अव्यक्त भावनांचा मागोवा ‘माया’

28 Feb 2026 13:11:29
 Maya marathi movie
 
 अलीकडच्या काळात मराठी चित्रपटही चौकटीपलीकडच्या विषयांना स्पर्श करुन प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतात. त्यातच नातेसंबंधांवर भावनिक भाष्य करणारे, नात्यांचे विविध पदर अलगद उलगडणारे चित्रपट प्रेक्षकांना विशेषत्वाने आपलेसे वाटतात. कारण, हे चित्रपट केवळ कथाच सांगत नाहीत, तर आयुष्यातील अव्यक्त भावनांना ते शब्दरुप देतात. अशाच भावविश्वाला स्पर्श करणारा ‘माया’ हा चित्रपट दि. २७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. अभिनेत्री मुक्ता बर्वेची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट गेले काही दिवस चर्चेतदेखील आहे. तेव्हा नेमका हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊया...
 
ही गोष्ट आहे, माया सबनीसची. वयाच्या ३५-४० मध्ये असलेली माया व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट. काही वर्षांपूर्वी झालेला घटस्फोट तिच्या आयुष्याला वेगळ्याच वळणावर घेऊन गेला. एका भयानक प्रसंगाने तिचा संसार उद्ध्वस्त झाला आणि त्यानंतर तिचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच अगदी बदलून गेला. विश्वास, नाती, प्रेम या भावनांपासून ती हळूहळू दुरावली. भूतकाळाच्या या काळ्या सावलीपासून दूर जाण्यासाठी माया भारत सोडण्याचा निर्णय घेते आणि लंडनमध्ये स्थायिक होते. नव्या शहरात, नव्या लोकांमध्ये, नव्या सुरुवातीची धडपड सुरू होते. एका हॉस्पिटलमध्ये तिची प्रॅटिस सुरू होते. लंडनमध्ये तिची मामी अमू (रोहिणी हट्टंगडी) ही तिचा एकमेव भावनिक आधार. याचदरम्यान तिच्या आयुष्यात येतो, एक रुग्ण महेश (डॉ. गिरीश ओक). वयस्कर, अनुभवी, सुरुवातीला अगदी उद्धट, पण आतून तितकाच कोमल मनाचा. त्याचा मुलगा सिद्धार्थ (सिद्धार्थ चांदेकर) आणि लहानशी नात, असं छोटं कुटुंब. महेशवर उपचार करताना माया केवळ त्याच्या शरीरातील वेदना कमी करत नाही, तर नकळत त्या कुटुंबातही प्रवेश करते. हळूहळू उपचारांचं नातं मैत्रीत बदलतं आणि मैत्रीचं नातं एका न बोलल्या जाणार्‍या जिव्हाळ्याच्या नात्यात रूपांतरित होतं. सिद्धार्थचा समजूतदारपणा, महेशची शांत शहाणपणाची साथ आणि त्या घरातलं निरागस हसू हे सगळं मायाच्या गोठलेल्या भावविश्वाला हळूच वितळवू लागतं. पण, भूतकाळ इतक्या सहजासहजी मायाची पाठ सोडत नाही. तिच्या आयुष्यातील जखमा पुन्हा पुन्हा ठणकतात आणि दु:खाची एक लकेर मागे सोडून जातात. तेव्हा मायाच्या आयुष्यात सिद्धार्थ आणि महेश नेमकं काय बदल घडवतात, हे पाहण्यासाठी हा चित्रपटच अनुभवावा लागेल. हा चित्रपट म्हणजे केवळ एका स्त्रीची कथा नाही, तर एखादी स्त्री कोलमडून पडल्यानंतर तिची पुन्हा उभं राहण्याची आणि आयुष्याला नव्याने कवटाळण्याची ही कहाणी आहे.
 
चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले असून, कथा आणि पटकथा ही आदित्य इंगळे आणि समीर कुलकर्णी यांची आहे. स्वतःपासून पुन्हा स्वतःपर्यंत येण्याचा भावनिक प्रवास चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संकल्पना नक्कीच अर्थपूर्ण असली, तरी तिची मांडणी मात्र फार प्रभावी ठरत नाही. कथा साधी, सरळ आणि बर्‍यापैकी अंदाज बांधता येण्यासारखी आहे. लंडनमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असले, तरी कथानकाच्या गरजेनुसार त्या पार्श्वभूमीची ठोस आवश्यकता जाणवत नाही. स्थान बदलले, पण भावनिक पातळीवर त्याचा विशेष परिणाम होत नाही. ट्रेलर पाहतानाच पुढील कथेची दिशा लक्षात येते आणि चित्रपट सुरू झाल्यानंतर पूर्वार्धातच पुढे काय घडणार, याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे उत्कंठा कमी होते. याशिवाय चित्रपटाची गती काही ठिकाणी अगदीच संथ वाटते. काही प्रसंग अधिक नेमकेपणाने आणि वेगाने मांडले असते, तर कथानकाचा प्रभाव वाढला असता; दिग्दर्शनात काही ठिकाणी घट्ट पकड जाणवली असती, तर कथा अधिक मनाला भिडली असती.
संवादांबाबतही काहीसा अपेक्षाभंग होतो. भावनिक प्रसंग असूनही संवाद फारसे उठावदार किंवा लक्षात राहतील, असे वाटत नाहीत. चित्रपटात मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी आणि गिरीश ओक यांसारखे सक्षम आणि अनुभवी कलाकार आहेत. त्यांच्या अभिनयात प्रामाणिकपणा जाणवतो; मात्र ताकदीच्या कलाकारांना न्याय देईल, अशी भावनिक खोली कथेतून पुरेशी उमटत नाही. परिणामी, चित्रपट मनाला पूर्णपणे स्पर्शून जात नाही. एकंदरीतच, चांगल्या विषयाची आणि समर्थ कलाकारांची साथ असूनही प्रभावी पटकथा, दिग्दर्शन आणि अधिक धारदार संवादांची उणीव जाणवते. त्यामुळे हा चित्रपट एक संकल्पना म्हणून ठीक असला, तरी अनुभव म्हणून अपेक्षेइतका परिणामकारक नाही.
 
चित्रपटात गाण्यांचा भडीमार नाही. उलट मोजक्याच प्रसंगांमध्ये हलकं, पार्श्वभूमीला साथ देणारं संगीत ऐकायला येतं. मात्र कथेचा भावनिक गाभा लक्षात घेता, एखादं हृदयस्पर्शी आणि लक्षात राहील असं गाणं असतं, तर प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाची छाप अधिक चांगली उमटली असती. काही प्रसंग संगीताच्या जोरावर अधिक प्रभावी होऊ शकले असते. तरीही, प्रत्येक चित्रपट भव्यदिव्य असायलाच हवा, असं नाही. कधीकधी साधी, सरळ आणि हलकी-फुलकी कथादेखील निवांत अनुभव म्हणून पाहावीशी वाटते. फार गुंतागुंतीचं कथानक, अनपेक्षित ट्विस्ट्स किंवा उग्र नाट्यमय स्टोरी नको असेल आणि शांत, निवांत एखादी भावनिक गोष्ट पाहायची असेल, तर हा चित्रपट नक्कीच एक पर्याय ठरू शकतो. एकूणच, फार मोठ्या अपेक्षा न ठेवता, हा चित्रपट पाहिल्यास तो काही प्रमाणात समाधान नक्कीच देऊ शकतो.
 
दिग्दर्शक : आदित्य इंगळे
 
कथा, पटकथा, संवाद : डॉ. समीर वसंत कुलकर्णी, आदित्य इंगळे
 
निर्माते : डॉ. सुनील दातार,अलका मधुकर दातार, नितीन प्रकाश वैद्य
 
कलाकार : मुक्ता बर्वे, डॉ. गिरीश ओक, सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हट्टंगडी, विजय केंकरे
 
गायक : पार्थ उमराणी, अंजली मराठे
 
रेटींग : २.५ स्टार
 
 
- अपर्णा कड
 
Powered By Sangraha 9.0