध्ये भारताचे नियोजन आणि धोरणात्मक सहकार्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्विम अशा दोन्ही सीमांवर सैन्य सज्ज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.