गुरुपरंपरेत ‘मोहयालां’ त्याग, तप आणि तिलक

28 Feb 2026 16:01:03

धर्मासाठी प्रचंड शौर्य आणि त्याग करणारा मोहयाल समाज. मोहयाल समाजाच्या ऐतिहासिक मुळांचा उगम अत्यंत प्राचीन आणि गौरवशाली आहे. परंपरेनुसार त्यांचा संबंध महाराजा दाहिर सेन यांच्या वंशाशी जोडला जातो. धर्मनीतीसाठी अपूर्व त्याग करणारे वीर या समाजाचे सुपुत्र आहेत. गुरुपरंपरेतील त्यांचे योगदान हे केवळ सहकार्य नव्हे, तर आत्मसमर्पणाच्या त्या दीप्तगाथेचे प्रतीक आहे. या लेखात गुरुपरंपरेत मोहयालांचे त्याग आणि तपाचा मागोवा घेतला आहे...

भारतीय इतिहासाच्या विराट आकाशात मोहयाल समाजाने आपल्या धर्म, राष्ट्र आणि आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी पिढ्यान्पिढ्या शौर्य, त्याग आणि शहादतीची अखंड परंपरा जपली आहे. हा समाज केवळ ज्ञान, संस्कृती आणि विद्वत्तेचा संवाहक नव्हता; तर संकटकाळी शस्त्र उचलून अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभा राहणारा प्रहरीही होता. इतिहासाची दिशा बदलण्याचे धैर्य ज्यांनी दाखविले, त्या तेजस्वी परंपरेचे नाव म्हणजे ‘मोहयाल’.

गुरुपरंपरेतील त्यांचे योगदान हे केवळ सहकार्य नव्हे, तर आत्मसमर्पणाच्या त्या दीप्तगाथेचे प्रतीक आहे, ज्याने ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या अमर शहादतीला आध्यात्मिक गौरव प्राप्त करून दिला. मोहयाल समाजाच्या ऐतिहासिक मुळांचा उगम अत्यंत प्राचीन आणि गौरवशाली आहे. परंपरेनुसार त्यांचा संबंध महाराजा दाहिर सेन यांच्या वंशाशी जोडला जातो. याच वंशात जन्मलेले श्री गौतम दासजी, जे श्री गुरू नानक देव साहिबजी यांचे समकालीन होते, पुढे श्री गुरू अर्जुन देव साहिबजी यांच्या सानिध्यात आले आणि स्वतःला पूर्णतः गुरुसेवेसाठी अर्पण केले.

गुरुआज्ञेने त्यांना धर्मप्रचारासाठी करियाला येथे पाठविण्यात आले. आजच्या पाकिस्तानातील चकवाल जिल्ह्यातील ते स्थान, जे त्या काळात धार्मिक सहअस्तित्वाचे प्रतीक होते. समीप असलेले कटासराजचे शिव मंदिर त्या सांस्कृतिक समन्वयाची आजही साक्ष देते. करियाला गाव पुढे मोहयाल समाजाचे प्रमुख केंद्र बनले. सुमारे ४५० वर्षे हा समाज तेथे वास्तव्य करत राहिला आणि चढदी कला, समृद्धी व सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक ठरला. ‘छिब्बर’ वंशातील हे कुटुंब संगतीत ‘भाईजींचे कुटुंब’ म्हणून सन्मानाने ओळखले जातात. आजही करियाला गावाला मोहयाल समाजाचे ‘जेरुसलेम’ म्हटले जाते, हे त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे द्योतक आहे.

भौगोलिकदृष्ट्या हा प्रदेश अत्यंत संवेदनशील होता; पश्चिमेस अफगाणी प्रभाव आणि पूर्वेस मुघल सत्ता अशा स्थितीत मोहयाल वीरांनी या संपूर्ण भूभागाचे रक्षण ढाल बनून केले. याच परंपरेतील तेजस्वी नक्षत्र होते, भाई परागाजी; जे गौतम दासजी यांचे सुपुत्र होते. ते श्री गुरू हरगोबिंद साहिबजी यांच्या सेनेचे महान सेनापती झाले. इ.सन १६२८ आणि इ.सन १६३५च्या युद्धांत त्यांनी अद्वितीय शौर्य दाखविले. इ.सन १६३५ मधील करतारपूरच्या ऐतिहासिक युद्धात, जिथे अवघ्या १४व्या वर्षी श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांनीही पराक्रम गाजविला. त्या रणांगणात भाई परागाजी एका सैन्यदलाचे नेतृत्व करीत होते. उजवा हात छाटला गेल्यानंतरही रणभूमी न सोडणे, ही त्या मोहयालपरंपरेची साक्ष आहे, जिथे शरीरापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ मानले गेले होते.

श्री गुरू हरगोबिंद साहिबजी त्यांच्या सेवांनी प्रसन्न होऊन त्यांना उत्तम जातीचा घोडा, ५०० रुपये आणि स्वतःची कृपाण बहाल केली व करियाला येथे धर्मप्रसाराचे कार्य सोपविले. त्यांच्या वंशातील भाई लक्खी दासजी आणि भाई हिरानंदजी यांनीही गुरुसेवेलाच जीवनाचे ध्येय मानले. हीच परंपरा पुढे अमर शहीद भाई मतिदास आणि भाई सतीदासजी यांच्या रूपाने इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली. श्री गुरू हर कृष्ण साहिबजी यांच्या पश्चात गुरू-गादीचा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा मोहयाल समाजातील भाई दरगाह मलजी यांची गुरू दरबाराचे दिवाण म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी दिल्लीहून बाबा बकाला साहिब येथे गुरू-गादीसंबंधी सर्व साहित्य पोहोचवून नवव्या ज्योतीच्या रूपाने श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या ‘गुरू-गद्दी प्रतिष्ठापना’मध्ये निर्णायक भूमिका बजावली.

हाच तो ऐतिहासिक क्षण, ज्यामुळे मोहयाल समाजाचे नाते थेट त्या महान ‘शहादत’शी जोडले गेले, ज्याने भारतीय इतिहासाला नवी दिशा दिली. भाई दरगाह मलजी यांनी आपल्या पुतण्यांना भाई मतिदास आणि भाई सतीदासजी यांना गुरुसेवेसाठी अर्पण केले. भाई मतिदासजी गुरू दरबाराचे दिवाण झाले; तर भाई सतीदासजी यांनी विद्वत्तेच्या बळावर ‘गुरुवाणी’चे लेखन, भाषांतर आणि प्रचारकार्य हाती घेतले. मोहयाल समाजाने शस्त्र आणि शास्त्र दोन्हींची समान निष्ठेने उपासना केली. दि. ९ नोव्हेंबर इ.सन १६७५ रोजी धर्मांतरास नकार दिल्यामुळे भाई मतिदासजी यांना आर्‍याने चिरून ठार करण्यात आले.

‘जपुजी साहिब’चा पाठ करीत हसत-हसत शहादत स्वीकारणे, ही त्या आत्मिक उंचीची साक्ष आहे, जिथे मृत्यूलाही पराभव पत्करावा लागतो. दुसर्‍या दिवशी भाई सतीदास यांना कापसात गुंडाळून जिवंत जाळण्यात आले; परंतु त्यांच्या मुखावर भय नव्हते, धर्म गौरवाचे तेज होते. त्यांच्या शहादतीने सिद्ध केले की, गुरुपरंपरा केवळ उपदेश नाही; तर आत्मोत्सर्गाची सजीव साधना आहे. भाई मतिदास आणि भाई सतीदासजी यांची शहादत ही केवळ दोन व्यक्तींची कथा नाही; ती मोहयाल समाजाच्या सामूहिक चेतनेचा उद्घोष आहे. गुरुपरंपरेतील त्यांचे योगदान हा संदेश देतो की, धर्म, सत्य आणि आत्मसन्मानासाठी दिलेली ‘शहादत’ पराजय नसून, इतिहासाला अमर दिशा देणारा संकल्प असतो. अमर शहीद भाई मतिदास, भाई सतीदास आणि मोहयाल समाजाच्या या महान परंपरेस शतशः वंदन. हे योगदान गुरुपरंपरेतील त्या अखंड ज्योतीचा अविभाज्य भाग आहे, जी युगानुयुगे मानवतेला साहस, सत्य आणि समर्पणाची प्रेरणा देत राहील.


- डॉ. रणजित सिंह अरोरा



Powered By Sangraha 9.0